होरपळलेल्या आप्पापाड्यात सेवेचे संघव्रत

सामाजिक बांधिलकी जपत आपाद्ग्रस्तांना मदत

    17-Mar-2023
Total Views |
malad appapada fire
 
मुंबई : मालाड पूर्वेला असलेल्या आप्पापाडा येथील झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत तब्बल दीड हजार घरांची राखरांगोळी झाली. या ठिकाणी शासकीय स्तरावर मदतकार्य सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक बांधिलकी जपत येथे कोणत्याही प्रसिद्धीविना मदतकार्य सुरू केले आहे. त्यामुळे येथील आपद्ग्रस्तांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
 
आप्पापाडा येथील आगीत जेवढी घरे जळालीत तेवढेच संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंसह दोन वेळचे जेवण आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. यासाठी रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांनी पहिल्या दिवसापासून पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे.आगीच्या दिवशी गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यता असल्यामुळे मदतकार्यात ही सिलेंडर बाहेर काढणे जिकिरीचे काम होते. त्यातही स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता हे धोकादायक यशस्वीपणे केले. त्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू घरातून गॅस सिलेंडर बाहेर काढताना स्फोट होऊन झाला. तरीही स्वयंसेवकांनी आपले मदतकार्य अखंडपणे सुरुच ठेवल्याची माहिती तेथील पीडितांनी दिली.
 
 
रा.स्व.संघाचे शशिभूषण शर्मा, श्रवण खेतावत, श्रवणसिंग राठोड, अरूण गायकवाड यांच्यासह मालाड, गोरेगाव परिसरातील संघ स्वयंसेवक आणि पदाधिकारी या ठिकाणी पुनर्वसनासाठी सातत्याने मदतकार्य करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे पीडितांकडून कौतुक करण्यात येत आहे.
 
हनुमान मंदिर सुरक्षित

आप्पापाडा येथे लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. घरे, झाडे आदीची राखरांगोळी झाले. मात्र तेथेच असलेले संकटमोचन हनुमानाचे मंदिर आश्चर्यकारकरित्या सुरक्षित राहिले. त्यामुळे रहिवाशांत त्या मंदिराची श्रद्धा वाढली आहे. सद्य:स्थितीत याच मंदिराच्या परिसरात बसून सत्संग परिवारची मंडळी सुमारे पाच हजार पीडितांसाठी रोजचा शिधा शिजवत असतात. येथे स्वयंपाक बनवण्यामध्ये संघ स्वंयसेवक मदत करतात. तसेच गरजूंना त्याचे पद्धतशीरपणे वितरणही केले जाते. भीषण आगीच्या तांडवात संकटमोचक हनुमान आपल्या मदतीला धावला अशी धारणा येथील रहिवाशांची आहे.येथील आगीत होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे मुली महिलांना तत्काळ कपड्यांचा पुरवठा, सॅनेटरी पॅड वितरण आणि समुपदेशन करणे ही कामे या ठिकाणी सुरू आहेत.
 
 
अन्य स्वयंसेवी संस्थादेखील येथे मदतकार्य करत आहेत. मात्र, आग वर उंचावर लागली होती त्याठिकाणी सर्वाधिक नुकसान झाले. तेथे मदतकार्य करताना त्रास होत असल्यामुळे पायथ्याशी गरजेच्या वस्तू आणि अन्नपदार्थांचे वितरित केले जात आहे. विविध संस्था मदतकार्य करत असल्यामुळे वितरण व्यवस्थेत काहीसा गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे रा.स्व.संघाने येथे मदतकार्य करणार्‍या सर्व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून मदतकार्यात नियोजन करण्याचे काम संघ करत आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या वस्तू गरजूंना मिळत आहेत.
 
स्वयंसेवी संस्था सरसावल्या

पीडितांना मदत करण्यासाठी विविध धार्मिक संस्था, समाज मंडळे, स्वयंसेवी संस्था, मालाड मेडिकल असोसिएशन, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने मदतकार्य करत आहेत.

 
राखरांगोळी झालेली कागदपत्रे मिळणार


येथील आगीत मालमत्तेसह महत्त्वाच्या कागदपत्रांचीही राखरांगोळी झाली. त्यात आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड आदींची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तसेच गॅस वितरकांशी बोलून पीडितांना मोफत गॅस शेगडी उपलब्ध व्हावी, यासाठीदेखील प्रयत्न केले जात आहेत.

प्रसिद्धीविना संघाचे काम

 
पीडितांना मदत करण्यासाठी विविध संस्था सरसावल्या आहेत. त्यासाठी बॅनरबाजीही केली जात आहे. मात्र प्रसिध्दीविना मदतकार्य करणे ही परंपरा संघाने जपली असून, कोणत्याही प्रकारची फलकबाजी न करता अगदी पहिल्या दिवसापासून येथे शेकडो स्वयंसेवक मदतकार्य करत आहेत.
 
स्वयंसेवक शशिभूषण म्हणाले, ‘’आपण सगळे बांधव आहोत. भावाच्या सोबत त्याच्या अडचणीच्या वेळेस उभे राहिलो तर यात काय विशेष.” तर अरूण गायकवाड म्हणाले, “इथे समाजाच्या प्रत्येक सज्जनशक्तीच्या सत्कार्यात संघ आहे. त्यामुळे वेगळे बॅनर कशाला हवेत,” असा सवाल त्यांनी केला.
 
टाळूवरचे लोणी खाणारे चिथावणीखोर
 
 
एकीकडे स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन मदतकार्य करत असताना दुसरीकडे काही चिथावणीखोर येथे येऊन पीडितांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, येथील रहिवासी ठाम असल्यामुळे श्रेय लाटण्याचा चिथावणीखोराचा प्रयत्न अपयशी ठरत आहे.
 
 
मेधा पाटकरांच्या भूमिकेमुळे पीडित झाले संतप्त


भीषण आगीतून येथील लोक सावरत असून सारे काही सुरळीत होत असताना मेधा पाटकर तेथे आल्या आणि त्यांनी पीडितांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘तुमचा पंचनामा कसा घेतला? तुम्हाला नुकसान भरपाई वाढवून मिळायला पाहिजे असेल, तर त्यासाठी मार्ग आहेत.’ बेघर झालेल्या गरीब लोकांना वाटले की, त्या घर द्यायला आल्या आहेत. पण त्या तर केवळ चाचपणी करत होत्या की, कोणता मुद्दा घेऊन सरकार, प्रशासनाविरोधात चिथावणी देता येईल. त्यांच्या या वर्तनामुळे पीडित संतप्त झाले होते.
 
 
घटनेनंतर प्रशासनाने आपत्ती निवारणासंदर्भात बैठक लावलेल्या बैठकीत रा.स्व.संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. आपत्तीनिवारण कार्यात रा.स्व.संघ विश्वासाने आणि जबाबदारीने मदत सहकार्य करेल, असा प्रशासनाला ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर संघाच्या माध्यमातून दिलेली मदत गरजूंना शंभर टक्के मिळेल, असा दात्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना विश्वास त्यातूनच येथे रा.स्व.संघाचे स्वयंसेवक इथे अहोरात्र सेवाकार्य करत आहेत.
 
आप्पापाड्याच्या या आपत्तीत उद्ध्वस्त बेघर झालेल्यांची सविस्तर माहिती एकत्रित करुन तपशीलवार संकलित केली जात आहे. येथील पीडितांना अन्नवितरण आणि गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. किमान पंधरा दिवस पुरेल ऐवढे अन्नधान्य देण्यात येणार आहे.(शशिभूषण शर्मा, स्वयंसेवक, रा.स्व.संघ)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.