मुंबई : मुंबईतील नाल्यालगतच्या झोपडपट्ट्यांना 'सुरक्षा कवच' पुरवण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घेतला आहे. त्यामुळे डोंगर उतारावर, धोकादायक दरडीखाली राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.मुंबईत डोंगर उतारावर व उंच टेकड्यांवर झोपडपट्टया वसलेल्या आहेत. डोंगरांची होणारी झीज व दरडी कोसळल्याने झोपडपट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानीच्या घटना घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
झोपडपट्टयांमध्ये संभाव्य जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने घोषित वा अघोषित, अधिकृत वा अनधिकृत झोपडपट्टी असा फरक विचारात न घेता नाल्यालगतच्या सर्व झोपडपट्टीवासीयांच्या संरक्षणार्थ संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात, असे निर्देश सावे यांनी दिले आहेत.त्यानुसार, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडून ९ मीटर उंचीच्या संरक्षक भिंती नाल्यालगत उभारल्या जातील. त्यासाठी नियोजन विभागामार्फत परस्पर सुधार मंडळास निधी उपलब्ध करून दिला जाईल. आवश्यक त्या ठिकाणी ९ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा अन्य सुयोग्य यंत्रणेकडून करून घेण्यात येणार आहे.