राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा कर्णावती येथे उत्साहात संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2022
Total Views |

RSS
 
 
कर्णावती : रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक गुजरातमधील कर्णावती येथे रविवार, दि. १३ मार्च रोजी संपन्न झाली.या बैठकीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले की, “देशभरातून संघाचे कार्यकर्ते अखिल भारतीय प्रतिनिधी सभेस उपस्थित राहतात. त्यामुळे ही सभा महत्त्वाची आहे.
 
 
कोरोना निर्बंधांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांची संख्या कमी असून, सुमारे १,२५२ कार्यकर्त्यांनी येथे उपस्थिती दर्शवली. दर तीन वर्षांनी संघकार्याच्या विस्ताराची योजना केली जाते, त्याच्या समीक्षेसाठीची बैठक वर्षातून दोन वेळा होते. ग्रामीण क्षेत्रात देशातील ५० टक्के मंडळांमध्ये दैनंदिन शाखा, साप्ताहिक मिलनाच्या स्वरूपात संघकार्य पोहोचले असून, शहरी क्षेत्रात ४५ ते ५० टक्के वस्त्यांमध्ये संघशाखा किंवा साप्ताहिक मिलन सुरू आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हे कार्य पूर्ण करण्याचे ध्येय आहे. यासाठी योजना तयार असून, पूर्णवेळ कार्यकर्तेही आहेत,” असे त्यांनी सांगितले.
 
 
ते पुढे म्हणाले की, “केवळ संख्यात्मक दृष्टीने संघकार्य वाढणे हे संघाचे उद्दिष्ट नाही. राष्ट्राला पुढे नेणार्‍या माणसांच्या रूपामध्ये संघाचे स्वयंसेवक प्रत्येक मंडळ, वस्ती, गावामध्ये असतील, हे उद्दिष्ट आहे. स्वयंसेवक संकटकाळी समाजाला जोडण्याचे कार्य करतात. त्यामुळे आपल्या संघटनेची शक्ती वाढवणे हे आमचे उद्दिष्ट नसून, समाजाची शक्ती वाढवणे, हे उद्दिष्ट आहे. एकता, समरसता, सामाजिक संघटनभाव वाढवण्यासाठी संघाची शाखा आहे, हे समजून घेऊन समाजाने संघकार्याचे केवळ स्वागतच केले नाही, तर हे आपलेच कार्य आहे, अशा भावनेने याचा स्वीकार केला. गेल्या काही वर्षांमध्ये संघकार्यात येणारे बंधू-भगिनी किंवा सरसंघचालकांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या संपर्कात व्यक्ती केवळ संघाचे समर्थनच करत नाहीत, तर आम्ही काय करू शकतो ते सांगा, असेही विचारतात, यावरून समाजातील लोक संघाला जोडून घेऊ इच्छितात, हेच दिसून येते. ‘जॉईन आरएसएस’च्या माध्यमातून लाखो लोकांनी संघास जोडून घेण्याची इच्छा दर्शवली, कोरोना काळामध्येसुद्धा समाजकार्य करण्यासाठी लोक संघाकडे आले,” असे त्यांनी सांगितले.
 
 
ते पुढे म्हणाले की, “समरसता, सुरक्षा, भौतिक जीवनाची उन्नती, मागास जातिजमाती इ. विषयांमध्ये संघ स्वयंसेवक कार्यरत आहेत. समाज परिवर्तनाचे एक मोठे अभियान रा. स्व. संघाने समाजाच्या सहभागासह स्वयंसेवकांच्या पुढाकाराने परिणामकारक स्वरूपात पुढे नेले आहे. जसे की, प्रत्येक जिल्ह्यातील ‘एक गाव आदर्श गाव’ बनवण्याची संघाची योजना आहे. ग्रामविकास या विषयामध्ये कृषीसोबतच, गावाचे स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य, समरसता, सामाजिक सुरक्षा, या गोष्टींचा विकास करत ग्रामविकासाच्या कार्यात आम्ही पुढे जात आहोत. तसेच, पर्यावरण, सामाजिक समरसता, गोसेवा, कुटुंब प्रबोधन, या विषयांमध्ये स्वयंसेवक समाजाबरोबर कार्यरत आहेत. काही घटकांकडून देश-विदेशामध्ये भारताविषयी एक चुकीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. भारताचे योग्य चित्रण समाजासमोर ठेवायला हवे. त्यासाठी भारताचा एक योग्य विमर्श प्रभावीपणे मांडण्याचे काम येत्या तीन ते चार वर्षांत करायचा निर्णय झाला आहे. त्याचा विचारसुद्धा प्रतिनिधी सभेच्या बैठकीत झाला,” असेही ते म्हणाले.
 
 
“हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडणार्‍या लोकांसमोर केवळ देशास स्वतंत्र करण्याचे उद्दिष्ट नव्हते, तर भारतास समृद्ध देश बनवण्याचेही स्वप्न होते, ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम सध्याच्या पिढीने करायला हवे, यासंबंधीही या बैठकीमध्ये विचार झाला. भारताकडे मोठी क्षमता असून, त्याचा उपयोग करून देश ‘आत्मनिर्भर’ होऊ शकतो. यासाठी सरकारबरोबरच समाजानेसुद्धा कार्य करायला हवे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
होसबळे यांनी अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाचीसुद्धा चर्चा केली. ते म्हणाले की, “स्वावलंबी भारताचे निर्माण करणार्‍या स्वदेशी आर्थिक मॉडेलचा एक आग्रहपूर्वक प्रयत्न व्हायला हवा, ज्यामध्ये शिक्षणसंस्था, उद्योगजगत, सामाजिक आणि धार्मिक नेतृत्व या सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास जगामध्ये एक संपन्न राष्ट्र म्हणून आपण उभे राहू शकू, यासंबंधी प्रस्ताव या बैठकीत झाला,” असे होसबळे यांनी नमूद केले.
 
 
प्रश्नोत्तरांदरम्यान होसबळे यांनी सांगितले की, “धार्मिक स्वातंत्र्याचा योग्य तर्‍हेने उपयोग करून घेतला पाहिजे. मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य असून, जास्तीत जास्त प्रमाणात मतदान झाले पाहिजे, यासाठी संघ नेहमीच आग्रही राहिला आहे,” अशी माहिती दत्तात्रेय होसबळे यांनी दिली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@