‘नियम असतातच मुळी मोडण्यासाठी...’ अशी एक वैश्विक मानसिकता. तेव्हा, नियमांचे पालन न करणे, नियमांचे सर्रास उल्लंघन करणे असे प्रकार समाजात का घडतात? यामागची मानवी मानसिकता नेमके काय सांगते? त्याचाच शोध घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
मागच्या लेखात आपण फटाके १० वाजल्यानंतर फोडू नयेत, या नियमाचे हा उल्लंघन करण्याविषयीच्या मानसिकतेचा उहापोह केला होता. पण, आपल्या देशात अशा अनेक नियमांचे सरसकट उल्लंघन करण्यात अनेक लोक तरबेज आहेत, हे ही तितकेच खरे. मग आपसुकच त्याचा जाच आणि त्रास अनेक नागरिकांना सहन करावा लागतो. बहुतेक लोक स्वतःला कायद्याचे पालन करणारे सुजाण सजग नागरिक वगैरे समजतात. ते उगाचच मारामारी करत नाहीत, चोरी करत नाहीत किंवा विम्याशिवाय गाडीदेखील चालवत नाहीत. पण, लोक इकडून-तिकडून कायदा मोडतात, कधी उघड उघड तर कधी विचार न करता! काहीवेळा लोक नियम तोंडाने अगदी चुकीचे असल्याचे माहीत असतानासुद्धा सरसकट नियम तोडतात. म्हणूनच मग प्रश्न पडतो की, लोक नियम क बरं मोडतात? त्यानिमित्ताने नियम मोडणारी वर्तणूक, मानसिकता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आपण त्यामागील मानसशास्त्र नेमके काय सांगते, हे पाहणे आवश्यक आहे.
माणूस कायदे/नियम का मोडू शकतो याची खरं तर हजारो कारणे आहेत. एखाद्याच्या घरी कोणी कमवत नाही, प्रचंड गरिबी पाचवीला पुजलेली आहे आणि त्याचे कुटुंब आता हळूहळू उपासमारीने मरत आहे. तो मग त्या कुटुंबाला आणि स्वतःला जगवण्यासाठी एक भाकरी चोरण्याची संधी पाहतोआणि ती तो घेतो, अन्यथा एखाद्या आदरणीय व्यक्तीला चोरी करायची गरज का वाटू शकते किंवा चोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय का दिसत नाही? दुसर्या टोकाला असेही लोक आहेत, जे जिंकण्यासाठी नियम मोडतात. उदाहरण म्हणजे, एक ऑलिम्पियन खेळाडू जो स्वतःलास्पर्धेत जिंकण्याची चांगली संधी देण्यासाठी शारीरिक ऊर्जा वाढवणारी ‘स्टिरॉईड’सारखी औषधे घेतो. नियमाप्रमाणे ही शुद्ध फसवणूक आहे!
‘युके हेल्थ अॅण्ड सेफ्टी एक्झिक्युटिव्ह’च्या मते, मानवी अपयशाचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिले म्हणजे त्रुटी आणि दुसरे जाणीवपूर्वक केलेले उल्लंघन. मानवी त्रुटी ही एक अशी कृती किंवा निर्णय आहे, ज्याचा हेतू वाईट नव्हता आणि तो बहुधा अस्सल चुकांच्या स्वरूपात असू शकतो. जाणीवपूर्वक लक्ष न देता केल्या जाणार्या परिचित कामांमध्ये घसरण आणि चुकाही होतात. कारण, एकतर तुम्हाला जे करायचे आहे, ते तुम्ही नीट करत नाही किंवा तुम्ही त्यामधील काहीतरी महत्त्वाचे नेमके करायला विसरता. दुसरीकडे काही चुका म्हणजे, एखाद्या कृतीत निर्णय घेण्याच्या चुका आहेत आणि जेव्हा आपण ती चुकीची गोष्ट करतो, तेव्हा ती योग्य आहे, असे मानल्याने त्या उद्भवतात. या प्रकारच्या मानवी चुका अभिप्रेत नसतात आणि अगदी अनुभवी आणि प्रशिक्षित व्यक्तीही त्या चुका सहज करू शकते.
मानवी अपयशाचा दुसरा प्रकार, उल्लंघन. म्हणजे नियम किंवा प्रक्रियेपासून जाणूनबुजून केलेली अयोग्य कृती. जाणूनबुजून चुकीचे काम करणे, हे हेतुपुरस्सर अपयश आहे. तथापि, ते क्वचितच वाईट हेतूने केलेले असते आणि शक्य तितक्या कार्यक्षमतेने एखादे कार्य पूर्ण करण्याच्या हेतूने ते केलेले दिसून येते. त्यामुळे ही उल्लंघने का होतात, हे समजून घेणे आणि ते घडवणारे विविध घटक समजल्यास त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक प्रभावी नियंत्रणे आणता येतील. उल्लंघन करणे हे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत : नियमानुसार, परिस्थितीजन्य आणि अपवादात्मक. या तीन श्रेणींपैकी प्रत्येकाची तपासणी करणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन
हे कामाच्या ठिकाणी दिसून येते. ते इतके सामान्य आहे की, ते यापुढे उल्लंघन म्हणून मानलेही जात नाही किंवा धोकादायक वर्तन असल्याचे मानले जात नाही. घाईत सिग्नल न पाहता रस्ता ओलांडणे, हा उल्लंघनाचा प्रकार म्हणजे ‘नियमित उल्लंघन.’ इथेच नियम मोडणे हे सर्रास झाले आहे. लोकांना माहीत आहे की, तांत्रिकदृष्ट्या त्यांनी थांबले पाहिजे. परंतु, रहदारीपासूनदूर राहण्यासाठी लाल सिग्नल ओलांडणे त्यांना अधिक सुरक्षित वाटते आणि कालांतराने ही एक सामान्य प्रथा बनली आहे. ज्यामुळे बर्याच लोकांसाठी ते तसे करणे हे नित्याचे झाले आहे. वेळ आणि श्रमाची बचत करण्यासाठी शॉर्टकट वापरण्याची इच्छा, नियमांची देखरेख किंवा अंमलबजावणीचा अभाव आणि नियम अव्यवहार्य, प्रतिबंधात्मक, अनावश्यक आहेत, असा सामान्यांचा सामान्य समज यांचादेखील यामध्ये समावेश आहे.
परिस्थितीचे उल्लंघन
अशा परिस्थितींमध्ये वेळेचा ताण, कामाच्या भारासाठी अपुरा कर्मचारीवर्ग, ऐनवेळी योग्य उपकरणे उपलब्ध नसणे किंवा अगदी अत्यंत टोकाची हवामानाची परिस्थिती अशी काही कारणे असू शकतात. या परिस्थितीत, कामगारांना नियम किंवा कार्यपद्धतीचे पालन करणे खूप कठीण वाटते किंवा असे वाटते की, अशा परिस्थितीत नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी किंवा इतरांसाठी असुरक्षित असू शकते.
अपवादात्मक उल्लंघन
अगदी असामान्य परिस्थितीत अशाप्रकारचे उल्लंघन घडते आणि जेव्हा कार्यात काहीतरी चूक झाली असेल आणि अशावेळी तातडीचा निर्णय घेणे (जरी याचा अर्थ तो निर्णय अयोग्य असेल किंवा जोखमीचा असले तरीही) म्हणजे चुकीच्या गोष्टी बरोबर करण्याचा प्रयत्न करणे हाच असतो. अशा अपवादात्मक प्रकरणांमध्ये, सध्याच्या समस्येचे किंवा संकटांचे निराकरण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणे अपरिहार्य वाटते आणि असा विश्वास वाटतो की, त्यामुळे होणारा फायदा नियम तोडण्याच्या जोखमीपेक्षा नक्कीच जास्त आहे. लोक अनेक कारणांमुळे नियम मोडतात. कोणत्याही चुकीच्या व उल्लंघनाच्या मूळ कारणापर्यंत पोहोचणेआणि उल्लंघनाच्या विविध श्रेणी समजून घेणे, हे त्यासाठी लागणार्या नियंत्रण उपायांना जाणून घेण्यासाठी आणि उल्लंघन रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे. नियम मोडणारे लोक समाजात कमी करण्यासाठी, ते नियम का तोडतात, हे प्रथम शोधून काढले पाहिजे आणि ते समजून घेऊन, सर्वांत योग्य दृष्टिकोन स्वीकारून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी नियंत्रण योजना शोधणे आवश्यक ठरते.
डॉ. शुभांगी पारकर