'राम मंदिराच्या पायाभरणीसाठी सध्याचं वातावरण मंगलमय नाही'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |


mushrif _1  H x




मुंबई :
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपुजनाचा मुहूर्त ठरला असून येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मात्र या सोहळ्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उभं केला जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विधानाचे समर्थन करत आता राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्याचे वातावरण मंगलमय नसल्याचे म्हटले आहे.



"राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तो सर्वांनी मान्य केला आहे. पण सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने परिस्थिती खराब झालेली आहे. वातावरण मंगलमय नाही, आपण एखादे देऊळ बांधतो तेव्हा वातावरण प्रसन्न पाहिजे. मात्र, आज ती परिस्थिती नाही, पवारांनाही तेच म्हणायचे होते," असे म्हणत मुश्रीफ यांनी शरद पवारांचे समर्थन केले. तसेच, राममंदिर हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याला विरोध नाही, फक्त कोणत्या परिस्थितीत कोणते कार्य केले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. शंकराचार्यांच्या विधानाचा हवाला देत त्यांनी राम मंदिराचा मुहूर्त शुभ नसल्याचेही म्हंटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीचे नेते मजीद मेनन म्हणतात यांनी ट्विट करत “उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित आहेत. ते आपल्या वैयक्तिक क्षमतेत कोविड१९ संबंधी निर्बंधांचे पालन करुन सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. मात्र धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या प्रमुखांनी विशिष्ट धार्मिक कार्यांना चालना देणे टाळावे” असे म्हंटले होते.



दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी १२.१५ च्या मुहूर्तावर पूजा करून मंदिर बांधणीसाठी पायाभरणी करतील. या सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी करण्यात येत असून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल अंतर व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन यावेळी करण्यात येईल. हा सोहळ्याचे  थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@