कोरोना इफेक्ट : टाटासमूहातही होणार पगार कपात!

    दिनांक  25-May-2020 12:01:27
|

TCS_1  H x W: 0वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात २०% कपात


मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशातील अनेक उद्योग डबघाईला आले आहेत. अनेक मोठ्या कपन्यांनी कर्मचारी कपात आणि पगार कपात यासारखे मार्ग अवलंबले आहेत. यातच आता देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक ‘टाटा समूह’ देखील आपल्या अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करणार आहे. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टाटा समूहाने इतिहासात प्रथमच टाटा सन्सचे चेअरमन आणि सहायक कंपनीचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वेतनात जवळजवळ २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबर व्यवहारात स्पष्टता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हंटले आहे.


टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेसने सर्वात प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा केली. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल तसेच वोल्टास या सर्व कंपन्यांचे सीईओ आणि एमडी देखील कमी पगार घेणार आहेत. चालू आर्थिक वर्षात या कंपन्यांच्या बोनसमध्ये देखील कपात केली जाणार असल्याचेदेखील सांगितले जात आहे.


या आधी देशातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा आणि सीईओ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. पण टाटाने आतापर्यंत कर्मचारी कपात केलेली नाही. याआधी झोमॅटो, स्विगी, शेअरचॅट आदी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून सर्व उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.