नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशीदेखील लोकसभेत गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विरोधकांच्या गदारोळामुळे मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले आणि त्यानंतरही गदारोळ कायम असल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूह करण्यात आले. सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या भारतविरोधी वक्तव्यावरून माफी मागण्याची आक्रमक मागणी केली. त्यास प्रत्युत्तरादाखल काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी गदारोळास प्रारंभ केला.
भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काही जुन्या प्रकरणांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी लंडनला जाऊन संसदेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले. ही निंदनीय बाब असून त्यांनी निश्चितच देशाची माफी मागितली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. त्याचप्रमाणे राज्यसभेचे सभागृह नेते पियुष गोयल यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत परदेशात जाऊन ज्या पद्धतीने संसदेवर आरोप केले जात आहेत ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राज्यसभेमध्ये नाटू नाटू हे गाणे आणि द एलिफंट व्हिस्परर्स या माहितीपटास मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराविषयी अभिनंदन चर्चा करण्यात आली.