जम्मू – काश्मीरमध्ये एनआयएची दहशतवादविरोधी कारवाई

जी २० परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क

    20-May-2023
Total Views |
nia

नवी दिल्ली
: जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर येथे होणाऱ्या जी २० परिषदेपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुलवामा आणि हंदवाडा यासह एकूण ७ जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. दहशतवादी जाळ्याशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

भारताने जी २० परिषदेच्या बैठकांचे आयोजन जम्मू – काश्मीर येथेही केले आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून बैठकीदरम्यान दहशतवादी कृत्ये करण्याचे मनसुबे आखत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याविरोधात कारवाईस प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत प्रदेशातील पुलवामा आणि हंदवाडासह अन्य जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली जात आहे. यामध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधित कट्टरतावादी आणि दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत.

तपास आणि सुरक्षा यंत्रणांनी गेल्या २० दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ७० ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेक भूमिगत आणि भूमिगत संशयितांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच एनआयएने दहशतवाद्यांना निधी पुरवण्याचे अनेक स्रोतही शोधून काढले आहेत. यामध्ये एनआयएसोबत सीआरपीएफ आणि जम्मू – काश्मीर पोलिसांचीही पथके कार्यरत आहे. दरम्यान, जी २० परिषदेअंतर्गत २२ ते २४ मे २०२३ या श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही बैठक होणार आहे. या बैठकीत जी २० पर्यटन गटातील लोक सहभागी होणार आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.