शाश्वत जल ‘जीवना’साठी...!

    24-May-2023
Total Views |
Sustainable water for Life

१९९०च्या दशकाच्या प्रारंभीपासून जगातील निम्म्याहून अधिक मोठे सरोवर, तलाव, जलाशय लक्षणीय आकुंचन पावले आहेत. कृषी, जलविद्युत आणि एकूणच मानवाने पाण्याचा अतिवापर केला. यासह हवामान बदल, जागतिक तापमानवाढीमुळे जलाशयांचा र्‍हास होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. परंतु, पाणीप्रश्न मिटवणे हे केवळ शासन-प्रशासनाचे काम नव्हे. सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी जलसाक्षरता निर्माण करून, शासनाच्या योजना यशस्वीपणे लोकसहभागातून राबवून या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे.

जल, भूमी, वायू, अवकाश, अग्नी या पंचशक्तीमुळे मानवी अस्तित्व आजही टिकून आहे आणि भविष्यातही मानवाचे अस्तित्व याच तत्वांमुळे अबाधित राहणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बेसुमार वाढलेली लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे झालेला निसर्गाचा र्‍हास आता मानवाच्या मुळावर उठला आहे. यासंबंधीची माहिती नुकतीच आणखीन एका अहवालातून जगासमोर आल्याने पुनश्च जागतिक चिंतेत भर पडली आहे.

१९९०च्या दशकाच्या प्रारंभीपासून जगातील निम्म्याहून अधिक मोठे सरोवर, तलाव, जलाशय लक्षणीयरित्या आकुंचन पावल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. मानवाने पाण्याचा कृषी, जलविद्युत यासह केलेला अतिवापर तसेच हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे जलाशयांचा र्‍हास होऊन जलसाठे संकुचित झाल्याचा अहवाल नुकताच एका संशोधनातून समोर आला आहे. संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने प्रसिद्ध केलेला हा अहवाल सांगतो की, जगातील काही सर्वात महत्त्वाचे जलस्रोत-युरोप आणि आशियामधील कॅस्पियन समुद्रापासून ते दक्षिण अमेरिकेतील टिटिकाका सरोवरापर्यंत, अनेक जलाशयातील जलसाठ्यांमध्ये गेल्या तीन दशकांत दरवर्षी सुमारे २२ गिगाटन इतक्या मोठ्या दराने जलर्‍हास झाला. जलाशयातील हे घटलेले पाणी अमेरिकेतील सर्वात मोठा जलाशय ‘लेक मीड’च्या सुमारे १७ पट अधिक आहे. यावरून केवळ या संकटाची कल्पना यावी.

सायन्स जर्नलमध्ये जलाशयांच्या घटत्या आकारमानाविषयक अभ्यासगटाचे नेतृत्व करणारे व्हर्जिनिया विद्यापीठ येथील जलशास्त्रज्ञ फँगफांग याओ सांगतात, जागतिक तापमानवाढ आणि मानवी जलवापरामुळे नैसर्गिक सरोवरांमध्ये ५६ टक्के जल घट झाली. अर्थात, त्यातील अधिक मोठा वाटा तापमानवाढीचा असला, तरी बेसुमार जलवापर वसुधंरेला हानी पोहोचवण्यासह मानवी अस्तित्व धोक्यात आणत आहे. गंभीर बाब म्हणजे, हवामान बदलामुळे जगातील कोरडे भाग अधिकच कोरडे होण्यासह अतिपावसाचे प्रदेश, जिथे ओला दुष्काळ असतो, ते अधिकच जलमय झाले आणि यापुढेही असे होणार. अधिक पावसाच्या प्रदेशातही पूर्वीपेक्षा जलाशयातील पाण्याचे लक्षणीय नुकसान झाल्याची आकडेवारी धोक्याची घंटाच समजावी.

शास्त्रज्ञांनी हवामान व ‘हायड्रोलॉजिकल मॉडेल्स’सह उपग्रहाद्वारे मोजमाप वापरून जगभरातील तब्बल दोन हजार मोठ्या तलावांचा अभ्यास केला. त्यानंतर समोर आलेले असे हे सगळे वास्तव धक्कादायक आहे. मानवाची अशाश्वत उपभोग पद्धती, पर्जन्यमानातील बदल, जलाशयातील गाळ आणि वाढलेले तापमान, यामुळे जगातील तलाव, सरोवरांची पातळी धोकादायकरित्या खालावली आहे. १९९२ ते २०२० या २८ वर्षांत जगातील ५३ टक्के तलावांमधील जलसाठ्यात विलक्षण घट नोंदवली गेली. अशी ही सगळी परिस्थती गंभीर असली, तरी अजून हाताबाहेर गेलेली नाही. मानवाने निसर्गाचे शोषण करणार्‍या जीवनशैलीपेक्षा ‘दोहन’ करणारी शाश्वत जीवनशैली स्वीकारली, निसर्गाची प्रचंड हानी न करता विकास, पाण्याचा बेसुमार वापरावर अंकुश, जलपुनर्भरण, पाणी जमिनीत मुरण्यासाठी शक्य तितक्या उपयायोजना आवश्यक ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हरितगृह आणि कर्बवायू उत्सर्जन करणार्‍या उद्योगांवर अंकुश, निर्बंध लावता येणे शक्य आहे.

जलसंकट बघता, भारत सरकारही यादृष्टीने प्रयत्नशील असून, ‘मिशन अमृत सरोवर’सारखे उपक्रम सध्या राबविले जात आहेत. राज्य शासनातर्फेही ‘जलयुक्त शिवार’ अभियानाद्वारे योग्य उपक्रम राबवला जात असून त्याचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी शिवारातच अडविणे, भूगर्भातील जलपातळीत वाढ करणे, पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, शेतात छोटी कृत्रिम तळी निर्माण करणे, भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे, विकेंद्रित जलसाठा निर्माण करणे, अस्तित्वात असलेले पण निकामी बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे जलस्रोतांची साठवण क्षमता वाढविणे जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढणे, पाण्याच्या ताळेबंद व कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती करणे आणि वृक्षलागवडीस प्राधान्य देणे, असे उपक्रम सरू आहेत. उपक्रमाची उत्तम फळे राज्यात दिसत आहेत.सरोवरे, तलावांच्या आकारात घट म्हणजे नैसर्गिक संकट असे मानत नागरिक, स्वयंसेवी संघटनांनीही याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

पाणीप्रश्नावर केवळ सरकार, प्रशासनच काम करणार, या मानसिकतेतून बाहेर पडत नागरिकांमध्ये जलसाक्षरता निर्माण होण्यासह ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ चळवळ अधिक गतिमान व्हावी. पाण्याचा अपव्यय करणार नाही, अशी शपथ सर्वांनीच घेण्याची वेळ आलीय आहे. स्वयंसेवी संस्थांकडून नागरिकांमध्ये जलजागृती करण्यासह नदी, तलावातील गाळ काढणे, आदी कार्यही अपेक्षित आहे. तेव्हा, लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधी एकत्रपणे काय करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘शिरपूर पॅटर्न,’ उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील निवृत्त भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर याच्या संकल्पनेतून अमरीश पटेल यांच्या सहकार्याने २००६ सालापासून जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य होत आहे. ‘शिरपूर पॅटर्न’ नावाने ओळखल्या जाणार्‍या जलसंधारण कामाचे आदर्श ‘मॉडेल’ झाले आहे. तेव्हा, हाच वसा, गावोगावी, शहरांमध्ये अंगीकारला जावा, हीच अपेक्षा!

निल कुलकर्णी


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.