यश म्हणजे नक्की काय असतं? तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय? यश तुम्हाला काय करण्यास प्रोत्साहित करते? यशस्वी लोकांकडे खूप पैसे आहेत का? मोठ्या गाड्या आणि बंगले आहेत का? ते निरोगी आहेत का? त्यांचे सुंदर कौटुंबिक संबंध आहेत का? त्यांना छान मुले आहेत का? किंवा तुम्हाला जे आवडते आहे ते त्यांना करण्याची संधी मिळाली आहे का? त्यांचे आयुष्य रोमांचक आहे का आणि त्यांची रोमांचक कारकीर्द आहे का? यश म्हणजे प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आहे का? यशाशी तुम्ही कुठल्या गोष्टी जोडत आहात? यश म्हटले, तर कुठला पहिला विचार तुमच्या मनात येतो? बहुतेक जणांची पहिली प्रतिक्रिया हातात भरपूर पैसे असणे ही असते. गर्भश्रीमंत असणे यश हे आहे का? भरपूर पैसा आणि संपत्ती या यशाच्या व्याख्या आहेत का?
जेव्हा तुम्ही यशाचा शोध घेताना ‘ऑनलाईन’ जाता आणि तेव्हा श्रीमंत कसे व्हायचे किंवा जीवनात यशस्वी कसे व्हायचे, याबद्दल तुफान माहिती तुम्हाला मिळेल. यामधून लोक पैशांबद्दल बोलताना दिसतात. भरपूर पैसा असणे आणि श्रीमंत असणे हे यशाचा विचार करण्यासाठी आवश्यक आहे, असे मानणारे अमाप लोक या जगात आहेत. हे आपल्यासाठी विचित्र नाही वा याबद्दल तसे आश्चर्यजनक वाटायचे कारण नाही. हे सर्व मीडिया, इंटरनेट आणि सामाजिक गटांवर प्रसिद्ध झालेले दिसून येते. आपण स्वतःला यश या संकल्पनेबद्दल प्रश्न विचारणे नेहमीच चांगली कल्पना आहे. विशेषत: संपत्ती हे चांगले जीवन जगण्याचा एक सुखदायी मार्ग असण्यापेक्षा ‘स्टेट्स सिम्बॉल’ आहे. जेव्हा आपण संपत्तीचा विचार करतो तेव्हा आपल्याला कपडे, फॅन्सी कार, छापील पैशांची सुटकेस, खासगी जेट, सिगार आणि एखाद्याकडे मिळू शकणार्या व सर्व लक्झरी वस्तू असलेले लोक दिसतात. यामध्ये एक गोष्ट समान आहे, त्या सर्व गोष्टी भौतिक आहेत. ते सर्व भौतिक यश आणि आर्थिक आणि संपत्ती या घटकांभोवती केंद्रित आहेत. आरोग्याच्या यशावर किंवा जीवनशैलीच्या यशावर यापैकी या गोष्टींचे विश्लेषण होताना दिसत नाही.
थोडा विचार केल्यावर यश आणि मोठेपणा म्हणजे जीवनाचा आनंद घ्या. मोठ्या प्रमाणावर पैसा असणे किंवा महागड्या भौतिक वस्तू बाळगण्याशी, यशस्वी असण्याचा काहीही संबंध नाही. सकाळच्या उगवत्या सूर्याचा आनंद घेणे किंवा कॉफी किंवा चहाच्या ताज्या कपातून वर जाणार्या वाफेचा फेसाळणारा प्रवाह पाहणे हे सौंदर्य आहे. आपण मित्रांसोबत हसतखेळत आहोत आणि स्वतःसाठी एक स्वादिष्ट जेवण बनवत आहोत, यात जो आनंद मिळतो, ते यश आहे. आपण इंटरनेटवर जे काही पाहतो, त्यापेक्षा यश पूर्णपणे वेगळे आहे. इंटरनेट जे मला अमाप पैसे, मोठी व्हिला किंवा महागड्या कार दाखवते, असूनही त्याची अनेकांना खरोखर पर्वा वाटत नाही. होय, आपल्याला एक सुंदर घर आवडेल. कदाचित एका दिवसात अनेक घरे मला आवडतील. परंतु, त्यासाठी खूप मोठा ‘व्हिला’ आपल्याकडे असण्याची गरज नाही आणि महागड्या कारची पर्वा करण्याची गरज नाही. सामान्य दृष्टीने या गोष्टींचा आनंदाशी, जगण्याच्या आनंदाशी मूलभूत पातळीवर तसा काहीही संबंध नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यश या संकल्पनेबद्दल स्वतःपुरते तरी सोपे सरळ उत्तर शोधणे. तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय? महान जीवन जगणे म्हणजे काय? आपले वैयक्तिक मोठेपण अनुभवण्यासाठी काय पाहिजे. बर्याचदा ते भौतिक गोष्टींबद्दल नसते. परंतु, यश आपल्याला कसे वाटते, आपला अनुभव काय, याबद्दल अधिक असते. आत्मविश्वास, आनंदी, दयाळू, प्रेमळ, धैर्यवान असण्याबद्दल असते. आयुष्यात सर्व गोष्टी आपण मिळवू शकत नाही. परंतु, फक्त अनुभवू शकतो.
जर तुम्ही खरोखर गर्भश्रीमंत असाल, तर तुम्हाला तुमच्या गळ्यात दशलक्ष डॉलर्सची हिर्याची साखळी घालण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या लैंगिकतेबद्दल खरच विश्वास असल्यास तुम्हाला दहा मुली तुमच्या सभोवताली फिरवण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला यशाबद्दल खरोखर आत्मविश्वास असेल, तुम्ही खरोखर श्रीमंत असाल, तर तुम्ही साधा पांढरा शर्ट घालून वावरत असता. का? कारण, तुम्हाला माहीत आहे की, तुम्ही श्रीमंत आहात आणि आत्मविश्वासी आहात, तुम्हाला ते जगासमोर सिद्ध करण्याची गरज नाही.
यश ही अशी गोष्ट आहे, जी केवळ आपली आपणच अनुभवू शकतो आणि जर आपल्याला जगाला आपला आत्मविश्वास सिद्ध करावयाची गरज भासत असेल तर याचा अर्थ आपल्यात आत्मविश्वास नाही. कारण एखादी गोष्ट सिद्ध करण्याची तुमच्यातील गरज त्या गोष्टीच्या अभावामुळे येते. मी किती महान आहे, हे मला जर जगाला सिद्ध करायचे असेल, तर मी माझे सर्व यश तुमच्यासोबत ‘शेअर’ करेन. तरीही मला जाणवत राहील की, माझ्या खात्यात आणखी डझनभर अपयश आणि अनेक समस्या आहेत.
उत्साह न गमावता अपयशाकडून अपयशाकडे जात वाटचाल करणे यश असते. तुम्हाला ही म्हण माहीत आहे का जगात एकाच गोष्ट फक्त शाश्वत असते ती म्हणजे बदल! जेव्हा जीवन स्थिर आहे असे भासते, तेव्हा एखाद्या प्रकारची उलथापालथ तुम्हाला पूर्णपणे वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याची संभावना अधिक असते. ओप्रा विन्फ्रे यांनी एक सुंदर वाक्य उद्धृत कलेले आहे, ते असे - आतापर्यंतचा जगातला सर्वात मोठा शोध हा आहे की, एखादी व्यक्ती केवळ आपली वृत्ती बदलून आपले भविष्य बदलू शकते. यशाची प्रवृत्ती अंगी असेल, तर गगन ठेंगणे होऊन जाते.
- डॉ. शुभांगी पारकर