होमियोपॅथीवर व आयुर्वेदावर अभ्यास करण्याचे काम मुख्यत्वे सरकारी खात्यांकडूनच करण्यात येते. एकीकडे या शासनाच्या संशोधनासाठी ‘आयुष’सारखे मंत्रालय स्थापन करण्यात येते. परंतु, त्याचबरोबर देशात होमियोपॅथी व आयुर्वेदिक रुग्णालये उभी केली जात नाहीत. तसेच, सध्याच्या रुग्णालयांमध्ये होमियोपॅथिक कक्ष स्थापन केला जात नाही, शिक्षण तेवढेच व तसेच घ्यायचे; मात्र नेहमी दुय्यम वागणूक घेत राहणे, हे होमियोपॅथीच्या वाट्याला येते. यात सर्वसामान्य लोकांचेच नुकसान होते, हे देशाचे दुर्दैव. परिणामी, लोक नैसर्गिक उपचार पद्धतीपासून वंचित राहतात.
लोकांच्या मनात एक शंका असते की, ‘मेडिकल इमरजन्सी’ झाली, तर आम्हाला शेवटी अॅलोपॅथीचेच उपचार घ्यावे लागते. म्हणून आम्ही अॅलोपॅथीचीच औषधे घेतो. याबाबत वादच नाही की, आपत्कालीन स्थितीत अॅलोपॅथी औषधे चांगली कार्य करतात. परंतु, याचा अर्थ असा नाही की, आपत्कालीन स्थितीमध्ये घेतली जाणारी औषधे सुरक्षित असतात.
जगात असे अगणित आजार आहेत की, जे आपत्कालीन स्थितीपर्यंत पोहोचायच्या आधीच नैसर्गिक औषधप्रणालीने बरे करता येतात किंवा निदान त्यांची तीव्रता कमी करता येते. होमियोपॅथीमध्येसुद्धा अशी अनेक औषधे आहेत की जी आपत्कालीन स्थितीमध्ये चांगल्याप्रकारे कार्य करतात. परंतु, हे ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिले जात नाही किंवा पोहोचत नाही.
आपण जर नीट विचार केला, तर असे लक्षात येते की पूर्वी मॉडर्न औषधेे नव्हती. तेव्हा लोक साथीच्या आजाराने किंवा एखाद्या आजाराने मृत्युमुखी पडायचे. त्यामुळे ‘मॉडर्न मेडिसीन’ हा रुग्णांचा एकमेव तारणहार, हा समज लोकांमध्ये दृढ झाला. आता डोळे उघडे ठेवून पाहिले, तर असे लक्षात येईल की, पूर्वी काही ठरावीक साथीचे आजार सोडता मोठ्या आजाराने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, आता ‘मॉर्डन मेडिसीन’ उपलब्ध असूनही अनेक आजार अजून जसेच्या तसेच अस्तित्त्वात आहेत व अनेक भयंकर नवनवीन आजारांची भर पडत आहे.
उदा. इतकी औषधे येऊनसुद्धा जगातून क्षयरोगासारखा (Tuberculosis) आजार अजूनही दिसून येतो. भारतात दर १०० रुग्णांमागे एक रुग्ण क्षयरोगाचा असू शकतो. इतका हा आजार बळावला आहे. म्हणजेच काय तर हे ‘मॉर्डन मेडिसीन’ अशा रोगांना मुळापासून घालवू शकत नाही. रोगाचे मूळ जाणून घेतल्याशिवाय केले गेलेले उपचार रोगाला आणखीन असह्य बनवतात. त्याचाच परिणाम म्हणून आता एक नवीन प्रकारचे आजार दिसून येतात. त्याला ’MDR’ म्हणजे ’Multi Drug Resistant’ आजार असे म्हटले जाते.
यासाठी होमियोपॅथीसारख्या नैसर्गिक उपचार पद्धतीमुळे अजून संशोधन होण्याची गरज आहे. शासनाने होमियोपॅथीच्या संशोधनासाठी पुढाकार घेऊन सक्षम होमियोपॅथी डॉक्टरांना यात सामावून घेतले पाहिजे. भारताबाहेरचे उदाहरण हवे तर मध्य-पूर्वेतील अरब देशही आता होमियोपॅथीबद्दल जागरुक झाले आहेत. कारण, त्यांनाही पटले आहे की, होमियोपॅथी त्वरित कार्य करणारी नैसर्गिक उपचार पद्धती आहे. पुढे अजूनही जी सत्य परिस्थिती आहे, तिच्यावर भाष्य करूया. (क्रमश:)
मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६