‘लाओजियान’ नरेंद्र मोदी...

    20-Mar-2023
Total Views |
Editorial on Modi the immortal: Chinese netizens think Indian PM is different, amazing, says report

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैश्विक प्रसिद्धीवर गेल्या नऊ वर्षांत अनेकदा शिक्कामोर्तब झाले. मोदींनी घेतलेल्या जागतिक नेत्यांच्या भेटीगाठींपासून ते अगदी प्रभावशाली व्यक्तींच्या यादीपर्यंत मोदींचा करिष्मा सर्वत्र झळकला. पाकिस्तानातही मोदींचा जयजयकार झाला. मग चिनी तरी कसे मागे राहतील म्हणा! चिनी समाजमाध्यमांवर तेथील नागरिक मोदींचा चक्क ‘लाओजियान’ अर्थात एक अमर, जगावेगळी व्यक्ती असा उल्लेख करतात. पण, त्यामागचा अन्वयार्थ समजून घ्यायला हवा.

'मोदी...मोदी...मोदी....’ अशी ही दोनाक्षरी घोषणाबाजी आता भारतीयांच्या आणि खरंतर जगाच्याही तितकीच अंगवळणी पडलेली. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातच नव्हे, तर परदेशातही संपादित केलेला अभूतपूर्व विश्वास आणि कमावलेला मानसन्मान. स्वकर्तृत्वाने आकारास आलेले ‘मोदी’ नावाचे असे हे लोकनेतृत्व. मागील नऊ वर्षांत मोदींच्या विदेशातील प्रसिद्धीचे दाखले देणार्‍याही कित्येक घटना घडल्या. विशेषकरून रशिया-युक्रेन युद्धावर मोदींनी ‘हे युद्धाचे नव्हे, संवादाचे युग आहे’ असा स्पष्ट संदेश दिला. नुकतीच मोदींच्या या भूमिकेची ‘नोबेल समिती’चे नेते तोजे यांनीही विशेष दखल घेतली. त्यामुळे मोदींची जगमान्यता ही तशी सर्वश्रुत. इतकेच काय, तर शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानातही ‘आम्हालाही मोदींसारखा पंतप्रधान हवा’ म्हणून जनमत आकारास आलेले दिसते. पण, सहसा ‘जागतिक’, ‘वैश्विक’ असे शब्दप्रयोग करताना त्यातून चीन मात्र आपसुकच वजा होता. त्याचे कारण म्हणजे, कम्युनिस्ट चीनच्या उंच भिंतींआड नेमके काय शिजते, ते सहजासहजी बाहेर येऊ दिले जात नाही. परंतु, सोशल मीडिया आणि आजच्या इंटरनेटच्या मायाजालाने चीनच्या या कधीकाळी अभेद्य समजल्या जाणार्‍या भिंतींनाही म्हणा तडे गेले आहेत. कारण, चीनमधील एका पत्रकाराच्या लेखातून, चिनी नागरिक मोदींबद्दल, भारताबद्दल नेमका काय विचार करतात, याची समोर आलेली माहिती रंजकच म्हणावी लागेल.

चिनी समाजमाध्यमांचा खोलवर अभ्यास करून त्यावर लेख लिहिण्यात पत्रकार मू चुनशान यांचा हातखंडा. त्यांचा नुकताच ऑनलाईन साप्ताहिक असलेल्या ‘द डिप्लोमॅट’मध्ये ‘मोदींबद्दल चिनी नागरिक काय विचार करतात’ या आशयाचा एक लेख प्रसिद्ध झाला. कदाचित हाच प्रश्न आपल्याला पडला असता तर, भारत-चीन संबंध लक्षात घेता, जो विचार आपण चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल करतो, तसाच काहीसा विचार चिनी मोदींबद्दल करत असावेत, असा अंदाज बांधता आला असता. परंतु, चुनशान यांनी लिहिलेल्या लेखात चिनी समाजमाध्यमांवर मोदींचा उल्लेख ‘लाओजियान’ (चेवळ ङरेुळरप)असा होत असल्याचे दिसून आले. ‘लाओजियान’ म्हणजे अमर आणि गूढ शक्ती लाभलेली वृद्ध व्यक्ती. त्यामुळे चिनी नेटिझन्सचा मोदींबद्दलचा हा काहीसा अनपेक्षित आणि अजब प्रतिसाद चिनी जनमताचा एक प्रातिनिधिक कौल स्पष्ट करणाराच म्हणावा लागेल.

ट्विटरप्रमाणे ‘विबो’ हे चीनमधील एक सुप्रसिद्ध समाजमाध्यम. जवळपास ५६४ दशलक्षाहून अधिक नेटिझन्स ‘विबो’चा सक्रियपणे वापरतात. याच ‘विबो’वर मोदींविषयीचे चिनी नेटिझन्सचे हे विचार पत्रकार चुनशान यांनी अचूक हेरले. इतकेच नव्हे, तर सहसा चिनी नागरिक आंतरराष्ट्रीय नेत्यांना अशी टोपणनावे देण्याच्या भानगडीत पडत नाही, असेही चुनशान आपल्या लेखात नमूद करतात. चिनी नेटिझन्सना केवळ मोदींच्या वेशभूषेचेच नव्हे, तर त्यांनी भारतात राबविलेल्या ध्येय-धोरणांचे, जागतिक पातळीवर मोदींच्या भूमिकांचेही आकर्षण असल्याचे यावरून सिद्ध होते. म्हणजे एकीकडे भारत-चीन संबंध अतिशय नाजूक पातळीवर असले तरी चिनी नेटकर्‍यांचे मोदींविषयीचे मत त्यावरून फारसे प्रभावित झालेले दिसत नाही, असाही एक निष्कर्ष या लेखातून समोर येतो.

खरंतर २०१४ साली मोदींनी सत्तेत आल्यानंतर चीनशीही सुसंबंध प्रस्थापित करण्याचे धोरण अवलंबले. मोदी चीनला गेले, जिनपिंग यांचेही भारत दौरे झाले. एवढेच नाही, तर मोदींनी २०१५ साली ‘विबो’वर आपले खातेही उघडले. भारताने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली तेव्हा हे खाते डिलीट करण्यात आले. त्यावेळीही मोदींचे ‘विबो’वर २.४४ लाख फॉलोवर्स होतेच. तसेच डोकलाम असेल अथवा गलवान, दोन्ही संघर्षांप्रसंगी भारताने चिनी सैनिकांना धूळ चारली. चीनच्या सीमेवरील आगळीकीला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. याउलट चिनी सैनिकांची त्यांच्याच देशात चि-थू झाली. हा एकूणच घटनाक्रम पाहता, मोदी हे इतर देशांच्या नेत्यांसारखे चीनसमोर झुकणारे नसून ते वेगळे आणि तितकेच शक्तिशाली आहेत, यावर चिनी नेटकर्‍यांचाही विश्वास बसलेला दिसतो. तसेच भारत-पाकिस्तानमधील दरी वाढत असून चीनचेही भारताशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावे, असेही चिनी नेटकर्‍यांना वाटते. एकीकडे मोदींविषयी असे कौतुकोद्गार काढले जात असताना, भारताचे अमेरिका-रशियाशी संबंध चांगले आहेत. हे भारताने नेमके कसे साध्य केले? भारताचा जागतिक मित्रपरिवार इतका मोठा कसा? यांसारखे प्रश्नही चिनी नेटकर्‍यांनी चर्चिल्याचे हा लेख सांगतो.

दुसरीकडे भारतापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, ही चिन्यांची भावना असली तरी अमेरिकेच्या जवळ जाणार्‍या भारताशी तरीही चीन चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो, असाही एक चर्चेचा सूर चुनशान अधोरेखित करतात. तेव्हा, एकूणच चिनी नेटिझन्सच्या मतांकडे बारकाईने लक्ष दिले असता, त्यांच्या मनात भारताविषयी कटुतेपेक्षा स्वश्रेष्ठत्वाचीच भावना अधिक असल्याचे जाणवते. तसेच मोदींच्या नेतृत्वातील भारताने जगात आज आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केल्याचेही चिनी नागरिक मान्य करतात, ही बाबदेखील यावरून अधोरेखित व्हावी.खरंतर चिनी नागरिकांना भारताविषयी काय वाटते, हे समाजमाध्यमे नसती तर आज कदाचित इतके स्पष्टपणे समजूही शकले नसते. कारण, चिनी माध्यमांमध्ये सातत्याने होणारे भारतविरोधी आणि एकांगी वार्तांकन. सरकारी प्रपोगंडा आणि कम्युनिस्ट अजेंडा रेटण्यामध्ये तर चीनचा हात जगात कुणी धरुच शकत नाही. पण, चुनशान यांच्या लेखाच्या निमित्ताने का होईना, चिनी जनमानस नेमका भारताबद्दल काय विचार करते, हे तरी जगासमोर आले. त्यामुळे आपल्या नागरिकांमध्ये कायमच भारताविषयी नकारात्मक चित्रण रंगवणार्‍या चीनच्या भ्रमाचाही भोपळाही यानिमित्ताने फुटला, असेही म्हणायला पुरेसा वाव आहेच.

पण, तरीही नाण्याची दुसरी बाजूही इथे विचारात घ्यावीच लागेल. ती म्हणजे, अशा लेखांच्या माध्यमातून मुद्दाम भारताविषयी साखरपेरणी करण्याचाही हा चिनी ‘प्रपोगंडा’ असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या भारत-चीन संबंध तणावपूर्ण असून यांसारख्या लेखांच्या माध्यमातून तो काहीसा कमी करण्याचाही चिनी सरकारच्या सुनियोजित प्रयत्नांचा हा भाग म्हणता येईल. कारण, यापूर्वीही अमेरिकी आणि भारतीय माध्यमांमध्ये चिनी प्रपोगंडाची घुसखोरी अजिबात लपून राहिलेली नाही, हेही खरे! त्यामुळे चिनी नेटकरी मोदींचे, भारताचे कौतुक करत असतील, तर उत्तमच. पण, म्हणून चिन्यांवर हुरळून जाण्याची, त्यांच्याप्रती, त्यांच्या उत्पादनांप्रती सहानुभूतीदर्शक विचार करणे, हे घातकच ठरू शकते. कारण, चीनची आजवरची अशीच केसाने गळा कापण्याची वृत्ती पडद्याआड करून चालणार नाहीच!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.