‘अंत्योदया’चे पंचामृत

    09-Mar-2023
Total Views |
Editorial on Maharashtra State Budget 2023-24 presented by Devendra Fadnavis

 
देवेंद्र फडणवीसांनी काल विधिमंडळात सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे ‘अंत्योदया’चे पंचामृतच! केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांना पूरक, राज्याच्या सर्वांगीण विकासाला समर्पित, सर्व जातीधर्म-व्यवसायांना सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक, संतुलित अर्थसंकल्प निश्चितच महाराष्ट्राचा भाग्योदय करणारा ठरेल.
 
"कुठल्याही आर्थिक योजना आणि एकूणच आर्थिक प्रगतीचं मोजमाप हे समाजात वरपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीपासून नव्हे, तर खालच्या स्तरावरील विद्यमान व्यक्तीपासून होईल,” असा ‘अंत्योदया’चा समग्र विचार जनसंघाचे नेते, थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी देशासमोर मांडला. दीनदयाळजींच्या ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानव दर्शना’च्या सिद्धांतानुसारच आजतागायत भारतीय जनता पक्षाची केंद्रीय स्तरापासून ते अगदी पंचायत पातळीपर्यंत घोडदौड सुरू दिसते. त्यामुळे भाजपच्या विकासदृष्टीचे आणि विजयाचे खरे गमक याच ‘अंत्योदया’च्या विचारात दडले आहे. म्हणूनच अटलजींनी दीनदयाळजींना श्रद्धांजली अर्पित करताना मांडलेले विचार आज उद्धृत करावेेसे वाटतात. अटलजी म्हणतात, “दीनदयाळजी जरी आपल्यातून गेले असले तरी त्यांचे विचार आपल्यासोबत कायम राहतील आणि दीनदयाळजींच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून राष्ट्रवादी विचारसरणीचे कार्यकर्ते निर्माण होतील.” अटलजींनी केलेली ही भविष्यवाणी आज हिंदुस्थानाच्या अगदी तळागाळात प्रत्यक्षात अनुभवास येते. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रातील देवेंद्रच्या ‘डबल इंजिन’ सरकारने दीनदयाळजींच्या ‘अंत्योदया’ला केंद्रस्थानी ठेवूनच देशात, राज्यात विकासगंगा प्रवाहित केली. कालचा देवेंद्र फडणवीसांनी अर्थमंत्री म्हणून प्रथमच सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्पही याच ‘अंत्योदया’च्या विचारांना सर्वार्थाने समर्पित म्हणावा लागेल.

दूध, दही, तूप, साखर आणि मध अशा पाच घटकांपासून तयार होणारे पवित्र पंचामृत. देवपूजेनंतर तीर्थप्रसाद म्हणून दिल्या जाणार्‍या पंचामृतामुळे शरीर आणि मनाची शुद्धी होते, असे म्हणतात. त्याच प्रकारे राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाचे पंचामृत फडणवीसांनी सादर करून महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्ल्यूप्रिंट’च अर्थसंकल्पातून सादर केली. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती, पर्यावरणपूरक विकास असे हे फडणवीसांनी मांडलेले पंचामृत. अर्थात, या पाच घटकांना केंद्रस्थानी ठेवून फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाकडे पाहिल्यास, त्यांनी यासाठी केलेला सूक्ष्म-संशोधनपूर्ण अभ्यास, विविध समाजघटकांच्या, कामगारांच्या मागण्यांची घेतलेली सुयोग्य दखल, विदर्भापासून ते कोकणापर्यंत प्रत्येक विभागाला दिलेला समान न्याय या बाबी अगदी वाखाणण्यासारख्याच! विशेषकरुन सध्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल आहे. हातातोंडाशी आलेला घास यंदा पुन्हा निसर्गाने बळीराजाच्या तोंडून हिसकावून घेतला. फडणवीस-शिंदे सरकारने तत्काळ पंचनाम्याचे, मदतीचे आदेशही दिले. पण, प्रशासकीय कारभार बघता ही प्रक्रिया वेळखाऊ आणि तितकीच किचकट. म्हणूनच अशा नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आगामी काळात मोबाईल, उपग्रहांच्या माध्यमातून ‘ई-पंचनामे’ अशी अभिनव कल्पना फडणवीसांनी मांडली.

ज्याचे आगामी काळात निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्याशिवाय कृषिक्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी जलयुक्त शिवार, सिंचन योजना, वैनगंगा-पैनगंगासारखे नदीजोड प्रकल्प, महाकृषी अभियान, शेतकरी सन्माननिधी, पीक एकात्मिक आराखडा, एक रुपयात पीकविमा अशा कित्येक योजनांतून हे सरकार बळीराजासाठी कटिबद्ध असल्याचेच सरकारने दाखवून दिले. कृषीबरोबरच अन्नप्रक्रिया उद्योगावरही फडणवीसांनी अर्थसंकल्पातून विशेष लक्ष केंद्रित केले. संत्रा प्रक्रिया केंद्र, काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना, श्री अन्न अभियान यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणाही राज्यातील कृषिक्षेत्राला सर्वार्थाने सक्षम करणार्‍या ठराव्या. त्यामुळे शेतीच्या कुशल तंत्रापासून ते अगदी शेतमालाच्या विक्रीपर्यंत कृषिक्षेत्राचा सूक्ष्मातीत विचार या अर्थसंकल्पातील योजनांमधून प्रतिबिंबित होतो. कृषीबरोबरच पशुपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोडधंद्यांनाही या अर्थसंकल्पात पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न फडणवीस-शिंदे सरकारने केलेला दिसतोच.

‘अंत्योदया’चे दूरगामी लक्ष्य साधायचे असेल, तर समाजातील सर्व जाती-घटकांना सोबत घेऊन त्यांचा विकास साधणे हे क्रमप्राप्तच. त्याच उद्देशाने ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’ यांसारख्या विविध समाजांच्या उन्नतीसाठी कार्यरत संस्थांसाठीही भरघोस निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवाय असंघटित कामगार, लिंगायत, गुरव, रामोशी, वडार यांसारख्या समाजांसाठी नव्याने महामंडळांची स्थापना करून ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत कार्यरत राहतील. त्याचबरोबर वनवासी, धनगर, शबरी, पारधी, अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी सरकारने विविध जनहितार्थ घोषणा केलेल्या दिसतात. महिलांच्या बाबतीतही राज्य सरकारने जाहीर केलेल्या सवलती, व्यवसाय करातील सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनातील भरीव वाढ, नव्या स्वरूपात ‘लेक लाडकी’ योजना हे सरकार महिला सक्षमीकरणाप्रती किती गंभीर आहे, याचेच द्योतक म्हणावे लागेल. एकूणच फडणवीसांनी अर्थसंकल्पातून ‘सोशल इंजिनिअरिंग’चा केलेला हा प्रयोग समाजोत्थानाबरोबरच राज्याला विकासाचा ‘बूस्टर’ देणाराच ठरावा.

कृषी आणि सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सोईसुविधांचा विकास आणि रोजगारनिर्मितीवरही फडणवीस-शिंदे सरकारने अर्थसंकल्पातून विशेष लक्ष केंद्रित केलेले दिसते. नागपूर-गोवा या राज्यातील शक्तिपीठांना, धार्मिक पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग तर राज्याला अधिकाधिक गतिमान करणारा आणि पर्यटनाला चालना देणाराच ठरेल. त्याचबरोबर लॉजिस्टिक्स पार्क, ‘आयटीआय’ची दर्जावाढ, ७५ हजार शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, स्टार्टअप्सना प्रशिक्षण यांसारख्या कित्येक प्रकल्पांतून राज्यातील रोजगारनिर्मितीलाही मोठा हातभार लागेल. त्याचबरोबर महानगरातील मेट्रो, रेल्वे, रस्ते, पूल यांचे जाळे भक्कम करून राज्याला अधिकाधिक गतिमान करण्याचा सरकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून ध्वनित होतो. अशाप्रकारे सर्वांगीण विकासाचे महाउद्दिष्ट साध्य करताना पर्यावरण आणि शाश्वत विकासालाही या अर्थसंकल्पात उचित स्थान देण्यात आले आहे. सौरऊर्जा, हरित हायड्रोजन, शैवाळ शेती, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविणे यांसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनेक पर्यटन प्रकल्प, सायबर सिक्युरिटीसंबंधी तरतुदी, आरोग्यसंबंधी सवलती, खेळांना चालना, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा, मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे, कलाकारांसाठी स्वतंत्र महामंडळ, महापुरुषांची स्मारके, धार्मिक-सांस्कृतिक वारशाचे जतन अशा राज्याच्या सर्वंकष विकासाशी जोडलेल्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प...

एकूणच फडणवीसांनी मांडलेला हा अर्थसंकल्प भविष्यातील आधुनिक महाराष्ट्राचे एक गौरवशाली चित्र डोळ्यासमोर उभा करणाराच म्हणावा लागेल. पंतप्रधानांनी जसे भविष्यात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनचा टप्पा गाठेल, यासाठी शिवधनुष्य हाती घेतले आहे. तसेच, राज्यातही फडणवीस-शिंदेंनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनपर्यंत नेण्यासाठीचा कृती आराखडाच या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्रवासीयांसमोर ठेवला आहे. त्यामुळे ‘अंत्योदया’चे हे पंचामृत निश्चितच महाराष्ट्राला सुजलाम्, सुफलाम् करणारे ठरेल, हे नि:संशय!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.