अपघात झाल्यास राज्याचं स्टेअरिंग हातात घेऊ : रावसाहेब दानवे

    दिनांक  31-Jul-2020 18:27:02
|

ajit pawar_1  Hऔरंगाबाद :
मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टिअरिंग कुणाच्या हातात यावरून राज्यकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला तर उपमुख्यमंत्री यांनी फोटो शेअर करत स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचे दाखवून दिले. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तीन पक्षाच्या हातात तीन स्टेअरिंग आहेत. त्यामुळे त्यांची गाडी कुठपर्यंत चालेल माहीत नाही असे विधान केले.


जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सभेला संबोधित करताना त्यांनीही टोलेबाजी केली.ते म्हणतात, "तीन पक्षाच्या हातात तीन स्टेअरिंग आहेत. त्यामुळे त्यांची गाडी कुठपर्यंत चालेल माहीत नाही. राज्याच्या हितासाठी स्टेअरिंग नेहमी एकाच्याच हातात असावे.दोघांच्या हातात स्टेअरिंग असल्याने ही गाडी झाडावर आदळणार आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे लायसन्स नाही की इन्शुरन्स सुद्धा नाही, अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर विनोदी फटकारे मारले आहे. स्टेअरिंग आमच्या हातात असावे अशी काही आमची अपेक्षा नाही. त्यांनी राज्याच्या हितासाठी काम करावं. राज्याचं भलं करावं. पण आपसातील वादामुळे स्टेअरिंगवरचा हात निसटला आणि अपघात झाला तर मात्र स्टेअरिंग आम्ही हातात घेऊ. आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ आणि स्वबळावर लढून सत्ता आणू असे दानवे म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही दानवे यांनी सांगितले. सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवाव्यात आणि आपआपली ताकद दाखवावी, असे पाटील म्हणाले होते. विधानसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुका लढवल्या आणि निवडून आले. ज्यांच्यासोबत निवडणुका लढवल्या त्यांच्यासोबत न जाता दगाफटका करून दुसऱ्यांशी संगनमत करण्यात आले त्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलले पण त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, असे म्हणत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.