मनसेच्या पाठपुराव्यामुळे अखेर ‘तो’ तरण तलाव होणार खुला

निवडणुकीच्या तोंडावर नामकरण केलेल्या तरण तलावाची मनसेने केली होती ‘पोलखोल’

    23-Jun-2022
Total Views |

pool
 
 
 
 
 
 
ठाणे : वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील लोकमान्य पाडा नं. १, आकृती गृहसंकुलाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या तरण तलावाचे २०१९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करून नामकरण करण्यात आले होते. मात्र, तरण तलाव बंदच असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ‘पोलखोल’ करून ठाणे महापालिकेला लेखी जाब विचारला होता. त्यानंतर पंधरवड्यातच महापालिकेने अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागवून हा तलाव खासगी संस्थेला पाच वर्षांकरिता चालविण्यास देण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत तरण तलाव सुरू होणार असल्याने मनसेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
 
 
  
ठाणे महापालिकेच्या लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत येणार्‍या या तलावाचे ’स्व. रामचंद्र ठाकुर तरण तलाव’ असे नामकरण करण्यात आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल अडीच वर्षे उलटूनही तलाव बंदच होता. तरण तलाव विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच,निगा देखभालीकरिता आर्थिक तरतूद नव्हती. तेव्हा, मनसेच्या संदीप पाचंगे यांनी यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारला होता. दरम्यान, रहिवाशांसाठी हा तरण तलाव सुरू झाल्यास नागरिक व जलतरणपटूंचा ठाणे पालिकेच्या मारोतराव शिंदे व रामा साळवी तरण तलाव येथील फेरा टळणार आहे. मनसेच्या पाठपुराव्यामुळे येत्या काही महिन्यात वर्तकनगर, लोकमान्य नगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर, चिरागनगर, भीमनगर परिसरातील नागरिकांना या तरण तलावाचा लाभ घेता येणार आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.