‘रुपे’ आणि ‘युपीआय’ भारताची नवी ओळख : पंतप्रधान नरेंद्र मोदी
07-Mar-2023
Total Views |
नवी दिल्ली : ‘रुपे’ आणि ‘युपीआय’ हे केवळ किफायतशीर आणि अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञान नसून ती भारताची नवी ओळख आहे. ‘युपीआय’ हे संपूर्ण जगासाठी आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाचे साधन बनले पाहिजे. भारताच्या वित्तीय संस्थांनीही त्यांचा आवाका वाढवण्यासाठी फिनटेकशी जास्तीत जास्त भागीदारी केली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. 'विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणे' या विषयावरील अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
कोरोना महामारीच्या काळात भारताच्या आर्थिक आणि पतधोरणाचा परिणाम संपूर्ण जग पाहत आहे, असे सांगत पतंप्रधानांनी याचे श्रेय गेल्या 9 वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आधारभूत गोष्टींना बळकटी देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना दिले. जेव्हा जग भारताकडे संशयाने पाहत असे त्या काळाची आठवण करून देत, पंतप्रधानांनी याकडे लक्ष वेधले की,तेव्हा भारताची अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प आणि उद्दिष्टे यावर चर्चा सुरू व्हायची तेव्हा चर्चेची सुरुवात आणि शेवटही एका प्रश्नचिन्हाने होत असे. आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातील बदल अधोरेखित करत, चर्चेच्या सुरुवातीला आणि शेवटी निर्माण होणाऱ्या प्रश्नचिन्हाची जागा विश्वास आणि अपेक्षा यांनी घेतली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
आज भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल आशास्थान म्हटले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारताकडे जी -20 चे अध्यक्षपद आहे आणि 2021-22 या वर्षात देशात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित झाली आहे, हे देखील त्यांनी अधोरेखित केले. यापैकी मोठी गुंतवणूक उत्पादन क्षेत्रात झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताला जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग बनवणाऱ्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा लाभ घेण्यासाठी सातत्याने अर्ज येत आहेत यावर भर देत सर्वांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.