रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंड येथील त्यांच्या उलिहातू या गावी श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच पंतप्रधान मोदींनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी २४ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी उलिहातू इथून ‘पंतप्रधान असुरक्षित आदिवासी समूह विकास मिशन’ (पीव्हीटीजी) चा शुभारंभ केला. देशातील आदिवासींच्या विकासासाठी ही योजना आणण्यात आली असून याद्वारे ७५ लाख आदिवासींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेचे बजेट २४ हजार कोटी रुपये आहे. यामध्ये पाणी, वीज, गॅस, घरे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी उलिहातूमधून सुमारे ७ हजार कोटी रुपयांच्या इतर योजनांचीही पायाभरणी केली. तसेच त्यांनी इथून पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ हजार कोटींचा १५ वा हप्ता जारी केला.
पंतप्रधान मोदींनी यावेळी‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवला. विकसित भारत संकल्प यात्रा ही देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन सरकारच्या विकास योजनांना लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच याद्वारे जे लोक या योजनांपासून वंचित राहिले आहेत त्यांची माहीतीही गोळा केली जाणार आहे.