आदित्यची आशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2021   
Total Views |

Aditya Thackeray _1 
 
राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मुंबईच्या लसीकरणासंदर्भात एक मोठा आशावाद व्यक्त केला. “लसींचा पुरेसा पुरवठा झाला तर संपूर्ण मुंबईचे लसीकरण अवघ्या तीन आठवड्यांत करू,” असे ते म्हणाले. हो, आता लगेच उर्वरित महाराष्ट्राचे काय? आधीच महाराष्ट्र वार्‍यावर, त्यात लसीकरणाला मुंबईला झुकते माप का? वगैरे प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत! का नाही म्हणता, कारण आदित्य ठाकरे राज्याचे पर्यावरणमंत्री असले तरी मुंबईचे मात्र ते पालकमंत्री! म्हणजे मुंबईकरांच्या पालकत्वाची किती मोठी जबाबदारी त्यांच्या माथी! म्हणून त्यांचे आधी मुंबई, मग महाराष्ट्र! आदित्य ठाकरेंच्या या घोषणेनंतरच आरोग्यमंत्र्यांनीही लगोलग घोषणा केली. ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणावरच आरोग्यमंत्र्यांनी एकाएकी ब्रेक लावला. त्यामुळे पुढील काही दिवस तरी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होण्याची शक्यता तशी धुसरच. पण, खरंतर आदित्य ठाकरेंना हीच संधी आहे. या १५ ते २० दिवसांच्या मिळालेल्या कालावधीत राज्याचे सोडाच, किमान मुंबईपुरत्या लसी तरी उपलब्ध करता येतील, याची त्यांनी किमान चाचपणी करावी. खरंतर एकट्या मुंबईची २०२०पर्यंतची अंदाजे लोकसंख्या ही दोन कोटींच्या घरात. त्यात काहींचे लसीकरण झालेले, तर काही १८ वर्षांखालील नागरिक पकडले, तरी पहिल्या टप्प्यातच दोन कोटींच्या आसपास लसींच्या मात्रा लागतील आणि पुढे दुसर्‍या डोससाठी आणखीन तेवढ्याच मात्रा. म्हणजे जवळपास चार कोटी डोस! आता एवढ्या मोठ्या संख्येने लस या आपत्काळात उपलब्ध होणे कर्मकठीण. त्यात परदेशातील लसींचा पर्याय आहेच आणि जरी लसींच्या एवढ्या मात्रा उपलब्ध झाल्याच तरी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण तीन आठवड्यांत करण्यास कितपत सक्षम आहे? लससाठ्याची तेवढी जागा/व्यवस्था आहे का? प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्रे सुरू आहेत का? लसीकरणासाठी लोकसंख्येचा डेटा आहे का? सोसायट्यांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली त्याचे काय? ‘ड्राईव्ह इन लसीकरण’ असे व्यापक पातळीवर राबविता येईल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. तेव्हा, उगाच मुंबईकरांना लसीच्या फसव्या आशा दाखवून अजून निराशेच्या गर्तेत ढकलू नका, हीच आशा!
 
 

मुंबईकरांची निराशाच!

 
 
आरोग्यमंत्र्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला तात्पुरता लाल सिग्नल दिला ते एकाअर्थी बरंच केलं. कारण, १ मेपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आज १३ दिवसांनंतरही कोट्यवधी मुंबईकर लसीकरणापासून वंचितच आहेत. कारण, ज्या ‘कोविन’ अ‍ॅपवर या लसीकरणासाठी ‘स्लॉट’ची नोंदणी करायची आहे, त्यासाठी ‘केबीसी’प्रमाणे ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ची जणू अदृश्य स्पर्धाच सुरू आहे. पण, कितीही रिफे्रेश करा, वेळेच्या आधी, वेळेत, वेळेनंतर बुकिंगचा प्रयत्न करा, अवघ्या १५ मिनिटांत सगळे लाल अक्षरात ‘बुक्ड!’ म्हणजे आधी १८-४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रं नव्हती, नंतर त्याचा स्वतंत्र पर्याय नोंदणीसाठी देण्यातही आला. पण, आता लसीकरण केंद्रे असली तरी लसच उपलब्ध नाही, अशी गत! त्यामुळे हे लसीकरण म्हणजे संध्याकाळच्या एक तासाच्या लॉटरीचा जुगाडच! तुम्हाला लॉटरीरूपी हा ‘स्लॉट’ लागला, तर ‘बेस्ट’, नाही तरी ‘ट्राय अगेन लेटर!’ एवढे होऊनही जणू मुंबईकरांना खिजवण्यासाठी ‘स्लॉट’ रात्री 8 वाजता उघडल्यानंतर रात्री ९ वाजता पालिकेचे ट्विटही हजर- ‘आजचे बुकिंग पूर्ण झाले.’ म्हणजे दिवसभरात या अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी कधीही करता येत असली, तरी लसीकरणाची रीतसर अपॉईंटमेंट घेण्यासाठी आधी पालिकेच्या ट्विटवर ‘स्लॉट’ किती वाजता उघडणार या घोषणेची वाट बघायची आणि मग ट्विटरवर वेळ कळताच अगदी तुटून पडायचे. रिफ्रेश...रिफ्रेशचा खेळ करत राहायचा. याच आशेवर की, कालच्या पेक्षा आजची संध्याकाळ कदाचित ‘लकी’ ठरेल. आज लसरूपी अमृताच्या कलशाकडे पहिले पाऊल मी टाकणारच! पण, कसले काय, अवघ्या पाचच मिनिटांत अमृताचा कलश सोडा, मानसिक क्लेशच पदरी पडतो. मोबाईल, संगणकावर एवढे डोळे फाडले, फटफट कीबोर्डवर बोटं मारली, माऊसलाही अक्षरश: क्लिकक्लिकाट करून हैराण केले. पण, शेवटी काय ‘बुक्ड’चा बुक्काच! तेव्हा, सध्या लसीसाठी प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरे गत्यंतर नाहीच. पण, प्रतीक्षेपेक्षा लसीकरणाच्या या सावळ्यागोंधळाने मुंबईकरांच्या पदरी केवळ आणि केवळ निराशाच पडली आहे. त्यामुळे तीन आठवड्यांत नको, वाटल्यास तीन महिने घ्या; पण लसीकरणाची प्रकिया ऑनलाईन-ऑफलाईन सुरळीतपणे आणि मन:स्तापाशिवाय पार पाडा आणि मगच आपले मुंबईवरील पालकत्व मिरवा!
 
@@AUTHORINFO_V1@@