मविआच्या कडबोळ्यात चौथ्या भिडूची ‘एंट्री’

वंचितची ठाकरे गटासोबत युती!

    24-Jan-2023
Total Views |
uddhav and prakash ambedkar


मुंबई
: “अनेक दिवस चाललेले चर्चेचे गुर्‍हाळ, गुप्त बैठका आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिलेल्या इशार्‍यानंतर अखेरीस वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजनच्या प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार, दि. २३ जानेवारी रोजी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे महाविकास आघाडीच्या (मविआ) कडबोळ्यात चौथ्या भिडूची ‘एण्ट्री’ झाली आहे, अशी चर्चा जनसामान्यात रंगली आहे.
दादरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ठाकरे गट आणि वंचितच्यावतीने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत अधिकृत घोषणा केली. दरम्यान, या समीकरणावर शिवसेना-भाजप युतीने मात्र कडाडून टीका केली आहे. त्यामुळे मविआ विरुद्ध युती हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या युतीची गरज, पार्श्वभूमी आणि भविष्यात यामुळे मोठी समीकरणे बदलतील,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ठाकरे-आंबेडकर यांच्यावतीने एक संयुक्त निवेदनदेखील माध्यमांसमोर सादर करण्यात आले असून त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे-आंबेडकरांचे संयुक्त निवेदन
देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात देशाला उद्देशून इशारा दिला होता की, “देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले, तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.
 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही, तर देशात अराजक निर्माण होईल, ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे. परंतु, या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली, तरच देश टिकतो,” असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत!

चौथा भिडू ठरणार वादाला कारणीभूत?


वंचित बहुजन आघाडीला मविआत प्रवेश देण्यावरून तीन पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अनेकदा ठळकपणे अधोरेखित झाले होते. तसेच, आंबेडकर यांनीदेखील मविआत येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अडसर असल्याचे वारंवार सूचित केले होते. त्यामुळे आता वंचितसोबत झालेल्या युतीमुळे मविआत वाद निर्माण होणार का? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
आंबेडकर एका दिवसात कंटाळतील

प्रकाश आंबेडकर हे तगडे नेते आहेत. ते काय निर्णय घेतात, हा त्यांचा अधिकार आहे. पण, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, ज्यांना स्वतःचघर चालवता येत नाही, ते इतरांशी मैत्री कधीच निभावू शकत नाहीत. कारण, युती टिकवण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, युती टिकवण्यासाठी समर्पण आवश्यक असते. उद्धव ठाकरेंकडे समर्पण नाही, युती टिकवून ठेवण्याचे गुण त्यांच्यात नाहीत, त्यामुळे ही युती किती दिवस टिकते, हे पाहावे लागेल. ठाकरेंच्या याच अवगुणांमुळे प्रकाश आंबेडकर एका दिवसात या युतीला कंटाळतील- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजप

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.