मुंबईतील प्रदूषणाबाबत पालिकेला जाग?

    10-Mar-2023
Total Views |
Mumbai Municipality alerted about pollution in Mumbai


मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून दिल्लीपेक्षाही अधिक मुंबईच्या हवेतील प्रदूषण वाढले आहे. यामुळे आजारांचे प्रमाणदेखील वाढले आहे. यावर अखेर महापालिकेने लक्ष घातले असून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी बुधवार, दि. ८ मार्च रोजी झालेल्या बैठकीत दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर या समस्येकडे लक्ष घातले. हवा प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकार्‍यांची मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
 
इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी पालिका करणार

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने धोरण २०२१ नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने प्रशासनाच्या वापरासाठी ३५ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत विविध प्राधिकरणामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आतापर्यंत ४८६ ‘चार्जिंग स्टेशन’ उभारली गेली आहेत. महानगरपालिकेच्यावतीने आणखी २५ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा उभारण्याची कार्यवाही सुरू असून, ‘बेस्ट’उपक्रमअंतर्गत सुमारे २ हजार, १०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर बसेस तर, ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची कार्यवाही देखील सुरू आहे. सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, शासनाच्या सूचनेनुसार जुनी वापरात असलेली डिझेलवर धावणारी वाहने ‘सीएनजी’मध्ये रूपांतरित करून घेण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे.

 
पालिकेच्या धूळ कमी करणार्‍या यंत्रणेविषयी

 • महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडूद्वारे दररोज सुमारे २९३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता


 • महापालिका आणखी नऊ इलेक्ट्रिक झाडू विकत घेणार


 • दररोज २८ किलोमीटर याप्रमाणे एकूण २५२ किलोमीटर अधिकच्या रस्त्यांची स्वच्छता करणार


 • १०० वाहन आरूढ १०० संयंत्र खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू


 • हवा शुद्धीकरण करणारी वाहन आरुढ सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाही सुरू


 • हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारणार

   
   
गोराई, नवी मुंबईत होणार कचरा प्रक्रिया केंद्र

 • मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा/राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्रांची उभारणी

   
 • पश्चिम उपनगरांकरिता गोराई प्रक्रिया केंद्राची उभारणी


 • शहर व पूर्व उपनगरे विभागाकरिता नवी मुंबईमध्ये प्रक्रिया केंद्र उभारणार


 • एकूण क्षमता १ हजार, २०० मेट्रिक टन प्रतिदिन

डॉ. संजीव कुमार यांचे निर्देश

 1. मुंबई महानगराचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि गरज लक्षात घेता मुंबई महानगरासाठी महानगरपालिका प्रशासनाची स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक
   
 2. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमांच्या अधीन राहून धूळ नियंत्रण संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती तातडीने निश्चित करावी
   
   
 3. महानगरपालिका प्रशासनातील सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी व सर्व संबंधित भागधारक घटकांची पुढील आठवड्यात कार्यशाळा आयोजित करणे


 4. धूळ नियंत्रणाची कामे तातडीने मार्गी लावण्यावर भर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.