लखनौ करार - टिळकांचा धाडसी प्रयोग

    दिनांक  23-May-2020 21:32:12
|

lucknow agreement_1 


युद्ध करताना हरप्रकारे शत्रूची संख्या कमी करायची असते, ती वाढवून आपला फायदा नसतो. शत्रू वाढला तर आपले नुकसानच होते, हे टिळकांनी पुरेपूर हेरलेले दिसते. मुस्लिमांना आणि मुस्लीम लीगला काँग्रेसच्या विरोधात जाऊन ब्रिटिशांच्या बाजूने उभे करण्यापेक्षा त्यांना आपणच सवलती देण्याचा पर्याय टिळकांना निवडावा वाटला, कारण इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी पुकारलेल्या युद्धात त्यांना शत्रूची संख्या वाढवायची नव्हती. टिळकांचा झगडा ब्रिटिश साम्राज्यशाहीशी होता, ब्रिटिशांमुळे आपल्यावर आलेल्या पारतंत्र्याशी होता, मुसलमानांशी नाही. हे समजून घेतले तर सारेच सोपे होईल.


‘हिंदू-मुसलमान संबंध आणि संघर्ष’ हा विषय भारतीय राजकारणात आज जितका महत्त्वाचा आहे, तेवढाच तो शंभर वर्षांपूर्वीही होता. हिंदू-मुसलमान युतीचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक उदाहरण म्हणजे ‘लखनौ करार.’ आपापसातल्या भांडणावर मात करून हिंदू-मुसलमान एकत्र आले ते लखनौ इथे झालेल्या राष्ट्रीय सभेत, लोकमान्य टिळकांच्या विशेष पुढाकाराने! ‘टिळकांनी लोकसंख्येपेक्षा टक्केवारीने जास्तीच्या जागा मुसलमानांना दिल्या ही टिळकांची चूक आहे,’ म्हणून अनेकजण आजही टिळकांना दोष देत असतात. तेव्हा ‘लखनौ करार’ हे नेमके काय प्रकरण आहे, ते समजून घेऊया.

‘लखनौ करार’ हा १९१६ सालचा. त्यापेक्षाही थोडसं मागे गेलो तर लक्षात येईल की, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आद्य हुंकारात म्हणजेच १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू-मुसलमान एकत्रित लढले. परिणामी, शत्रू सावध झाला. तेव्हापासून ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीला अनुसरून हिंदू-मुसलमानांत भांडणे कशी भडकत राहतील याची पुरेपूर काळजी गोर्‍यांनी घेतली. १८५७ नंतर वातावरण थंडच होते. अशातच डेक्कन सोसायटी सोडून टिळक संपूर्णपणे राजकारण करू लागले, तोपर्यंत १८९० साल उजाडले. लोकमान्य राजकारणात येण्यापूर्वी सनदशीर राजकारण करणारी राष्ट्रीय पातळीवरील संस्था म्हणून टिळकांना ‘काँग्रेस’ महत्त्वाची वाटत होती, टिळकांचा खाक्या जहाल असला तरीही! लोकमान्यांच्या कारकिर्दीतील त्यांचा मवाळ पक्षाशी असलेला संघर्ष हे फार महत्त्वाचे प्रकरण आहे. ‘जहाल राजकारणी’ म्हणून लोकमताचा भरपूर पाठिंबा असूनही टिळकांना काँग्रेसवर वर्चस्व प्रस्थापित करायला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. या संघर्षाच्या विविध टप्प्यांत टिळकांनी वेळोवेळी समेटाची भूमिका घेऊन एकी साधण्याचा प्रयत्न केला, मतभेद फारचं टोकाला गेले आणि सुरत काँग्रेसमध्ये बखेडा झाला. पण, तरीही टिळकांनी काँग्रेस सोडून वेगळा पक्ष काढण्याची भाषा कधीही केली नाही, हे नमूद करतो.


टिळक मंडालेहून सुटले, पुण्यात आले. त्या पहिल्याच दिवशी सुमारे पंधरा हजार लोक त्यांचे दर्शन घेऊन गेले. ही गर्दी पुढचा आठवडाभर सरली नव्हती. लोकमान्यांना नुसते बघणे हे त्याकाळच्या अनेक तरुणांचे आकर्षण होते. टिळकांच्या विचाराने भारलेले वातावरण एकट्या महाराष्ट्रात नव्हे, देशभर होते. परिणामी, टिळकांना मांडलेत ठेवल्याने त्यांची लोकप्रियता कमी होईल, हे इंग्रजांचे मनसुबे मातीमोल झाले. मंडालेला जाण्यापूर्वी टिळकांच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे सुरतेचे अधिवेशन मोडले होते. मंडालेहून सुटल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने ब्रिटिशांवर हल्लाबोल करायचा असेल तर काँग्रेसमध्ये जाऊनच प्रयत्न करावे लागतील, या हेतूने टिळकांनी मोर्चेबांधणी सुरु केली. मवाळ पक्षाच्या वतीने विरोध कायम होता. गोखल्यांनी तर टिळकांना स्पष्ट सांगून टाकले होते, “तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका!”

या सगळ्या विरोधाला न जुमानता ब्रिटिश साम्राज्याला शह देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन काम करावे, म्हणून टिळकांनी व्यूह आखायला सुरुवात केली. मवाळ, जहाल, आणि मुस्लीम हे तिन्ही एकत्र आले, तर खर्‍या अर्थाने ब्रिटिशविरोधी लढाईत आपले पारडे जड होईल आणि इंग्रजांना आपण जेरीस आणू शकू, या अनुषंगाने टिळकांनी मवाळांचे समाधान करण्यासाठी त्यांचे क्रिड मान्य केले. तसेच मुसलमानांना जास्तीच्या जागा देऊन त्यांचीही मते काँग्रेसच्या बाजूने वळवली. युद्ध करताना हरप्रकारे शत्रूची संख्या कमी करायची असते, ती वाढवून आपला फायदा नसतो, शत्रू वाढला तर आपले नुकसानच होते, हे टिळकांनी पुरेपूर हेरलेले दिसते. मुस्लिमांना आणि मुस्लीम लीगला काँग्रेसच्या विरोधात जाऊन ब्रिटिशांच्या बाजूने उभे करण्यापेक्षा त्यांना आपणच सवलती देण्याचा पर्याय टिळकांना निवडावासा वाटला. कारण, इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी पुकारलेल्या युद्धात त्यांना शत्रूची संख्या वाढवायची नव्हती. टिळक ‘लखनौ करार’ न करते तर एरवी ब्रिटिशांनी मुसलमानांना मतदारसंघ दिलेच असते, मागे नामदार गोखले यांची इच्छा नसतानासुद्धा मुस्लीम लीगने इंग्रजांवर टाकलेल्या दबावामुळे मुस्लिमांना जागा द्याव्याचं लागल्या होत्या.


ब्रिटिश नोकरशाहीला शह देण्यासाठी कायदे कौन्सिलमध्ये आपल्या पक्षाचे मताधिक्य असणे महत्त्वाचे होते. हे मताधिक्य मिळवण्यासाठी मवाळ पक्ष, जहाल पक्ष आणि मुस्लीम लीग या तिन्ही पक्षांची एकत्रित युती ही अत्यंत महत्त्वाची ठरणार होती. यांच्या एकत्रिकरणामुळे लोकशक्ती वाढणार होतीच, पण कायदे कौन्सिलात तिन्ही पक्षांचे एकमत होणार होते आणि हे एकमत ब्रिटिशांची डोकेदुखी वाढवणारे ठरले असते. परदेशी वर्तमानपत्रे सातत्याने मुस्लिमांना काँग्रेसपासून दूर राहण्याचा सल्ला देत होती, स्वराज्याच्या लढाईत मुसलमान दुरावले असते, त्यांच्या भारताबाहेरील निष्ठा अधिक प्रबळ झाल्या असत्या, परिणामी काँग्रेससमोर मुस्लीम लीग आणि ब्रिटिश साम्राज्य अशी दोन आव्हाने उभी ठाकली असती. असे करण्यापेक्षा मुस्लीम निष्ठांचा उपयोग स्वातंत्र्यलढ्याच्या राजकारणात करून घेण्याचा बेत टिळकांनी आखला, जी त्यांची तत्कालीन राजकीय गरज होती. ज्या महंमद अली जिनांशी त्यांनी हा करार केला, त्यांची मते आधी इतकी कट्टर नव्हती, हेही नोंदवावेसे वाटते. मुसलमानांचा पक्ष फुटून वेगळा झाला असता, तर कायदे कौन्सिलमध्ये टिळकांच्या पक्षाची म्हणजेच काँग्रेसची बाजू तोकडी पडली असती, आणि आयता विरोधक निर्माण झाला असता, त्या विरोधकांची भलावण ब्रिटिशांनी काळजीपूर्वक केली असती, परिणामी नोकरशाहीशी असलेला ब्रिटिशांशी असलेला टिळकांचा संग्राम कुठेतरी मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली असती. असे करण्यापेक्षा थोड्याफार जागा मुसलमानांना जास्त देऊन त्यांना आपल्या मताचे करून घेणे, टिळकांना हिताचे वाटले यात फारसे नवल नाही. टिळकांचा झगडा ब्रिटिश साम्राज्यशाहीशी होता, ब्रिटिशांमुळे आपल्यावर आलेल्या पारतंत्र्याशी होता, मुसलमानांशी नाही, हे समजून घेतले तर सारेच सोपे होईल.


गणेशोत्सवात टिळकांनी घेतलेली भूमिका वरवर जरी मुस्लीमविरोधी वाटत असली, तरी ती खरी इंग्रज विरोधी आहे. राज्यकर्ते म्हणून तुम्ही मुसलमानांचा हुल्लडपणा खपवून घेता आणि हिंदूंवर निर्बंध घालता, यावर टिळकांचा आक्षेप होता. तो दाखवून त्यांनी इंग्रजांच्या न्यायाचे वाभाडे काढले होते. दुसर्‍या बाजूला त्यांच्या या भूमिकेमुळे आपोआप मुसलमानांना सुद्धा समज दिली गेली होती की, ‘शांतपणे इथे राहणार असलात तर तुमच्याशी जुळवून घेऊ, जास्तीची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, प्रसंग आलाच तर ‘आरे ला कारे’ म्हणूनच उत्तर दिले जाईल. आम्ही स्वतः वार करणार नाही, मात्र समोरून वार झाला, तर आम्ही प्रतीवर करणारच!’ आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ‘घी देखा मगर बडगा नही देखा!’ हीच जराशी बदलली तर आता तर आता थोडेसे ‘घी’ दाखवून मुसलमानांना जवळ करायची वेळ होती आणि ’बडगा’ मात्र ब्रिटिशांना दाखवायचा, सरकारची कोंडी करायची, अशी टिळकांची राजकीय व्यूहरचना होती.


या सगळ्या प्रकरणात लोकमान्यांचे सगळ्यात जवळच्या दोन सहकार्‍यांच्या प्रतिक्रिया फार महत्त्वाच्या आहेत. न. चि. केळकर आणि खाडिलकर या दोघांचे फारसे पटत नसे. मात्र, मुस्लीम लीगशी टिळकांनी केलेल्या कराराबद्दल या दोघांचे एकमत झालेले दिसते. खाडिलकरांच्या म्हणण्याचा सारांश असा- ‘’टिळकांच्या कारकिर्दीत मुसलमानांचे कल्याण इंग्रजांच्या हातून जास्त होणार असल्यामुळे मुसलमानांनी हिंदूंचे ऐकू नये, त्यांना सहकार्य करू नये, असे अँग्लो-इंडियन वर्तमानपत्रांकडून मुसलमानांना सांगण्यात येत असे. प्रारंभी या भुरळीला मुसलमान बळी पडले. पण, टिळकांचे सोज्ज्वळ चरित्र १९०६-०७ सालच्या स्वदेशी चळवळीपासून जसजसे मुसलमानांच्या अवलोकनात अधिकाधिक येऊ लागले, तशी टिळकांबद्दलची मुसलमानांची बुद्धी पालटत चालली आणि मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर टिळकांविषयी मुसलमानांच्या मनात पूर्ण पूज्यभाव उत्पन्न झाला. हिंदू व मुसलमान या दोघांनी मिळून एकोप्याने हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानचे स्वराज्य कमावले पाहिजे आणि हिंदुस्थानला पूर्वीच्या वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवले पाहिजे, असा टिळकांचा उपदेश १९१४सालापासून मुसलमानांच्या समाजाला पटू लागला आणि लखनौ काँग्रेसच्यावेळी मुस्लीम लीग व काँग्रेस यांचा मिलाफ करून सोडण्यास टिळकांचे उद्योग कारणीभूत झाले. लखनौ येथे टिळकांनी हिंदू-मुसलमानांची पूर्ण एकी करून दिली. त्यानंतर मुसलमानांच्या पुढार्‍यांचा विश्वास टिळक यांच्यावर पूर्णपणे बसला.”


दुसर्‍या बाजूला केळकर म्हणतात ’‘...पूर्वीचे स्वराज्यविषयक मर्यादित लिहिणे व लखनौ काँग्रेस येथे मुस्लीम लीग यांनी एकमताने बनवलेली स्वराज्याची घटना मंजूर झाल्यावरचे लिहिणे, या दोघांमध्ये त्यावेळी मनाचा मनालाच मोठा फरक वाटला. पूर्वी मनात ध्येय तेच असता कोणास स्पष्ट बोलता येत नसे. प्रकाशाचा किरण सूर्यावरून सुटला आहे, पण आकाश मेघाच्छादित असल्यामुळे उजेड पडत नाही, अशी पूर्वीची स्थिती होती. पण, सगळे ढग वार्‍याने उगाळून लावावे व आकाश मोकळे होऊन जिकडेतिकडे प्रकाशच प्रकाश पसरावा तशी आताची स्थिती वाटू लागली.”


या आधी हिंदू-मुसलमान प्रश्नात हिंदूंनी नेहमीच समोपचाराची भूमिका घेतली होती, आजही समझोत्याची भूमिका हिंदूच घेत होते. आता हिंदू समझोत्यासाठी हात पुढे करत आहेत, मुसलमानांनी सोबत यावे. आता आम्ही पडती बाजू घेत आहोत, भविष्यात तुमच्यावरही अशी वेळ येणार नाही, असे कुणी सांगावे? पुढे भांडणाचा प्रसंग आला, तर सध्या हिंदू करत असलेल्या तडजोडीचे दाखले देऊन मुस्लीम लीगला समज देण्यासाठीही टिळकांनी वाद घातला असता. संधीसाठी हात पुढे करून मोठेपणा टिळकांनी दाखवला आणि एकप्रकारे दबाव टाकला असेही म्हणायला हरकत नाही. मुसलमानांबद्दल टिळकांना फार कळवला होता, म्हणून त्यांनी मुसलमानांना जास्तीच्या जागा दिल्या असे नाही, त्यांना जास्तीच्या जागा देऊन ब्रिटिशांना झोडपणे ही टिळकांची राजकीय गरज होती. राजकारणात अशा तडजोडी कराव्या लागतातच.


टिळकांच्या या राजकीय खेळीला आचार्य जावडेकरांनी ‘राष्ट्रीय आपधद्धर्म’ म्हटले आहे. टिळकांच्या भाषणातले “स्वराज्याचे अधिकार फक्त मुसलमानांना दिले तरी मला हरकत नाही,” हे वाक्य दाखवून गहजब माजवला जातो. मात्र ते नेमके वाक्य जावडेकरांनी दिलेले आहे, ते असे- “केवळ मुसलमानांना स्वराज्याचे हक्क दिले तरी आम्हास त्याचे काही वाटणार नाही..राजपुतांना दिले तरी मला काही वाटणार नाही, ते हक्क वापरण्यास हिंदूंमधील सुशिक्षितांपेक्षा हिंदूंमधील मागासलेले वर्ग अधिक लायक आहेत म्हणून त्यांना दिले तरीही मला त्याचे काही वाटणार नाही. हिंदुस्थानातील कोणत्याही एका वर्गाला ते दिले, तर तो लढा तो वर्ग आणि इतर समाज यांच्यातला असेल, अंतर्गत असेल. आजचे तिरंगी सामन्याचे स्वरूप नष्ट होईल.” एखादा मुरब्बी राजकारणीच अशी वक्तव्ये करू शकतो.


टिळकांचा नेम कसा लागला याचा अंदाज निवडक इंग्रज अधिकार्‍यांच्या प्रतिक्रियेवरून येतो, हिंदू मुसलमानांची एकी झालेली पाहून लॉर्ड सिडनहम यांनी लगेचच सरकारला इशारा दिला, “हिंदुस्थानात धोका आहे, सांभाळा!” मोंटेग्यू यानेही आपल्या रोजनिशीत टिळकांच्या या राजकीय खेळीचे कौतुक करून इंग्रजांना कोंडीत कसे पकडले, याबद्दल लिहिल्याचे दिसेल. एकूणच काय, राजकारणात अशा खेळी कराव्या लागतात, पुढेमागे आपली मते बदलावी लागतात. राजाला शह देण्यासाठी एकेक पाऊल पुढे टाकावे लागते, वाटचालीत काही ठिकाणी तह करावे लागतात. लखनौला टिळकांनी केलेला तह त्यांची राजकीय गरज म्हणून महत्त्वाचा ठरला. १९२०नंतर राजकारणाने कूस बदलली, नेतृत्व बदलले, त्याचे परिणामही नंतर निराळे झाले. पण, १९१६ ते १९२० या काळात टिळक हयात असेपर्यंत हिंदू-मुसलमान या दोहोंचे नेते म्हणून नेतृत्व टिळकांकडेच आले. चळवळीच्या सगळ्या नाड्या टिळकांनी मोठ्या बुद्धीचातुर्याने आपल्या हातात ठेवल्या आणि हिंदू-मुसलमानांची राजकीय एकजूट दाखवून स्वराज्याचा रस्ता आणखी मोठा केला. ‘लखनौ करार’ हा सर्वार्थाने टिळकांचा धाडसी प्रयोग ठरला.

- पार्थ बावस्कर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.