जावेदमियाँची निरर्थक चिंता

    दिनांक  12-Jan-2022 11:12:58
|

javed akhtar
 
 
 
जावेद अख्तर बुद्धिजीवी, विचारवंत असतील तर त्यांनी स्वधर्माबद्दल, मुस्लीम धर्मीयांबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मीयांसाठी अर्थात सगळ्याच भारतीयांसाठी बोलायला हवे होते. अर्थात, त्यांना तसे करायचे नाही, कारण जावेद अख्तर यांना स्वतःचे मुस्लिमत्त्वच प्रिय आहे, भारतीयत्त्व नव्हे.
 
 
 
काल्पनिक धोक्याबद्दल राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. पण, २० कोटी भारतीयांच्या (मुस्लिमांच्या) नरसंहाराच्या उघडपणे देण्यात आलेल्या धमकीबद्दल शब्दही नाही, असे का केले मिस्टर मोदी?,” असा प्रश्न विचारत हिंदी चित्रपट गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या रक्तातले मुस्लिमत्त्वच दाखवून दिले. प्रसारमाध्यमांतील एका कंपूकडून जावेद अख्तर यांना सातत्याने बुद्धिजीवी, विचारवंत म्हणून पेश केले जाते. त्यांच्या विधानांना प्रसिद्धी देताना ते प्रगल्भ, विवेकी, ज्ञानी आणि सर्व समाजाचा विचार करणारे असल्याचे सांगितले जाते. तसेच भारतासमोरील प्रश्न, समस्यांवरही जावेद अख्तर यांचे मत विचारले जाते. पण, त्यांच्या नसानसात भारतीयत्व नाही, ते संपूर्ण भारतीयांबद्दल विचार करु शकत नाहीत, तर ते फक्त मुस्लिमांबद्दलच लिहू-बोलू शकतात. त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या मुस्लिमत्त्वाची खात्री जावेद अख्तर यांच्या पंतप्रधानांना विचारलेल्या प्रश्नांतूनच पटते. कारण, त्यांनी फक्त २० कोटी भारतीयांची अर्थात मुस्लिमांची काळजी वाटत असल्याचे दर्शवत प्रश्न विचारला. पण, जावेद अख्तर बुद्धिजीवी, विचारवंत असतील तर त्यांनी स्वधर्माबद्दल, मुस्लीम धर्मीयांबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मीयांसाठी अर्थात सगळ्याच भारतीयांसाठी बोलायला हवे होते. अर्थात, त्यांना तसे करायचे नाही, कारण जावेद अख्तर यांना स्वतःचे मुस्लिमत्त्वच प्रिय आहे, भारतीयत्त्व नव्हे.
 
 
 
जावेद अख्तर यांच्या विधानातला पहिला भाग पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये एका उड्डाणपुलावर अडकण्यासंदर्भातला आहे. मोदी सभेला न जाता माघारी फिरले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, ते निरर्थक होते, असे जावेद अख्तर यांचे म्हणणे आहे. कारण, नरेंद्र मोदींच्या जीवाला तिथे अजिबात धोका नव्हता, हा जावईशोध जावेद अख्तर यांनी लावला. अर्थात, डोळे, कान आणि मेंदू बंद करुन स्वतःच्याचमनोराज्यात हुंदडले की, असेच होणार. तशी गत सध्या जावेद अख्तर यांचीच नव्हे, तर त्यांच्यासारख्याच नसीरुद्दीन शाह आणि तमाम छद्मपुरोगाम्यांची झालेली आहे. त्यांना जगात-देशात काय चालले, ते पाहायचेच नाही, तर आपल्या मना-मेंदूतल्या काल्पनिक खेळालाच जग समजायचे आहे. नुकतीच बंदी घातलेल्या ‘सीख्स फॉर जस्टीस’ या खलिस्तानवादी संघटनेने वकिलांना दूरध्वनी करत उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा मार्ग रोखण्यामागे आपलाच हात असल्याची कबुली दिली. यावेळी या लंडनस्थित संघटनेने न्यायालयात या प्रकरणात बाजू मांडू नका, अशी धमकीही वकिलांना दिली. खलिस्तानवाद्यांनी याआधी देशाच्या पंतप्रधानांचा जीव घेतलेला आहे. तसेच कृत्य आताही करण्याचा ‘सीख्स फॉर जस्टीस’ संघटनेचा डाव होता. त्याआधी ‘इंदिरा को ठोक दिया, मोदी क्या चीज है,’ अशा घोषणाही देण्यात आलेल्या आहेत. पण, जावेद अख्तर यांना या सगळ्या घडामोडी दिसत नाहीत, दिसल्या तरी मेंदूचे काम ठप्प पडल्याने त्यांचा अर्थ लागत नाही. म्हणूनच नरेंद्र मोदींचा ताफा अडवणार्‍यांना, जावेद अख्तर काल्पनिक धोका समजतात.
 
 
 
दरम्यान, धर्मसंसदेतील मुस्लिमांच्या नरसंहाराच्या धमकीवर मोदींनी प्रतिक्रिया दिली नाही, हा जावेद अख्तर यांचा आक्षेप आहे. पण, कोणत्याही विषयावर मोकाट बरळत सुटण्यापेक्षा जावेद अख्तर यांनी त्याची पार्श्वभूमीही समजून घेतली पाहिजे. भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली आणि मुस्लिमांना दोन देश मिळाले, तर हिंदूंना धर्मनिरपेक्ष राज्य मिळाले. त्यात २३ लाख हिंदू मारले गेले, ९०च्या दशकात काश्मीर खोर्‍यातून तीन ते सहा लाख हिंदूंना पिटाळून लावले गेले, हिंदू महिलांवर अत्याचार केले गेले, त्यांच्या मुलांना मारुन टाकले गेले. २०१३ साली अकबरुद्दीन ओवेसीने १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवू, अशी धमकी दिली, तर २०१४ नंतर दिल्ली, बंगळुरुसह ठिकठिकाणी धर्मांध मुस्लिमांनी हिंदूंविरोधात दंगली घडवून आणल्या. हिंदूंना न्याय देणार्‍या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात खालाजान, फुफीजानला पुढे करुन आंदोलन केले गेले. त्यातूनच ‘हिंदुत्व की कबर खुदेगी’सारखे नारे देत वेगवेगळ्या विद्यापीठांत हिंसाचार करण्यात आला. गेल्याच वर्षी काश्मीरमध्ये हिंदूंना वेचून वेचून ठार मारण्यात आले. मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये हिंदूंच्या घरादारांवर, वाहनांवर, दुकानांवर हल्ले करण्यात आले. आजही ‘लव्ह-लॅण्ड जिहाद’द्वारे हिंदूंवरील धर्मांध मुस्लिमांचे आक्रमण सुरुच आहे. त्यातले काही ज्ञात तर बरेच अज्ञात आहेत. त्यावरुनच न्यूटनच्या क्रियेला प्रतिक्रिया या तिसर्‍या नियमाप्रमाणे धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले असावे. त्यातील कथित नरसंहाराच्या विधानांचे समर्थन करता येत नाहीच, पण ही वेळ इस्लामी कट्टरपंथीयांनी स्वतःहूनच आणली होती, हिंदूंनी नाही.
 
 
 
हिंदूंविरोधात धर्मांध मुस्लीम चेकाळल्यासारखे बडबडत होते, हिंसाचारी कृत्ये करत होते, तेव्हा जावेद अख्तर यांची दातखीळ का बसली होती? धर्मसंसदेतील विधानांवरुन फक्त २० कोटी मुस्लिमांना ‘भारतीय’ ठरवणारे जावेद अख्तर इस्लामी कट्टरपंथीयांच्या कृतीवेळी हिंदूही भारतीय आहेत, हे का विसरले होते? जावेद अख्तर यांनी आपल्या प्रसिद्धीचा वापर हिंदूविरोधी भूमिका घेणार्‍या धर्मांध मुस्लिमांचे प्रबोधन करण्यासाठी का केला नव्हता? प्रबोधनासाठी हिंदू-मुस्लीम वादांतला अयोध्या आणि मथुरेचा मुद्दाही त्यांना हाती घेता आला असता. कारण, त्यावरुनच मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी देशात सातत्याने धुडगूस घातलेला आहे. तरीही बुद्धिजीवी, विचारवंताच्या थाटात बोलणार्‍या जावेद अख्तर यांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी हिंदूंची आहे, हिंदू धर्मीयांचा न्याय्य हक्क त्यांना सन्मानाने दिला पाहिजे, असा उपदेश आपल्या मुस्लीम समाजबांधवांना का केला नव्हता? जेणेकरुन त्यांच्या मनातला राग कमी होईल. इतकेच नव्हे तर पाकिस्तान-बांगलादेशात हिंदूंवर नेहमी अत्याचार केले जातात, गेल्याच वर्षांत बांगलादेशात हिंदूंविरोधात दंगल घडवून आणण्यात आली होती. त्यावेळी जावेद अख्तर यांनी शिष्टमंडळ घेऊन जात त्या देशातील इस्लामी कट्टरपंथीयांचे प्रबोधन का केले नव्हते? जावेद अख्तर यांनी तसे केले नाही, कारण त्यांना भारतीयांची वा हिंदूंची नव्हे, तर फक्त मुस्लिमांचीच काळजी वाटते. आजही त्यांनी मुस्लिमांसाठीच पंतप्रधानांना प्रश्न विचारला. पण, त्यावर पंतप्रधानांनी बोललेच पाहिजे, असे नाही. कारण, धर्मसंसदेत काही गैर झाले असेल तर कायदा आपले काम करणारच आहे. महत्त्वाचे म्हणजे, हिंदूंनी शेकडो वर्षांपासून आणि स्वातंत्र्यानंतरही मुस्लिमांशी सौहार्दाचे संबंध ठेवलेले आहेत, इस्लामी कट्टरपंथीयांप्रमाणे कोणाचाही नरसंहार केलेला नाही. त्यामुळे जावेदमियाँनीही कोणाच्या कथित धमकीवरुन निरर्थक चिंता करु नये, कायद्यावर विश्वास ठेवावा!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.