एका डिलीव्हरी मागे झोमॅटोला किती पैसे मिळतात?

संस्थापकांनीच दिलं उत्तर

    17-Nov-2023
Total Views |
 zomato
 
मुंबई : देशातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी कंपनीला एका डिलिव्हरी ऑर्डर मागे किती रुपयांची कमाई होते याचा खुलासा केला आहे. त्यांनी ही माहिती युट्यूबर रणवीर अल्लाबदिया यांच्या 'द रणवीर शो' या कार्यक्रमात दिली.
 
त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, "झोमॅटोला एका डिलिव्हरी ऑर्डर मागे किती रुपयांची कमाई होते." यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "झोमॅटोला कोणत्याही ऑर्डरमागे दोन प्रकारे कमाई होते. एक म्हणजे, ग्राहकांकडून आकरले जाणारे डिलिव्हरी शुल्क आणि दुसरे हॉटेलकडून मिळणारे कमीशन." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्हाला लहान ऑर्डरवर कमाई होत नाही. ऑर्डर मोठी असल्यास आमची कमाई चांगली होते."
 
याच कार्यक्रमात त्यांना फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर देण्यात येणाऱ्या मोठ्या सवलतींवर सुद्धा प्रश्न विचाण्यात आला. त्यावेळी त्यांनी मान्य केले की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या सवलती दिल्या जातात. पण त्या पूर्णपणे खऱ्या नसतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अटी आणि नियम असतात. सवलती कशा प्रकारे काम करतात हे त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले.
 
दीपिंदर गोयल म्हणाले की, "समजा ५०% सवलतीमध्ये ८० रुपयांची मर्यादा लावलेली असते. त्यामुळे कोणी कितीही रुपयांची ऑर्डर केली तरी त्याला जास्तीत जास्त ८० रुपयांची सवलत मिळू शकते. म्हणजेच कोणी ४०० रुपयांची ऑर्डर केल्यास त्याला फक्त २० टक्केच सवलत मिळेल."
 
यावेळी त्यांनी हे सुद्धा मान्य केले की, वाढत्या स्पर्धेमुळे आणि बाजाराच्या दबावामुळे अशा प्रकारच्या सवलती दिल्या जातात. अशा सवलतींमुळे लाखो ग्राहक ऑनलाईन फूड डिलिव्हरीकडे आकर्षित होत आहेत, अशी कबुली सुद्धा त्यांनी दिली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.