बबनराव घोलप यांचा ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा!

    11-Sep-2023
Total Views |
 
Babanrao Gholap
 
 
मुंबई : ठाकर गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी व्हॉट्सअॅपद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राजीनामा पाठवला आहे. पत्रकार परिषद घेत बबनराव घोलप यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, हे जे ४० लोकं निघून गेलेले, आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला चांगली बांधणी केली पाहिजे. त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी निवड करण्यासाठी सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली, असं बबनराव घोलप म्हणाले. बबनराव घोलप यांना खासदार संजय राऊतांनी भेटायला बोलावले होते. आज (११ सप्टें.) घोलप राऊतांना भेटायला गेले आहेत.
 
"मी त्यांना कालच राजीनामा पाठवला आहे. मी गेली ५५ वर्ष शिवसेनेत काम करतो आहे. १९६८ ला माझ्या शाखेचं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मी ५५ वर्षे झाले, शिवसेनेत काम करत आहे, त्यांनी मला काढून टाकावं, मी बाहेर जाणार नाही.मला संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानं कामाला लागलो होतो. मी संपर्कप्रमुख झाल्यावर चांगली तयारी केली. मला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला पण पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता त्यामुळं त्यात बदल केला, पण त्याला मुंबईतून स्थगिती दिली. यानंतर काम सुरु होतं. ३५ शाखांची स्थापना केली होती. उद्धव ठाकरे यांचा नुकताच दौरा झाला, त्या दौऱ्याची माहिती मला देण्यात आली नव्हती."
 
"भाऊसाहेब वाकचौरे गद्दार होते ते शिवसेना सोडून गेले होते. वाकचौरेंनी कोर्टात केलेल्या केसेस सुरु आहेत पण त्याला पक्षात घेतलं. ते वाकचौरे आता प्रचार करत असताना, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वाकचौरेंना जर उमेदवार करायचे होते, तर मला का सांगितलं? उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात वाकचौरे यांनाच पुढे पुढे करण्यात आले. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कॅमेऱ्याजवळ जात होते त्यावेळी मिलिंद नार्वेकर वाकचौरेंना पुढं ढकलत होते. त्यानंतर मी घरी गेलो उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होतो पण दुसऱ्याच दिवशी सामनामध्ये माझं संपर्कपद काढून घेतल्याचे छापून आले. माझ्याशी अशी वागणूक असेल तर शिवसैनिकांचं काय असेल म्हणून मी हातानं राजीनामा लिहिला आणि व्हाटसअपवर राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला." असं बबनराव घोलप म्हणाले.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.