मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या जोडीने हिंदीत अनेक हिट शो करत एक काळ गाजवला आहे. मात्र, काही कारणास्तव कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमधून सुनील ग्रोव्हर यांनी माघार घेत कपिल सोबत काम करणे बंद केले होते. मात्र, त्यांच्यातील मतभेद आणि दुरावा संपला असून पुन्हा एकदा कपिल आणि सुनील यांची जोडी एकत्रित येत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर आगामी सुरु होणाऱ्या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर एकत्रित दिसणार असून याची झलक समोर आली आहे.
नेटफ्लिक्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, कपिलने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेटफ्लिक्सवरील आगामी कॉमेडी शोसाठी सुनील ग्रोव्हर कपिलसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. आणि तब्बल १९० देशांमध्ये ते जाणार आहेत. या व्हिडिओत कपिल आणि सुनील सोबत अर्चना सिंग, कृष्णा अभिषेक असे सर्व कलाकार दिसत असून व्हिडिओच्या शेवटी कपिल म्हणत आहे ‘आता आमचं कुटुंब पूर्ण झालं’. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व विनोदवीरांचा कल्ला पाहण्यासाठी संपुर्ण देश नाही जग सज्ज होत आहे.