अभिरुची संपन्न होतेय आणि प्रेक्षक प्रगल्भ होतोय : चंद्रकांत कुलकर्णी

    20-Jan-2023   
Total Views |

chanku


महाराष्ट्राला समर्थ स्त्री व्यक्तिरेखांची सशक्त परंपरा तशी फार पूर्वीपासूनच लाभलेली. स्त्रीच्या मनाचा थांग लावता येत नाही, तिची दुःख जशी वेगळी, तशीच तिची सुखसुद्धा अनाकलनीय! १९८४च्या काळात गाजलेलं महिला दिनाचं नाटक म्हणून ‘चारचौघी’ला मिळालेली लोकप्रियता आता स्त्रीभावविश्वाची तरल मांडणी म्हणून प्रसिद्ध होते आहे. स्त्रीमनाचा आणि एकूणच समाज मानसिकतेचा वेध घेताना काळाशी त्याचा फारसा संबंध नसतो, हे त्यातून अधोरेखित होते. प्रशांत दळवींनी लिहिलेले हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केले. आता तब्बल ३० वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आल्यानंतरही त्याचे ५० प्रयोग झाले. त्यानिमित्ताने ‘चारचौघी’चे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी केलेली ही खास बातचित...


‘चारचौघी’ हे नाटक रंगभूमीवर पुन्हा आणण्यामागचं प्रयोजन काय?


‘चारचौघी’ हे नाटक त्या काळात खूप गाजलं. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे प्रयोग झाले. अगदी चर्चासत्र, परिसंवादही पार पडले. पण, त्यापेक्षा जास्त समाजाने या नाटकाला आपलंस केलं. प्रेक्षकांइतकच चळवळींनी या नाटकाला जवळ केलं. नाटकावर लेखही लिहिले गेले, ‘पीएच.डी’ केली. ‘बीए’च्या अभ्यासक्रमात या नाटकाचा समावेशही झाला.
खरंतर नाटक हे त्या त्या काळातलं असतं. मी आणि प्रशांत दळवी दोघेही स्त्रीमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते होतो. त्यामुळे पुढे एखाद्या मोठ्या नाटकात अशा विषयाचे रुपांतर होताना त्यावेळची एकंदर परिस्थिती, त्यावेळच्या स्त्रियांचा दृष्टिकोन या सर्वांचा विहार होतो. त्याकाळच्या पुरुषप्रधान संस्कृतीतल्या स्त्रीला कायद्यात स्थान नाही, घरात स्थान नाही की तिच्या वेगळ्या निर्णयाचं स्वागतही होत नाही. अनायसे मला प्रशांतच्या नाटकांचा एक महोत्सव करायचा होता. त्यावेळी वाटलं की, हे नाटक जर काळाच्या पुढचं आहे, तर ते आपण ताडून पाहूया. आजच्या समाजाला ते किती पटतं, ते पाहूया.
आजची स्त्री ही ‘चारचौघी’शी स्वतःची प्रतिमा ताडून पाहते का? या नाटकावर स्त्रियांच्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या प्रतिक्रिया काय सांगतात?


स्त्रीला आज कुठेच समानतेचं स्थान नाही. हे नाटक त्यावर भाष्य करतं. तुला एक गंमत सांगतो, काही मैलाचे दगड असतात. १९९१ मध्ये एका महाविद्यालयात मुलीने ते नाटक पाहिलं आणि या नाटकातच एक भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री प्रतीक्षा लोणकरला येऊन तिने सांगितलं की, “या माझ्याच अडचणी आहेत, माझ्या खासगी अडचणी. तू फक्त अभिनय करतेस की तुलाही असं वाटतं?” आज तीच स्त्री तिच्या मुलीला या नाटकासाठी घेऊन आली आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. वर्तुळाचा परीघ वाढला. ज्या स्त्रीला त्या नाटकातील एका पात्राने झपाटून टाकलं होतं, तिच्या मुलीला आजसुद्धा या नाटकातील सर्वच भूमिका आपल्याशा वाटतात. मुली नाटकाला येतात, अगदी आमच्याशी भरभरून बोलतात.
काल माझी भाची प्रयोगाला आली. नाटक तिनेही पहिल्यांदा पाहिलं आणि त्याविषयी खूप भरभरुन बोलली. असं काही ऐेकलं की अगदी मनापासून आनंद होतो.आज आपला समाज सर्वार्थाने झपाट्याने बदलतो आहे. पूर्वी आपण मोजकं बोलून फोन ठेवायचो. आज त्याचा उपयोग आपण गप्पा मारायला करतो. हळूहळू नवी ‘गॅजेट्स’ आली. तरी भावनेत बदल झालेला नाही. घटस्फोटांचं प्रमाण वाढलं. नाती निभावून नेणं विसरलो आपण. पण इच्छा, भावना त्याच राहिल्या. व्यवस्था तशीच राहिली आणि म्हणून हे नाटक रसिकांना भावतं आहे आणि म्हणून कलाकारांच्या अभिनयापेक्षा पात्रांच्या भूमिकेला आजही तितकाच मोठा प्रतिसाद मिळतो.
नाटकातील श्रीकांतचं पात्र विनोदी नाही. आज समाजात असे बरेच ‘श्रीकांत’ पाहायला मिळतात. अशावेळी नाटकातील वैजूचे पात्र किंवा अन्य कोणतीही स्त्री, हा असा पुरुष का सहन करत असावी?नाटक तू नीट वाचलंस, तर तुझ्या असं लक्षात येईल की, त्या चौघींना प्रशांतने एक वेगळं व्यक्तिमत्त्व दिलेलं आहे. आईने वेगळा निर्णय घेतला म्हणून तिच्या तीन मुली निर्णय घेतीलच, असं नाही. त्यावेळी तिने ठरवलं की लग्न-सहजीवन नाही तर नाही, मी तुझ्या साहाय्याशिवाय राहीन. माझ्या निर्णयाची सर्वस्वी जबाबदारी माझी. त्या सर्वतोपरी स्वतंत्र स्त्रीने फक्त प्रेमाखातर दुय्यम स्थान घेतलं आहे. अशावेळी वडिलांशिवाय राहणार्‍या, पण खंबीर आईच्या तिन्ही लेकींचे निर्णय वेगळे आहेत. त्यात आपल्याला वैविध्य दिसतं. मुक्ता बर्वेचं पात्र अगदी ‘हेडस्ट्राँग’ आहे आणि तिला आपल्या आईविषयी अभिमान वाटतो, जी तिच्या बळावर तिघींची जबाबदारी सांभाळत उभी राहिली. धाकटी अजून तयार होतेय. आईला जो आधार मिळाला तो विनीला मिळाला नाही. पण, ती तिच्या बहिणीचं आयुष्य समोर पाहतेय, आईचा तर संपूर्ण जीवनप्रवासच तिच्यासमोर आहे. कादंबरीचं म्हणजे वैजूचं पात्र मात्र वेगळं!
तुझ्या श्रीकांतच्या प्रश्नाचं आता उत्तर देतो. वैजू समाजातल्या एका मोठ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करते. आजी, आत्या, मावशी, काकी या सर्वांनी लग्न निभावून नेली. त्यांनी समाधानी असल्याचे दाखवले. पण, कुरकुर केली नाही. त्यांच्या त्यागाचं आपण भारतीय स्त्रीला अलंकारात रूपांतर करून दिलं, मात्र तो वर्ग मोठा आहे. मुक्ताच्या किंवा पर्णच्या भूमिकेला जेवढा प्रतिसाद प्रेक्षकांचा येतो, त्यापेक्षा जास्त प्रतिसाद जेव्हा वैजू निर्णय घेते, तेव्हा कादंबरीला मिळतो. कारण, सर्वच स्त्रिया तिच्यात आपलं आयुष्य कुठे ना कुठे पाहत असतात. आपण कॉलेजच्या वयात एखाद्याच्या प्रेमात पडतो, उधळून जाऊन लग्न करतो आणि मग परिस्थितीचं भान येतं... या पुरुषप्रधान संस्कृतीत राहताना मग एक एक गोष्टी उलगडत जातात. मूल हवंय, स्त्रीने कमवायलाच हवंय, माझा अहंपणा आड येणारच! जन्माआधीपासूनच स्त्री ओझं घेऊन येते, त्यानंतर घरच्या परिस्थितीच ओझं येतं, ते घेऊन ती सासरी जाते, तिथे नवीन जबाबदारी येते, ते अजून वेगळं... या नाटकातल्या चार स्त्रिया चार वेगवेगळ्या काळातल्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. तिच्यात ‘सहन करणं’ नैसर्गिकदृष्ट्या आहे.
या नाटकासाठी कलाकारांची निवड अचूक आहे असे म्हंटले जाते. तेव्हा, या नाटकासाठी कलाकारांची निवड करताना कोणत्या निकषांचा विचार केला होता?


खरं सांगू का, नाटकाच्या तालमीची वेळ येते तेव्हा जरी आपण ‘कास्टिंग’चा विचार करत असलो तरी दिग्दर्शकाच्या डोक्यात त्याची चक्र फार पूर्वीच सुरू झालेली असतात. प्रत्येक नटाचं मी काम बघतो, मग ते स्पर्धेतील असो, प्रायोगिक रंगभूमीवरचं असो, अभिनय मी स्वतःही करतोच, चित्रपट करतो, आपण नेहमी क्षमता तपासत असतो. कलाकार निवडीच्या वेळी आपण त्या भूमिकेला साजेसा नट निवडतो, तर हे जे इतक्या वर्षांचं, अनुभवाचं बघणं असतं किंवा जोखणं असतं, त्यातून पटकन मनाच्या प्रतलावर ते नाव येतं. मुक्ताला घेताना मला आणि तिला स्वतःलाही वाटत होतं की, जुनं नाटक मी करतेय, तेव्हा माझ्यातल्या अभिनेत्रीला पूरक असं खाद्य हवं. ते या नाटकातून मिळतंय. कलाकार निवडीचा प्रवास असा संहितेचा जन्म होण्यापूर्वीपासून सुरू झालेला असतो.

केव्हा ना केव्हा या नाटकाचे प्रयोग थांबतील, पुढे कधी तरी सुरूही होतील. पण, तोपर्यंत अभ्यासकांसाठी दस्तावेज म्हणून नाटकाचे चित्रीकरण करण्याचा आपला विचार आहे का?तसं पाहिलं तर या नाटकाचं ‘डॉक्युमेंटेशन’करायला मी तयार नाही. नाटक हे नाटक म्हणूनच पाहावं. आता ते अभ्यासाच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास म्हणजे संदर्भासाठी नव्या कलाकारांना पाहायचे असेल, तर मला वाटतं तुझा मुद्दा रास्त आहे. बरोबर आहे, तुझं म्हणणं पटलंही. पण, कसं होतं की, आज ज्या स्त्रिया ‘चारचौघी’ बघायला येतात, त्यांनी त्यांच्या लहानपणी किंवा कॉलेजच्या दिवसांत हे नाटक पाहिलेलं असतं. त्या आज त्यांच्या मुलींना हे नाटक पाहायला सांगतात. उद्या तूही तुझ्या मुलीला या नाटकाबद्दल नक्की सांगशील. पण, तेव्हा तिला पाहण्यासाठी कदाचित हे नाटक रंगभूमीवर नसेलही. त्यासाठी संपूर्ण नाटक चित्रित करणं हा एकमेव उपाय उरतो. आज जरी नाटक इतकं गाजलं तरी प्रत्येकाने ते पाहिलेलं नसतं. माझा मुद्दा फक्त अनुभवाचा आहे. चित्रीकरण केल्यावर तिथेच ते पाहिलं जातं, पण अनुभव घ्यायचा असेल, तर मात्र चित्रपटगृहामध्ये या आणि नाटक पाहा आणि म्हणूनच आज ‘कोविड’नंतर जेव्हा ‘ओटीटी’ माध्यमांनी मनोरंजन क्षेत्रात आपलं बस्तान बसवलं होतं, तरीही या जुन्या नाटकाचे ५०च्या ५० प्रयोगच ‘हाऊसफुल’गेले. म्हणजे एकूणच काय तर दिवसेंदिवस आपली अभिरुची संपन्न होतेय आणि प्रेक्षकही प्रगल्भ होतोयआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.