ठाणे : ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी ८६५७८८७१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
उघड्यावर कचरा जाळणे, बांधकाम होत असताना परिसरात धूळ व धूराचा उपद्रव होणे, रस्त्यावरील बांधकाम कचरा तसेच डेब्रिजची विना- आच्छादन वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण, बांधकामाचा कचरा इतस्ततः टाकला जाणे, हॉटेल-बेकरीमधून होणारे धूळ व धुराचे प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्र वास, वाहनांचे अवैध पार्किंग, इत्यादी हवा प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नागरीक हेल्पलाईनवर व्हॉट्सॲपद्वारे छायाचित्रासह नोंदवू शकतात.
ठाणे महापालिका प्रशासनातर्फे त्या तक्रारीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल. त्यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. फटक्यांसंदर्भात आलेल्या तक्रारी कारवाईसाठी पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहेत.