यंदा मुंबई तुंबणार ? दीडशे कोटींची नालेसफाई कंत्राटदारांनी भरली गाळाने

    दिनांक  06-Jun-2020 16:59:20
|

mumbai _1  H x


मुंबई :
नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला असला, तरी पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली. नाले गाळाने तुडुंब भरल्याचे दिसून आले असून कंत्राटदाराने काढलेला गाळ गेला कुठे, असा प्रश्न विरोधक करू लागले आहेत. या कामासाठी १५०कोटी रुपये पालिकेने खर्च केले आहेत. मात्र नाल्यातून काढलेला ३ लाख ६२हजार मेट्रिक टन गाळ कुठे टाकला, याचा मात्र अधिकाऱ्यांनाच पत्ता नाही.
मुंबईतील नालेसफाईच्या कामांना एप्रिलमध्ये सुरुवात होणे आवश्यक होते. परंतु मार्च महिन्यातच जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनामुळे मुंबई लॉकडाऊन झाले आणि नालेसफाई रखडली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याऐवजी शेवटच्या आठवड्यात नाले सफाईच्या कांमाना परवानगी देण्यात आली. मात्र परप्रांतातील मजूर गावी गेल्याने अपुरे मजूर घेऊन कंत्राटदारांनी नालेसफाईची कामे सुरू केली. पालिकेचे जे अभियंते या कामाकडे लक्ष ठेवतात त्यांना मजूर आणि बेघरांना जेवणाची पाकिटे वाटण्यासाठी नेमले होते. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर देखरेख कोणाचीही नव्हती. कंत्राटदारांना मोकळे रान होते. त्यांनी गाळ काढल्याचा देखावा केला. जेव्हा आयुक्त आणि अधिकारी पाहणी दौऱ्यावर आले तेव्हा मोठ्या नाल्यात जेसीबी उतरवले. गाळ काढून काठावरच ठेवला. कंत्राटदारांनी केलेल्या या कामाचा निकाल पहिल्याच पावसाने दाखवून दिला.पहिल्याच पावसात नाले गाळाने भरून वाहू लागले. मान्सूनपूर्व पावसात रस्त्यात पाणी साचल्याने वाहनांचे मार्ग बदलावे लागले. शनिवारी पहाटे बरसलेल्या पावसाने तर छोटे नालेही तुडुंब होऊन इमारत परिसरात पाणी शिरल्याने अनेकांची धावपळ उडाली. त्यामुळे नालेसफाईच्या कामांचा फार्स उघड झाल्याची टीका होऊ लागली आहे. नालेसफाई पूर्णचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष २५ टक्के नालेसफाई झाल्याची टीका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. आता मुंबईतील नालेसफाईबाबतच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. नालेसफाईच्या कामांकडे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाल्याने यंदा मुंबईत पुर परिस्थिती उद्भवण्याचा धोका आहे.


यंदा मुंबई तुंबणार


प्रशासन नालेसफाई झाल्याचा कितीही दावा करीत असले, तरी नालेसफाई झालेलीच नाही. दरवर्षी अधिकारी लक्ष ठेवून असले तरी कंत्राटदार त्यांना पत्ता लागू देत नाहीत. यंदा तर कोणाचा कोणाशी मेळ नाही. अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने नालेसफाई झालेलीच नाही. कंत्राटदारांनी त्यांचे काम साधले. त्यामुळे यंदा मुंबई तुंबणार आहे आणि जनतेचे हाल होणार आहेत.

-प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.