ठाणे : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचे संगीत गुरुकुल ठाण्यात सुरू होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्व युगात जे सर्वश्रेष्ठ युग आपण अनुभवले ते लतायुग. त्यांची गाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा हा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी गुरुकुल सारख्या संस्था आवश्यक आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजने अंतर्गत ठाण्यातील वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. प्रताप सरनाईक, ज्येष्ठ गायिका श्रीमती उषा मंगेशकर, कृष्णा आदिनाथ मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. शास्त्रीय संगीतातील पंडित राम मराठे, ज्यांची गाणी लतादीदींनी गायली ते पी. सावळाराम ठाण्यातील. ही परंपरा पुढे नेण्यासाठी गुरुकुलची स्थापना हा एक भाग आहे. यातून अनेक विद्यार्थी घडतील आणि संगीतकार घडतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सरकार, महापालिका आणि व्यक्तिशः आपण या उपक्रमाला आवश्यक पाठबळ देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बदलले ठाणे पाहून, उषा मंगेशकर यांनी त्यांच्या भाषणातून तसा उल्लेख केला. तो धागा पकडून, ठाण्यातील रस्ते स्वच्छ राहतील. त्यावर धूळ, माती, डेब्रिज असणार नाही. रस्त्यात दुभाजकावर जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावा, असे निर्देश पालिका आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ठाण्याला पाणी कमी पडू देणार नाही. त्याबद्दल लवकरच बैठक आयोजित केली जाईल. तसेच, क्लस्टरमुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या ठाणेकरांना हक्काची घरे मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ठाण्याचे बदलत रूप बघून मला आनंद वाटला. या ठाण्याला साजेशी इमारत लता मंगेशकर गुरुकुलसाठी आता उभारली जाणार आहे. त्याचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी या सोहळ्यात केले. तसेच, हे संगीत विदयालय चालवण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल आभार मानले.
या प्रसंगी आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, लता मंगेशकर गुरुकुल उभारण्याची इच्छा लतादीदींना २०११ मध्ये एका कार्यक्रमात शब्द दिला तेव्हापासून होती. ती इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलून धरली आणि त्याला २५ कोटींचा निधी दिला. हे विद्यालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीयांनी घ्यावी असे आवाहन आ. सरनाईक यांनी केले. तसेच, ठाण्यातील कोणत्याही कामासाठी मुख्यमंत्री कधीही तत्पर असतात. त्यामुळेच, ते आता ठाण्याला अधिकचे पाणीही उपलब्ध करून देतील, अशी अपेक्षाही आ. सरनाईक यांनी व्यक्त केली.
'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' हे अभियान हाती घेतले त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे आहे. या काळात हाती घेण्यात आलेली कामे सर्वोत्तम आणि वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे याप्रसंगी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील ६०५ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे आता पूर्ण होत आहेत. सुशोभिकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ठाणे बदलतंय याची जाणीव होऊ लागली आहे, असेही आयुक्त बांगर म्हणाले.
या घाणेकर नाट्यगृह येथील सोहळयास, सौ. कृष्णा आदिनाथ मंगेशकर, परिवहन सभापती विलास जोशी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमा आधी जीवन गाणी या संस्थेने ' गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. त्यापूर्वी, पोखरण रोड नं. ०१ येथील सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचे (३.७५ कोटी) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
तसेच, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात, अमृत २.० योजने अंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प (२०० कोटी) यांचा शुभारंभ, तसेच, शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा (५० कोटी) शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने केला.
वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी (२० कोटी), ओवळा-माजीवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण (५० कोटी), मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फुटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे (२५ कोटी) या कामांचाही ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ मुख्य सोहळ्यात करण्यात आला.