शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव; शिवसेना भवन सील!

    दिनांक  23-Jun-2020 17:34:01
|

Shivsena Bhavan_1 &nज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण


मुंबई : एका ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्याने निर्जंतुकीकरणासाठी शिवसेना भवन काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवस बंद राहणार आहेत.


हा ज्येष्ठ कार्यकर्ता शिवसेना भवनात नियमित येणाऱ्यापैकी आहे. शिवाय शिवसेना खासदाराचा निकटवर्तीय असल्याचेही सांगण्यात येते. शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर सोमवारपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही दिवस शिवसेना भवनात न येण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


चार दिवसांपूर्वीच (१९ जून) शिवसेना भवनात पक्षाचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारीही उपस्थित होते.


सामाजिक कार्य करताना अनेक नगरसेवकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता थेट शिवसेना भवनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने तेथे काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


दरम्यान, करोनाशी लढणाऱ्याना शिवसेना कार्यकर्ते मदत करत असतात. त्यावेळी अनेकांशी संपर्कात येतो. त्यातूनच त्या कार्यकर्त्याला करोनाची लागण झाली असावी. त्यामुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येत आहे, अस शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.