मनपाच्या गेटवर आंदोलन करणार्‍या ‘कोरोना’बाधिताचा मध्यरात्री मृत्यू

    दिनांक  02-Apr-2021 17:34:36
|

Covid _1  H x W

नाशिक :  ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार्‍या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, तर मध्यरात्रीच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णांची स्थिती हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बाधितांना बेड मिळत नसल्याची तक्रार यापूर्वीही केली जात होती. मात्र, या घटनेमुळे शहरातील विदारक स्थिती सर्वांसमोर आली आहे.
 
 
सिडकोच्या कामटवाडा येथे राहणार्‍या या रुग्णास अनेक हॉस्पिटल्समध्ये फिरल्यानंतरदेखील कुठेही बेड मिळाला नाही. म्हणून दिवसभर फिरून वैतागलेल्या त्यांच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रुग्णाला महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आणले होते. परंतु, या ठिकाणी त्यांना कोणीही प्रवेश दिला नाही. शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे नेमके याच वेळी महानगरपालिकेच्या मुख्यालयातून आपल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली व त्यांनी तातडीने अधिकार्‍यांशी चर्चा करून पुढील पावले उचलली व त्या रुग्णास महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
 
मनपात रुग्ण आणणार्‍या ‘त्या’ व्यक्तीवर गुन्हा दाखल
 
दरम्यान, या घटनेनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात महानगरपालिकेच्यावतीने आपत्ती निवारण कायदा, तसेच साथरोग नियंत्रण कायदा यानुसार कैलास एकनाथ भाबड यांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्याविरुद्ध जीवितास धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.
 
 
नाशिक महापालिकेसमोर ऑक्सिजनच्या सिलेंडरसह आंदोलन करणार्‍या कोरोनाबाधित रुग्णाला बेड किंवा अन्य वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळाली असती, तर कदाचित त्याचे प्राण वाचू शकले असते. परंतु, या संवेदनाहीन राज्य सरकारकडून कसलीच अपेक्षा ठेवता येत नाही.
 
अतुल भातखळकर, आमदार, भाजप


नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणार्‍या कोरोनाबाधिताचा आज मृत्यू झाला. त्यापूर्वी नाशिकच्या दौर्‍यात आयुक्तांची भेट घेऊन बेड्स, ‘व्हेंटिलेटर’ उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिले होते. दौर्‍यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध आणि खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा.

- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.