मुलांच्या आरोग्यात दातांना विशेष महत्त्व दिले जाते. बर्याच वेळा मुलांच्या दातांसंबंधी अनेक गैरसमज असतात. दात उशिरा येणे, दात किडणे, दात पुढे येणे, वाकडे येणे, दुहेरी दात येणे, दात पिवळे दिसणे इत्यादी अनेक कारणांबद्दल पालकांचे गैरसमज असतात व त्यामुळे बर्याच वेळा चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो. तेव्हा, लहान मुलांचे दंतआरोग्य कसे राखावे, याची माहिती आजच्या लेखात करुन घेऊया...
.
मुलांमध्ये दुधाचे दात येण्यास साधारणत: पाचव्या ते सातव्या महिन्यांत सुरुवात होते. सुरुवातीस पुढचे दात येतात व नंतर सुळे व दाढा येतात. साधारणत: दोन वर्षांपर्यंत दुधाचे सर्व दात म्हणजे २0 दात आलेले असतात. काही मुलांमध्ये दात येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू होते. मूल सशक्त असल्यास व इतर शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होत असल्यास सव्वा वर्षापर्यंत जरी दात येण्यास सुरुवात झाली नाही, तरी विशेष काळजी करण्याचे कारण नसते. जास्त काळजी वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, घरगुती उपाय करू नये. दुधाचे दात येण्याच्या वयामध्ये बर्याच मुलांना उलट्या, जुलाब, चिडचिड, ताप येणे, लाळ गळणे इत्यादी लक्षणांचा त्रास होतो. या वयामध्ये कुठलीही वस्तू तोंडात टाकण्याची मुलांना सवय असते. त्यामुळे जंतूंचा संसर्ग होऊन उलट्या, जुलाब, ताप येणे इत्यादी लक्षणे जास्त दिसतात. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष दात येण्याच्या प्रक्रियेशी काही संबंध नसतो. वरील लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, दुर्लक्ष करू नये.
‘डेंट टॉनिक’च्या गोळ्या या दात येण्याची प्रक्रिया सुलभ करते, असा बर्याच पालकांचा समज असतो. मात्र, अशा गोळ्या तज्ज्ञ होमिओपॅथच्या मार्गदर्शनाखाली घ्याव्या. जास्त दिवस अशा गोळ्या घेतल्याने अपाय होण्याची शक्यता असते. आयुर्वेदामध्ये ‘बालचर्तुभद्र चूर्ण’ किंवा ‘दंतोदभेद गदांतक’ रस ही औषधे दात निघताना होणार्या आजारांसाठी वापरतात. दात लवकर न आल्यास कॅल्शिअमचे सिरप (Macalvit Syrup)दिले जाते.वयाच्या सात ते १२ वर्षांपर्यंत दुधाचे दात पडून, काही महिन्यांतच त्यांची जागा कायमच्या दातांनी घेतली जाते. २0 दुधाचे दात पडून त्यांची जागा २0 कायमचे दात येतात. याशिवाय आणखी १२ कायमच्या दाढा या वयाच्या सहा ते २५ वर्षांपर्यंत येतात. त्यामुळे मोठ्या माणसामध्ये दातांची संख्या ३२ होते. सहा ते १२ वर्षे या वयाच्या मुलांमध्ये दुधाचे दात व कायमचे दात असे दोन्ही प्रकारचे दात आढळतात.
या वयात दात किडल्यास तो दात पडून जाणार आहे, विशेष लक्ष देण्याची गरज नाही, असे पालकांना बर्याच वेळा वाटते. मात्र, तो दात जर कायमच्या स्वरूपातला असेल तर त्यामुळे दाताच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.दातांची निगा दात घासण्यास सुरुवात केव्हा करावी, हा प्रश्न डॉक्टरांना बर्याच वेळा विचारला जातो. मुलांमध्ये पहिला दात दिसल्यापासून तो स्वच्छ ठेवण्याची काळजी पालकांनी घ्यावी. सुरुवातीस छोट्या ब्रशने मुलांचे दात पालकांनी स्वच्छ करावेत. पुढे मूल थोडे मोठे झाल्यावर त्याला स्वत: दात घासण्यास शिकवावे. मूल शाळेत जाऊ लागल्यावर सकाळी व रात्री दात घासण्याची सवय लावावी.
दात घासताना फक्त दातांवर ब्रश न फिरवता तो हिरडीपासून दातांवर अर्धवर्तुळाकार पद्धतीने फिरवावा.
१) उजव्या बाजूला वरचे दात, खालचे दात आतून, बाहेरून व पृष्ठभागावर.
२) डाव्या बाजूला वरचे, खालचे दात आतून, बाहेरून व पृष्ठभागावर.
३) समोरील वरचे व खालचे दात आतून व बाहेरून या क्रमाने प्रत्येक हिरड्यांवर व दातांवर ब्रश फिरविल्याने हिरड्यांनाही मसाज मिळते, चूळ भरतानाही तर्जनीच्या बोटाने हिरड्यांना व दातांना व्यवस्थित मसाज द्यावा. बरीच मुले दात घासण्यासाठी व्यवस्थित वेळ देत नाहीत व कसे तरी दात घासून आपले कर्तव्य पार पाडतात.
यामुळे पुढे त्यांना दातांच्या आजाराशी सामना करावा लागतो व एकदा वाईट सवय जडल्यास ती आयुष्यभर टिकून राहते. जेवण झाल्यावर व्यवस्थित चूळ भरावी. बर्याच शालेय विद्यार्थ्यांचे दात पिवळे व किडलेले दिसतात, यास त्याच्या वाईट सवयी कारणीभूत असतात.काही वर्षांपूर्वी एका शाळेत मुलांची दातांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये अनेक मुलांचे दात पिवळे व किडलेले आढळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील बर्याच मुलांना सिगारेट, पान, मावा व तंबाखू खाण्याची सवय होती. मोठ्या वर्गातील मुलांनी वरील सर्व सवयी टाळाव्यात, कारण त्यामुळे फक्त दातांची नव्हे तर सर्व शरीराची हानी होते.
दातांचे आजार
मुलांमध्ये आढळून येणारे दातांचे आजार पुढीलप्रमाणे आहेत.
१) दाताला कीड लागणे. २) दात पिवळे पडणे. ३) दात वेडेवाकडे वा पुढे येणे. ४) दुहेरी दात येणे.
दाताला कीड लागणे (Carries of teeth)
दात ब्रशने व्यवस्थित न घासल्यास किंवा जेवणानंतर व्यवस्थित चूळ न भरल्यास दातांच्या फटीमध्ये अन्नकण जमा होऊन ते कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. या अन्न कणांवर जंतू वाढू लागतात. या जंतूमधून तयार होणार्या द्रव पदार्थामुळे दाताचे कवच किंवा इनॅमल नष्ट केले जाते व दात किडण्यास सुरुवात होते. या अवस्थेत दुर्लक्ष केल्यास ही कीड झपाट्याने पसरून दाताच्या नसेवर व मुळांवर परिणाम करू लागते. बाटलीने दूध पिणे, जास्त प्रमाणात गोळ्या, चॉकलेट, च्युईंग गम खाणे, दात व्यवस्थित न घासणे, यामुळे दातांना लवकर कीड लागते. काही मुलांमध्ये दात अर्धवट तुटलेले व काळे होतात. जेवताना दातांना ठणका बसणे, दात वारंवार दुखणे, हिरड्यामध्ये पू होऊन गालाला सूज येणे, ताप येणे, शरीराची वाढ व्यवस्थित न होणे इत्यादी लक्षणे दात किडल्यामुळे लहान मुलांमध्ये आढळू शकतात.
प्रतिबंधात्मक उपचार
दात दिवसातून दोन वेळा व्यवस्थित घासणे, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणे, जास्त गोळ्या, चॉकलेट न खाणे, धूम्रपान, पान, तंबाखू इत्यादी व्यसनांपासून दूर राहिल्यास दात सहसा किडणार नाहीत. याशिवाय पालकांनीही आपल्या मुलांना वर्षातून एकदा दंतवैद्याकडे तपासणीसाठी न्यावे. या तपासणीत काही दोष आढळल्यास त्वरित इलाज केला जाऊ शकतो.
उपचार दाताला कीड कमी प्रमाणात असल्यास साध्या फिलिंगचा उपचार करता येतो. कीड जर मुळापर्यंत पसरली असेल, तर ‘रूट कॅनाल फिलिंग’चा उपचार केला जातो. दुधाचे दात काढण्याचे शक्यतो टाळले जाते, कारण हे दात लवकर काढल्यास रिकामी झालेली जागा बाजूचे दात हे काही प्रमाणात घेतात व त्यामुळे जेव्हा कायमचा दात निघण्याची वेळ येते, तेव्हा तो दात बाहेर निघण्यास हिरडीवर पुरेशी जागा उपलब्ध नसते. यामुळे दात वेडे-वाकडे येऊ शकतात.
दात पिवळे पडणेकाही मुलांचे दात अतिशय पिवळे दिसतात. गरोदरपणात किंवा आठ वर्षांपेक्षा लहान मुलांना ‘टेट्रासायक्लिन’सारखी औषधे दिली गेली असल्यास दात पिवळे पडतात. याशिवाय पान, तंबाखू व धूम्रपान यामुळेदेखील दाताचे पांढरेपण नाहीसे होते. दात व्यवस्थित न असल्यास सुपारीच्या तुकड्यासारखे आवरण दातावर चढू लागते व दातांचा पांढरेपणा नाहीसा होतो.उपचार दंतवैद्याकडे जाऊन त्वरित उपचार करून घेणे. औषधामुळे दातांना आलेले पिवळेपणा सहसा जात नाही. परंतु, सध्या उपलब्ध असलेल्या ब्लिचिंगसारख्या आधुनिक उपाचाराने दाताचे पिवळेपण कमी होऊ शकते.दात वेडेवाकडे वा पुढे येणे दाताची ठेवण व्यवस्थित नसल्यास चेहर्यास विद्रूपपणा येऊ शकतो. खासकरून दात पुढे असल्यास हा त्रास जास्त जाणवतो. या व्यंगाचा खासकरून मुलींच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो व पुढे लग्न जमण्यासदेखील त्रास होतो.
उपचार
‘ऑरथोडॉन्टिस्ट’च्या सल्ल्याने यावर उपचार करावे. हे उपचार साधारणत: १२ ते १३व्या वर्षी सुरू केले जातात व दीड ते दोन वर्षे हे उपचार चालू राहतात.
दुहेरी दात येणे
काही मुलांमध्ये दुधाचा दात पडण्याआधी कायमचा दात येण्यास सुरुवात होते.
उपचार
दंतवैद्याकडे जाऊन दुधाचा दात लवकरात लवकर काढून घेणे. असे न केल्यास कायमच्या दातांसाठी व्यवस्थित जागा उपलब्ध होत नाही व दात वेडा-वाकडा येतो.
-डॅा. मिलिंद