शाश्वत विकास...एक ध्येय!

    15-May-2023
Total Views | 193

sustainable development goals


शाश्वत म्हणजे पिढ्यानपिढ्या टिकणारा! शाश्वत विकास म्हणजे आर्थिक विकासच, पण तो साधत असताना नैसर्गिक साधनसंपदांचा र्‍हास केला जात नाही. हा नाजूक समतोलसाधण्यासाठी 2000 मध्ये ‘सहस्त्रकातील विकास ध्येय’ ही संयुक्त राष्ट्र संघाने ठरवली होती. त्यानुसार 2015 पर्यंत आठ महत्त्वाची उद्दिष्टेे संपूर्ण जगाला साध्य करायची होती. यात आत्यंतिक दारिद्य्र, भूक या दोन्हीचे निर्मूलन करून स्त्री-पुरुष समानता आणि बालमृत्यूचा दर कमी करणे ही महत्त्वाची ध्येय ठरवण्यात आली होती. यातील काही थोड्याफार प्रमाणात पूर्ण झालीही. सप्टेंबर 2015 मध्ये राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीने अनेक चर्चा व परिषदांच्यानंतरजगातील जवळजवळ सर्व राष्ट्रांचे एकमत होऊन शाश्वत विकासाची ही 17 उद्दिष्टे ठरली. 2030 पर्यंत ती सुफळ-संपूर्ण करण्याचा प्रयत्न होता.



या 17 ध्येयांमध्ये सार्वत्रिकता, एकात्मता, परिवर्तन हे मुद्दे समान होते. याचाच अर्थ असा की, प्रत्येक ध्येय सार्वत्रिक आहे. शहर, व्यापार, शाळा, संस्था अशा विविध ठिकाणच्या घटकांना ते समानच आहे. ही सर्व ध्येय एकमेकांत गुंतलेली असून केवळ एक ध्येय साध्य करताना इतरही साध्य होत जातात. यालाच एकात्मकता म्हणतात. यामध्ये पहिली सहा ध्येय समाजसुधारणेसाठी, सात ते बारा आर्थिक विकासासाठी, तेरा ते पंधरा पर्यावरणीय समस्या तर शेवटची दोन शासनाने पुर्ण करावयाची उद्दीष्टे आहेत. सर्व ठिकाणांहून दारिद्य्रांचा संपूर्णतः विनाश करणे हे पहिले उद्दिष्ट असले तरी परंतु प्रत्यक्षात अद्याप विकसनशील देशात जवळजवळ 85 कोटी लोक अतिशय दारिद्य्रात राहतात. यांना अर्थाजन करता येत नसल्यामुळे तसेच साधन संपदांचा वापर करता येत नसल्यामुळे त्यांच्यात शाश्वत जीवनशैली निर्माण होऊ शकत नाही. दारिद्य्राच्या सोबतच भूक आणि कुपोषण या समस्या निर्माण होतात. तसेच, शिक्षणाच्या संधी व इतर मूलभूत सेवा यांना हा मोठा गट वंचित राहतो. शिवाय त्यांना सामाजिक पक्षपात सहन करावा लागतो. दुसरे महत्त्वाचे ध्येय म्हणजे भुकेचे निर्मूलन करणे. सर्व देशांतील प्रत्येक व्यक्तीला अन्नसुरक्षा आणि सुधारित पोषण मिळाले पाहिजे. यासाठी शाश्वत पद्धतीच्या कृषितंत्राचा वापर झाला पाहिजे. परंतु, प्रत्यक्षात आपल्या मृदेची हेळसांड होते आहे आणि तसेच जैवविविधता अतिशय वेगाने कमी होते आहे. हवामान बदलाच्या संकटामुळे सतत येणारे दुष्काळ किंवा पूर या दोन्हीही बाबी या नैसर्गिक साधनसंपदा नष्ट करत आहे. अन्नधान्याची उपलब्धता आणि त्यातील पोषकता कमी होत आहे.


प्रत्येक व्यक्ती आरोग्यपूर्ण राहण्यासाठी त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध असल्या पाहिजेत. विकसनशील देशांत महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्य सेवा पुरवता आल्या पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीत आयुमर्यादा वाढली आहे. तसेच, बालमृत्यूचे आणि माता मृत्यू दराचे प्रमाण कमी झाले आहे. तरीदेखील याबाबत आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. हवामान बदलामुळे निरनिराळे रोगकारक सजीव, विषाणू यांच्या प्रजातीत वाढ होत आहे, असा अंदाज आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांवर ताण येतो. ‘चिकनगुनिया’ आणि ‘डेंग्यू’सारखे रोग वाढत्या तापमानामुळे सर्वदूर पसरत आहेत. ‘कोविड’च्या संकटाने उडवलेला हाहाकार अजून ताजा आहे.


गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व मुली-मुलांना समानतेने आणि परिणामकारकरित्या मिळायला पाहिजे. मात्र, अजूनही दहा कोटींहून जास्त लोकांमध्ये मूलभूत साक्षरतादेखील दिसून येत नाही. यात 60 टक्के स्त्रिया आहेत. स्त्री पुरुष समानता आणि याचसोबत महिला व मुली यांच्यासाठी सबलीकरणाच्या विविध योजना राबवणे हेही महत्त्वाचे. प्रत्यक्षात मात्र जगातील दोन तृतीयांश अविकसित देशांमध्ये दोन तृतीयांश मुली व स्त्रियांना स्त्री-पुरुष भेदाचा सामना करावा लागतो. स्त्रीवर होणारी हिंसा ही तर जगातील प्रत्येक भागात दिसून येते.


प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या सोयी मिळायला हव्या. आज पृथ्वीवर शिल्लक असणारे पिण्यायोग्य पाण्याचे विनिमय व व्यवस्थापन करणे जरुरी आहे. तापमानामध्ये होत चाललेल्या वाढीमुळे पाण्याच्या उपलब्धतेची घट होत आहे. त्यामुळे 2050 पर्यंत प्रत्येकी चार लोकांमागे एकाला शुद्ध पाण्याचा तुटवडा सहन करायला लागेल, असा अंदाज आहे. 7.7 कोटी लोकांना अद्याप सुरक्षित पाणी उपलब्ध नाही. ‘स्वच्छ भारत अभियान’ यासारख्या योजनांमुळे उघड्यावर शौचाला जाणे या बाबींवर थोडा तरी अंकुश आला. 76.9 कोटी लोक स्वच्छतेच्या सोयीपासून वंचित आहेत. भारतासारख्या विकसित होऊ पाहणार्‍या देशात अद्याप 60 कोटी लोक उघड्यावर शौचाला जातात, हा जगभरातील उच्चांक आहे. स्वच्छतेच्या सोयींची वानवा असल्यामुळे भारतामध्ये दररोज 1 हजार, 600 मृत्यू अतिसाराने होतात. केवळ 14 टक्के ग्रामीण जनतेला शौचालय उपलब्ध असल्यामुळे भारताच्या ग्रामीण भागात शौचालयांचा वापर अतिशय कमी आहे.



सर्वांना सहज परवडेल अशी खात्रीलायक आणि शाश्वत आधुनिक ऊर्जा निर्मिती केली पाहिजे. गेल्या काही वर्षात सौरऊर्जा निर्मितीसाठी येणारा खर्च बर्‍याच प्रमाणात कमी होत आहे. आर्थिक विकास गाठण्यासाठी सर्व लोकांना प्रतिष्ठापूर्वक व्यवसाय करता आला, तर दारिद्य्र संपुष्टात येईल का? शाश्वत आर्थिक विकास साधताना प्रत्येक समाजामध्ये गुणवत्तापूर्वक काम करण्याची संधी, पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही याकडे लक्ष देऊन केले पाहिजे. पायाभूत सुविधा आणि औद्योगिक क्षेत्र चांगल्या पद्धतीने विकसित झाले पाहिजे. ज्या नवीन सुविधा निर्माण होत आहे, त्या शाश्वतच असल्या पाहिजे. विशेषतः वाहतूक, ऊर्जा निर्मिती आणि दूरसंचार याबाबतीत!


देशातील तसेच विविध राष्ट्रातील माणसांच्या मनातली असमानतेची परिस्थिती संपुष्टात आली पाहिजे. त्यासाठी तशी धोरणे राबवणे आवश्यक आहे. सर्व शहरे सुरक्षित आणि शाश्वत असावी. शहरांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षणाच्या संधी इत्यादी बाबी चांगल्या असतात त्यामुळे येथे स्थलांतर करून येणार्‍यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र, त्यामुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताण येतो आणि दुर्बलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो.


शाश्वत वापर आणि उत्पादन या दोन्ही बाबी साध्य करायच्या असतील, तर शाश्वत जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. उदाहरणार्थ मोठ्या संख्येने होत असलेला चारचाकीचा वापर हे अशाश्वत आहे. याच्यामुळे प्रदूषण, हवामान बदल अशा नकारात्मक घटना जास्त प्रमाणात होतात.


13, 14 आणि 15 ही शाश्वत विकासाची ध्येय आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध होणे शिकवते. हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार केला जात आहे. ‘शिखर’ परिषदेत ठरल्याप्रमाणे जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे येणे आवश्यक आहे. जगभरात जितका कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो त्याचप्रमाणे 1990 नंतर 50 टक्क्यांनी अधिक वाढले आहे. तसेच, हरितगृह वायू निर्मिती मानवाच्या विविध कृतींनी होत आहे. महासागर आणि सागरी जीवसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे लगोलग झाले पाहिजे. महासागराचमहत्त्व निर्विवाद आहे.कारण, पृथ्वीवरचे 97 टक्के पाणी येथे आहे. प्रथिनांचा मोठा स्रोेत असलेल्या महासागरावर तीन अब्ज लोक त्यांच्या अन्नासाठी आणि व्यवसायासाठी अवलंबून आहेत. जगभरात निर्माण होणार्‍या कार्बन डायऑक्साईडपैकी 30 टक्के समुद्र शोषून घेतो. हवामान, मान्सून आणि ऋतूचक्र महासागराच्या नियंत्रणाखाली आहे. जल परीसंस्थेप्रमाणेच भू-परिसंस्था सांभाळल्या पाहिजेत. वाळवंटीकरण रोखणे, मृदेचा नाश थांबवणे, जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन करणे यातल्या महत्त्वाच्या बाबी आहेत. जमिनीवरचे जीवन जपले तरच मानवाचे अस्तित्व टिकेल. जंगलाचे शाश्वत व्यवस्थापन करणे, पर्वत तसेच नद्या-तलाव इत्यादी नैसर्गिक अधिवासांचे 2030 पर्यंत योग्य व्यवस्थापन व्हावे, अशी इच्छा असल्यास वनीकरण मोहिमा घेतल्या जातात. न्यायव्यवस्था बळकट करणे आणि जागतिक पातळीवर शाश्वत विकासासाठी भागीदारी करणे या बाबी जागतिक स्तरावरील शांततापूर्ण जीवन प्रस्थपित करेल. आपल्या शाश्वत जीवनशैलीमुळेचउद्याचे आपले वंशज सुखाने जगू शकतील, या कारणासाठी का होईना आपण आता आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवेत.


शाश्वत विकासाची उद्दिष्टे!

सामाजिक
दारिद्य्र निर्मूलन
शून्य भूक
उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य
गुणवत्तापूर्ण शिक्षण
स्त्री-पुरुष समानता
निर्जंतुक पाणी व स्वच्छतेच्या सोयी
आर्थिक
स्वच्छ, सहज परवडेल अशी ऊर्जा
सभ्य, साजेसा रोजगार आणि आर्थिक वाढ
उद्योग, कल्पकता आणि पायाभूत सोयीसुविधा
असमानतेत घट
शाश्वत शहरे आणि समाज
जबाबदार वापर आणि उत्पादन
पर्यावरणीय
हवामानबदल रोखण्याविषयीची कृती
जलातील जीवन
जमिनीवरचे जीवन
शासकीय
शांतता आणि न्याय, सुदृढ शासन
ध्येयासाठी भागीदारी

- डॉ. नंदिनी देशमुख 


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121