लडाखमध्ये एक इंच भूमीवरही चीनचा कब्जा नाही

लडाखमध्ये भारतीय सैन्य सज्ज, घुसखोरीचा प्रश्नच नाही – लेफ्टनंट जनरल द्विवेदी

    11-Sep-2023
Total Views |
Not even one square inch of our land occupied by China

नवी दिल्ली : लडाखमध्ये परिस्थिती अतिशय सर्वसामान्य आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये भारताच्या एक इंच भूमीवरही चीनचा कब्जा नाही, असे प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडीयर (डॉ.) बी. डी. मिश्रा (निवृत्त) यांनी केले आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) जम्मू येथे तीन दिवसीय नॉर्थ टेक सेमिनार 2023चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नायब राज्यपाल ब्रिगेडीयर (डॉ.) बी. डी. मिश्रा (निवृत्त) आणि भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी सहभागी झाले होते. त्यावेळी दोघांनी लडाखमध्ये स्थिती सामान्य असल्याचे स्पष्ट केले.

इतर कोणाच्या वक्तव्यावर मला काहीही बोलायचे नाही. पण वस्तुस्थिती काय आहे हे मी नक्की सांगेन, कारण मी स्वतः सर्व काही पाहिले आहे. चीनने लडाखमध्ये आमची (भारत) एक इंचही जमीन व्यापलेली नाही. वस्तुस्थिती अशी आहे की आपले सैन्य प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज आहे. देव न करो काही वाईट घडले तर शत्रूलाच नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे, असे नायब राज्यपाल मिश्रा म्हणाले.
 
नायब राज्यपालांचे हे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दाव्यास प्रत्युत्तर आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कारगिल येथे येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केल्याचा दावा केला होता. त्यानंतर काही दिवसांनी चीनने नवा नकाशा जारी करून यामध्ये अक्साई चिन हा चीनचा भाग म्हणून दाखवला होता. आला होता. या नकाशाबाबतही राहुल यांनी चीनची तळी उचलून धरली होती.
 
भारतीय सैन्य सज्ज आहे – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) आणि चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्कर ‘ऑपरेशनसाठी नेहमीच तयार’ स्थितीत सज्ज आहे. त्यामुळे भारताच्या सीमेत कोणालाही घुसखोरी करू देणार नाही आणि तसा प्रयत्न जरी झाला, तरी त्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल; असे भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले आहे.
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.