दहशतवादाविरुद्ध हिंदू सारा एक

    दिनांक  14-Jun-2020 18:39:32
|
agralekh_1  H x


हिंदू आहे, या एकाच अपराधावरुन अजय पंडिता यांची हत्या जिहादी धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांनी केली, तशा एक नाही, हजार नाही, लाख नाही, कोट्यवधी हिंदूंच्या हत्या सातत्याने होत आल्या. बाराव्या शतकापासून गेल्या ८०० वर्षांत काश्मीरची भूमी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली आणि अजूनही तिथल्या हिंदूंचा नरसंहार सुरुच आहे.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवार, दि. ८ जून रोजी अजय पंडिता या हिंदू सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. अजय पंडिता यांची हत्या झाल्यानंतर काश्मिरी पंडित, काश्मिरी पंडितांच्या संस्था-संघटना, हिंदुत्ववादी संस्था-संघटना आणि कार्यकर्त्यांनी निषेध-विरोध केला. मात्र, अजय पंडिता ज्या काँग्रेस पक्षाचे सदस्य होते, त्या पक्षाच्या एकाही वरिष्ठ नेत्याने आपल्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याबद्दल चकार शब्द काढला नाही. राहुल गांधी, प्रियांका गांधी, पी. चिदंबरम, कपिल सिब्बल यांना अस्तित्वात नसलेल्या मुद्द्यांवरुन बडबडायला वेळ मिळतो पण स्वतःच्याच सरपंचाच्या हत्येबद्दल बोलायला सवड नसते. त्याचे कारण सरपंच काँग्रेसचा सदस्य असला तरी आधी तो हिंदू होता आणि हिंदूंवर कितीही अन्याय-अत्याचार झाले तरी काँग्रेसला त्याची फिकीर नसते. कारण, त्या पक्षाच्या मते हिंदूच दहशतवादी असतात, त्यामुळे जिहादी धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांनी हिंदुंची हत्या केली तरी काँग्रेसला त्यात काही गैर वाटत नाही.


तीच गत स्वतःला उदारमतवादी, मानवतावादी म्हणवून घेणार्‍या वामपंथी बुद्धिजीवी, विचारवंत आणि धर्मनिरपेक्षवाद्यांची. काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ निष्प्रभ केल्यानंतर तिथल्या इंटरनेट बंदीविरोधात अवघे जग डोक्यावर घेणार्‍या या ढोंगबाजांकडून एका व्यक्तीचा जीव गेला तरी त्याच्या विरोधासाठी-निषेधासाठी एखादी ओळ लिहिली/बोलली गेली नाही. अर्थात, दांभिकांच्या टोळक्यांकडून आपण तशी अपेक्षाही करता कामा नये. कारण, भोंदूगिरी करणे, हाच तर त्यांचा मुख्य धंदा आहे. मात्र, अशा परिस्थितीत हिंदूंनीच काश्मिरी पंडित असो वा अन्य कोणाही हिंदूंची धर्माच्या आधारे हत्या होत असेल, छळ केला जात असेल, त्रास दिला जात असेल तर त्याविरोधात पक्षनिरपेक्ष भूमिका घेऊन ‘मला काय त्याचे’ ही मानसिकता सोडून आपला आवाज बुलंद केला पाहिजे. कारण, त्या त्या पक्ष-संघटनेच्या स्वतःच्या काही भूमिका, धोरणे असतात आणि त्या चौकटीत जर एखाद्या हिंदूच्या हत्येचा मुद्दा बसत असेल तर तो ते उचलू शकतात; अन्यथा नाही. पण एक हिंदू आणि कोट्यवधी हिंदू स्वतः लोकशाहीने, संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या हत्याराच्या आधारे आपला विरोध नोंदवू शकतात. अशीच निदर्शने आता सुरु करण्यात आली असून ती केवळ भारतापुरती मर्यादित राहणार नसून संपूर्ण जगभरात होत आहेत.


भाजप नेते व दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी अजय पंडिता यांच्या हत्येनंतर सर्व हिंदुंनी दहशतवाद्यांविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले होते. आपले घर अथवा अंगणात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पूर्ण पालन करुन प्लाकार्ड, बॅनरच्या साहाय्याने रविवारी (दि. १४ जून) निदर्शने करा, असे ते म्हणाले होते आणि आता आपल्याला त्याचा प्रभावही पाहायला मिळत आहे. #HinduUnitedAgainstTerror या हॅशटॅगखाली हिंदूंवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात ही मोहिम ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, थायलंड, न्यूझीलंड, भारत, आफ्रिका, ब्रिटन, युरोप आणि अमेरिका व कॅनडापर्यंत पोहोचली. ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ आणि ‘जेके नाऊ’ यांच्यासह भारतातील व जगभरातील अनिवासी भारतीयांच्या अनेक संस्था संघटनांनी यात भाग घेतला आणि #HinduUnitedAgainstTerror हा हॅशटॅग ट्विटरवर रविवारी दिवसभर अव्वल क्रमांकावर राहिला. तसेच फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांद्वारेही हिंदूंनी एकजुटीने आपले म्हणणे सर्वांसमोर मांडले आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या होणे ही नवी घटना अजिबात नाही. हिंदू आहे, या एकाच अपराधावरुन जशी अजय पंडिता यांची हत्या जिहादी धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांनी केली, तशा एक नाही, हजार नाही, लाख नाही, कोट्यवधी हिंदूंच्या हत्या सातत्याने होत आल्या. बाराव्या शतकापासून गेल्या ८०० वर्षांत कश्मीरची भूमी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली आणि अजूनही तिथल्या हिंदूंचा नरसंहार सुरुच आहे. त्याचे मूळ कोणी कितीही नाकारायचा, दडवण्याचा, अमान्य करण्याचा प्रयत्न केला तरी धर्मांध-धर्मवेडा इस्लाम हेच आहे. मुस्लिमांची बहुसंख्या असलेल्या काश्मिरात एकही हिंदू राहू नये, अशी त्यांची इच्छा असते आणि आता अजय पंडिता यांच्या हत्येनंतर वाहवाहीच्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळेल. ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर दहशतवादी व त्यांचे पाठीराख्यांच्या मनात भारताविरोधात प्रचंड रोष आहे आणि तो अशाप्रकारे बाहेर पडत असतो. एखाद्या हिंदूने सरपंच व्हावे हे त्यांना आवडत नाही, तसेच तो पुढे चालून आमदार-खासदार झाला तर आपल्या वर्चस्वाला धक्का लागेल, ही भीतीही अशांना सतावत असते. हिंदू व्यक्ती सर्वसामान्य जनतेला आपल्यापासून तोडेल, स्वतःच्या विचाराची त्यांच्यात रुजवात करेल आणि त्यानंतर आपल्याला विरोधाचा सामना करावा लागेल, असे त्यांना वाटते. त्यामुळे तसे होण्याच्या आधीच संबंधितांना संपवण्याचा मार्ग त्यांच्याकडून अवलंबला जातो.

जम्मू-काश्मीरमध्ये नुकताच डोमिसाईल सर्टिफिकेट (प्रोसिजर) रुल्स, २०२० मध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार १९८९ नंतर खोर्‍यातून विस्थापित झालेल्या सर्वच हिंदू पंडितांना स्थायी निवास प्रमाणपत्र मिळणे शक्य झाले. त्यामुळेही दहशतवादी व धर्मांध प्रवृत्ती बिथरल्या आहेत. म्हणूनच मुस्लिम बहुल भागातील मुस्लिमांच्याच हितासाठी संविधानिक पद्धतीने काम करणार्‍या हिंदू सरपंचाचा जीव घेण्याचे कृत्य त्यांनी केले. अल्पसंख्याक हिंदूंना अशा हल्ल्यांपासून वाचायचे असेल तर जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक डॉ. शीशपाल वैद यांनी शस्त्रास्त्र पुरवठा करण्याबरोबरच प्रशिक्षण देण्याचीही मागणी केली. जेणेकरुन जिहादी हल्लेखोरांपासून ते आपले संरक्षण करु शकतील. पोलीस महासंचालक पदावर राहिलेली व्यक्ती जर अशी मागणी करत असेल तर काश्मीर खोर्‍यातली स्थिती कशी असेल, याचा अंदाज लावता येतो. आता या मागणीवर काय निर्णय घ्यायचा, हे शेवटी प्रशासनच ठरवेल, पण तिथल्या हिंदूंना प्रशासनाने वार्‍यावर सोडून चालणार नाही. त्यांना सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे आणि #HinduUnitedAgainstTerror ही मोहीम त्याचाच एक भाग आहे. दुसरा मुद्दा काश्मिरी पंडित किंवा हिंदूंच्या राजकीय सबलीकरणाचा आहे. भारतीय संसदेत अँग्लो इंडियन सदस्यांप्रमाणे काश्मिरी पंडितांमधूनही सदस्य निवड व्हावी, अशी मागणी केली जाते. काश्मिरी हिंदूंचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहात ऐकू जाण्यासाठी हे आवश्यक असल्याचे कारण त्यामागे सांगण्यात येते. केंद्रात काश्मिरी हिंदूंच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणार्‍या भाजपचे सरकार सत्तेवर असल्याने या मागण्या लवकर मान्य होतील, अशी आशा करायला हरकत नाही. पण तोपर्यंत सर्वत्रच्या हिंदूंनी आंदोलन, निदर्शनांच्या माध्यमातून एकजूट दाखवणे गरजेचे आहे आणि तेच काम आताच्या #HinduUnitedAgainstTerror अभियानातून होत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.