‘इच्छा’शक्ती तिथे मार्ग!

    दिनांक  11-Jan-2021 22:56:29
|
1121 _1  H x W:

ज्या लोकांना मोह आवरता येत नाही, त्यांच्यात इच्छाशक्तीची पातळी तरी कमी असते किंवा त्यांनी इच्छाशक्तीचा यथोचित वापरच केलेला नसतो. यासाठी इच्छाशक्तीचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करायला पाहिजे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या भावनांचा इच्छाशक्तीशी खूप जवळचा संबंध आहे.
 
 
आपण जेव्हा आपला देहस्वभाव बदलतो, सभोवताली असलेल्या मनाला विचलित करू पाहणार्‍या अनेक गोष्टींपासून आपलं लक्ष योग्य कार्यात केंद्रित करायचा प्रयत्न करतो किंवा खूप कष्टाने वाया जाणार्‍या वेळेचे चोख व्यवस्थापन करतो, तेव्हा आपण आपल्या बौद्धिक क्षमतेचा वा मेंदूच्या कार्यक्षमतेचा एक स्रोत जो या सगळ्या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी वा त्यांना नियंत्रित करण्यासाठी अनिवार्य आहे, त्याचा आपण सतत वापर करत असतो.
 
सततच्या अशा वापराने आपले स्नायू जसे थकतात आणि त्यासाठी त्या स्नायूंना व्यायामाने सक्षम करण्याची गरज असते वा स्नायूंना शिक्षित करणे कधीकधी आवश्यक असते. तसेच मनालाही प्रशिक्षित करण्याची व सार्थ वळण देण्याची जरुरी आहे. सर्वसामान्य समज असा आहे की, स्वतःला मर्यादेपलीकडे व्यक्ती रेटत राहिली तर तिची इच्छाशक्ती वर्धित होते.
 
बर्‍याच लोकांना आजच्या काळात जीवनशैलीविषयक आजार असतात. रक्तदाब, मधुमेह ते अगदी हृदयरोग असतो. लोकांना आपण निरोगी नाही, याची जाणीवही असते. शिवाय त्यांना हे पक्कं माहीत असतं की, तणाव आणि चिंता हेच त्यांचे भीतिदायी शत्रू आहेत. पण, त्यांचा दावा असतो की, त्यांच्याकडे जीवनशैलीत आवश्यक बदल करण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच नाही. आपण आपली दिनचर्या बदलू शकू, ही खात्रीच त्यांच्यापाशी नाही.
 
हे असं का होतं? आपल्या आरोग्यासाठी आवश्यक बदल आपण करायला पाहिजे. ‘निरोगी आयुष्य हे केव्हाही वरदान आहे’ हे व्यक्तीला पक्कं ठाऊक आहे. मग आपण इतकी चालढकल का करतो? आपण व्यायाम वा योग करायला पाहिजे. आपण धुम्रपान थांबवलं पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीचं आपण जर स्वप्न पाहतो आहोत, तर ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण, सगळं कळत असूनसुद्धा वळत मात्र नाही.
 
असं का घडतं? याचं थोडक्यात कारण म्हणजे आपल्याला जे जाणवलं आहे, कळलं आहे, ते अजून मनाला भिडलेलं नाही. कुठलीही गोष्ट मनाला भिडली, तरच व्यक्ती तिची परिपूर्ती करते. ’इच्छाशक्ती’ ही संकल्पना तशी नवीन नाही. तथापि, जितक्या सहजपणे तिचा उल्लेख केला जातो, तितकी ती सहज नाही. सर्वसामान्यपणे इच्छाशक्ती तितकी सामान्यही नाही. आपण अगदी सामान्य आणि दैनंदिन गोष्टींमधून इच्छाशक्तीचा संदर्भ देत असतो.
 
ज्या लोकांना मोह आवरता येत नाही, त्यांच्यात इच्छाशक्तीची पातळी तरी कमी असते किंवा त्यांनी इच्छाशक्तीचा यथोचित वापरच केलेला नसतो. यासाठी इच्छाशक्तीचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करायला पाहिजे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या भावनांचा इच्छाशक्तीशी खूप जवळचा संबंध आहे. ज्या लोकांना असं वाटतं की, आपल्या काही व्यसनजन्य सवयी जसे की, धुम्रपान सोडून देणं त्यांच्यासाठी शक्य नाही.
 
 
ते करण्यासाठी ते दुर्बल आहेत. असे लोक पुन्हा त्या सवयीच्या मागे लागतात. सर्वसाधारणपणे आपण अचाट कार्यक्षमता असलेल्या व्यक्तींच्या जीवनाकडे पाहिले, तर त्यांच्या इच्छाशक्तीला संपन्न करणार्‍या इतर अनेक गोष्टी असतात किंवा त्यांनी त्या स्वतः नियमितपणे विकसित केलेल्या असतात. याचाच विधायक परिणाम म्हणून सामान्य परिस्थितीतसुद्धा त्यांच्या हातून जे घडते, ते केवळ असामान्य आणि दिव्यत्वाची प्रचिती देणारे असते.- डॉ. शुभांगी पारकर 
 
इच्छाशक्तीत एक प्रकारची जबरदस्त कार्यशीलता आहे. आपण स्वतःला इच्छेविरुद्ध रेटण्यापेक्षा आपल्याला जे काही मिळवायचे आहे, त्या गोष्टींवर आणि तत्त्वांवर अधिक विश्वास ठेवायचा. कर्तृत्व माणसाच्या आयुष्यातील एक बहुमोल गोष्ट आहे, यात वादच नाही. पण, त्यासाठी स्वतःला क्षमतेपलीकडे ढकलण्यात दमछाक होण्याचा धोका अधिक आहे. यामुळे होते काय की, आपण आपली थकावट कमी करतो आणि सकारात्मक विश्वासाच्या साहाय्याने पुढे पाऊल टाकण्यासाठी प्रवृत्त होतो. काही जण आपल्या आयुष्य बदलण्यासाठी वा त्यात परिवर्तन करायला तयार असतात आणि काहींची तशी अजिबात तयारी नसते.
 
आपण इच्छाशक्तीचा उपयोग करताना ती वाढत चालली आहे, असा विश्वास ठेवला, तर आपली इच्छाशक्ती नक्कीच सक्षम होत जाईल. आपण तणावाला भिडायची आपली सक्षमता वाढवायला हवी. आपण प्रवाहाविरुद्ध जाताना विलक्षण थकून जात असतो. अशावेळी थोडी विश्रांती घेणं आवश्यक आहे. स्वतःची ऊर्जा या विश्रांतीच्या काळात वाढवणं आवश्यक आहे. याचा थोडक्यात बोलका कयास असा होतो की, तुमच्या इच्छाशक्तीची ताकद ही तुमचा विश्वास कशात आहे, तिच्या संवर्धन होण्यात की, तिचा निचरा, यावर अवलंबून आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.