मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील बुलंद आवाज म्हणजे शिंदे घराणे. गेली अनेक दशके श्रोत्यांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे याचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. कुटुंबातील तरुण आवाज हरपल्याने शिंदे कुटुंबियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे कुटुंबातील दिनकर शिंदे यांचा मुलगा सार्थक शिंदे याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती आहे. ३१ जुलै रोजी त्यानं अखेरचा श्वास घेतला. तबला आणि ढोलवादक म्हणूनही तो लोकप्रिय होता.
सार्थक याच्या निधाननं शिंदेशाहीतला एक तारा निखळ्याच्या भावना चाहते व्यक्त करत आहेत. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे याने एक पोस्ट शेअर करत चुलत भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. तुझ्या सारखा कलाकार होणे नाही, तुझी खूप आठवण येईल, असं उत्कर्षने म्हटले आहे. दरम्यान, सार्थक भीम गीतांच्या कार्यक्रमांसाठी लोकप्रिय होता. त्याच्या गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्राभर झाले आहेत. अशात तरुण गायकाने अचानक घेतलेली एग्झिट मनाला चटका लावून गेली आहे. सार्थक शिंदे याचं नांदेड इथं निधन झालं. सार्थकच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सार्थक गायक होताच, पण उत्कृष्ट तबला वादकही होता.