मन सुद्ध तुझं...

    20-Mar-2023
Total Views |
Mind

‘मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिवि मोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची’ या पंक्ती माणसाला अडचणींवर मात करत पुढील मार्गक्रमणाची प्रेरणा देणार्‍या. मन शुद्ध, म्हणजे विचारही तितकेच सकारात्मक असतील, तर सर्वार्थाने ती व्यक्ती नकारात्मकतेवर मात करुन, शारीरिक स्वास्थ्य राखत निरोगी जीवन जगू शकते, हाच संदेश देणारा आजचा लेख...


'अमेरिकन हार्ट असोसिएशन’ मधील एका शास्त्रीय विधानानुसार, मानसिक आरोग्य तुमच्या शारीरिक आरोग्यावर आणि हृदयरोग आणि ‘स्ट्रोक’च्या जोखमीच्या घटकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकते. अनेकवेळा तणाव, खराब आरोग्यवर्तनांमध्ये व घातक सवयींवर परिणाम करू शकतो. तणाव हृदयविकार आणि ‘स्ट्रोक’च्या वाढीव जोखमीशी निगडीत वागणूक जसे की, धुम्रपान, अतिखाणे, शारीरिक हालचालींचाअभाव, अस्वास्थ्यकारक आहार, जादा वजन असणे, नियमांनुसार औषधे न घेणे अशा प्रकारच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या घटनांची साखळी तयार करतो. आपले शरीर ‘अ‍ॅड्रेनालाईन’ हे एक संप्रेरक तयार करते, ज्यामुळे आपला श्वास आणि हृदय यांची गती तात्पुरती वाढते आणि तुमचा रक्तदाब वाढतो. खरे पाहिले, तर या प्रतिक्रिया तुम्हाला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार करतात आणि लढण्याचा किंवा माघारी फिरण्याचा प्रतिसाद देतात. एकूणच काय तर तणाव शरीरावर वाईट प्रभाव टाकू शकतो, यात काही शंका नाही.


अतितणावाच्या बाबतीत तर हे सर्वार्थाने खरे ठरावे. ज्या लोकांना अचानक अत्यंत क्लेशकारक बातम्या मिळाल्या (किंचित प्रसंगी जसे की एखाद्याच्या मृत्यूची) त्यांना त्वरित हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. हा फक्त एक चिंताग्रस्त झटका नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर ‘कार्डियाक कॅथेटेरायझेशन’ प्रक्रिया करता, तेव्हा हृदयात पूर्वी उघडी असलेली धमनी आता बंद झाली आहे, असे दिसून येते.तणाव निर्माण करणारा दैनंदिन प्रवास, सततची वाहतूककोंडी, कौटुंबिक अडचणी, कामाच्या ठिकाणी समस्या असोत, या सगळ्याचा संबंध आरोग्याच्या हानिकारक प्रभावांशी जोडला गेला आहे. असा ताण तुमचा मूड, झोप आणि भूक यामध्ये देखील व्यत्यय आणू शकतो. असे म्हटले जाते की, तणावामुळे जी जळजळ निर्माण होते, ती हृदयविकारास प्रेरक आहे. परंतु, ते अद्याप सिद्ध झालेले नाही. तरीही तणाव हृदयविकारावर अधिक सूक्ष्म मार्गांनी प्रभाव टाकू शकतो आणि परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो.

मन आणि हृदय हे एकमेकांशी अतूटपणे जोडलेले आहे. नैराश्य, चिंता, एकाकीपणा, राग आणि तीव्र ताण या सर्व नकारात्मक मानसिक अवस्था आहेत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो किंवा विद्यमान हृदयविकाराच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. अचानक तणावपूर्ण बातम्या जसे की, एखाद्या प्रिय व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाले आहे, असे ऐकल्यावरच्या प्रतिसादात हृदयाला सूज येऊन ‘कार्डिओमायोपॅथी’ विकसित होते. अशा प्रकारे रागासारख्या तीव्र भावनादेखील हृदयाचा असामान्य वेग निर्माण करू शकतात. जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा तुमचा रक्तदाब आणि हृदयाची गती दोन्ही वाढते. दीर्घकालीन तणावामुळे तुमचे शरीर ‘कॉर्टिसॉल’सारख्या हानिकारक संप्रेरकांची निर्मिती करते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. या सर्व घटकांमुळे हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. नकारात्मक विचार, भावना, जीवनशैलीच्या पद्धतींवर घातक परिणाम करू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जे लोक सतत तणावग्रस्त, चिंताग्रस्त, दुःखीकिंवा रागावलेले असतात, ते जास्त प्रमाणात मद्यपान, धुम्रपान, अतिखाणे आणि अपुरा व्यायाम करण्याची शक्यता अधिक असते. या सर्व हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक सवयी आहेत.

तर मग सकारात्मक असण्याने आपले हृदयविकारापासून संरक्षण होऊ शकते का? होय! आशावादी, आनंदी, कृतज्ञता आणि जीवनात उत्तम उद्दिष्ट बाळगणे यांसारखासकारात्मक दृष्टिकोन असणे हे हृदयासाठी संरक्षणात्मक असू शकते, असे सुचवणारे बरेच संशोधनात्मक पुरावे आहेत. युकेमधील संशोधकांनी आठ हजारांहून अधिक लोकांची मानसिक वैशिष्ट्ये पाहिली आणि असे आढळले की, ज्यांनी आशावाद आणि निरोगीपणाची भावना यात जास्त गुण मिळवले, त्यांना हृदयरोग होण्याचा धोका सर्वसामान्य माणसांपेक्षा ३० टक्के कमी आहे. इतर अभ्यासकांनीसुद्धा तत्सम निष्कर्ष नोंदवले. दुसर्‍या एका ७० हजारांपेक्षा जास्त महिलांवर दहा वर्षांहून अधिक काळ केलेल्या अभ्यासात, ज्यांनी आशावादी प्रश्नावलीवर सर्वाधिक गुण मिळवले, त्यांना हृदयविकाराचा झटका आणि ’स्ट्रोक’मुळे उद्भवणारा मृत्यूचा धोका इतरांपेक्षा खूप कमी कमी होता.

मागील अनेक अभ्यासांमध्ये आशावादी वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन आणि हृदयविकाराच्या रूग्णांसाठी चांगले परिणाम यांच्यामधील ठळक दुवा आढळला आहे. परंतु, या दुव्याचे कारण समजले नव्हते. डेन्मार्कमधील एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, सकारात्मक दृष्टिकोन असलेले हृदयविकाराचे रुग्ण नकारात्मक वृत्ती असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त काळ जगतात आणि जगण्याची ही वाढ त्यांच्या वाढलेल्या व्यायामामुळे होऊ शकते. इतकेच काय, पुढील विश्लेषणातून असे दिसून आले की, सकारात्मक वृत्ती असलेले लोक जास्त काळ जगतात. कारण, त्या रुग्णांमध्ये व्यवस्थित व्यायाम करण्याची शक्यता दुप्पट होती. व्यायामाव्यतिरिक्त हृदयाच्या आरोग्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन चांगली असण्याची अनेक कारणे आहेत. एक सकारात्मक दृष्टिकोन शरीरातील तणाव संप्रेरक आणि दाहक रसायनांची पातळी कमी करू शकतो. शिवाय सकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक चांगले खाणे, चांगले झोपणे आणि धूम्रपान न करणे यांसारख्या इतर आरोग्यदायी वर्तनांचा अवलंब करतात.


ज्यांना आधीपासूनच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आहे, अशा लोकांनादेखील सकारात्मक दृष्टिकोनाचा फायदा होऊ शकतो, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण, त्यांना हृदयविकाराचा झटका आणि ’स्ट्रोक’चा धोका जास्त असतो. अमेरिकेतील ‘आरोग्य आणि सेवानिवृत्ती’ या विषयावरील अभ्यासामध्ये, आधीपासून स्थिर हृदयरोग असलेल्या सहभागींमध्ये, सकारात्मक गुणधर्म असल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा संबंध कमी जोखमीचा होता आणि आशावादी असलेल्यांमध्ये हा धोका ३८ टक्के कमी आढळला. कोरोनरी बायपास ग्राफ्ट शस्त्रक्रिया किंवा ‘स्टेंटिंग’ची आवश्यकता असलेल्या गंभीर आजार असलेल्या शेकडो रुग्णांच्या स्वतंत्र अभ्यासांमध्ये, उच्च पातळीचा आशावाद हा या प्रक्रियेनंतर विविध प्रकारच्या कमी जोखमीशी संबंधित होता. मुळात, जे लोक नकारात्मक परिस्थितीतून मार्ग काढतात, ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी होणारे ताण टाळू शकतात.म्हणूनच सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपियर म्हणतो की, चांगले हृदय हे माणसासाठी सोन्याच्या मोलाचे आहे!

-डॉ. शुभांगी पारकर



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.