नव्या रोगात जुन्याच साथीचा प्रादुर्भाव

    दिनांक  02-Apr-2020 21:52:40
|


agralekh_1  H x

  

भारतात कोरोना आल्यानंतर जे काही घडते आहे, ते पाहता इथल्या विशिष्ट कळपांना त्याचे गांभीर्य जाणवत असल्याचे दिसत नाही. अजूनही या टोळ्यांकडून तबलिगी जमातसारख्यांचा बचाव सुरू असून त्यांना त्याच त्या जुन्यापुराण्या सेक्युलर साथीचा प्रसार करायचा आहे.जगाप्रमाणेच भारतावरही कोरोनाचे संकट येऊन आदळले. लोक काळजी घेऊ लागले. शासन-प्रशासन कामाला लागले. भारतात कोरोनाचा प्रभाव वाढू नये म्हणून ‘लॉकडाऊन’ची व्यवस्थाही करण्यात आली. भारताने ज्या प्रकारे कोरोनाविरोधात युद्ध छेडले आणि बाधितांचा आकडा नियंत्रणात ठेवला, त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेलाही घ्यावी लागली. कोरोनाच्या भयगंडाने पछाडलेल्या अतिशहाण्यांनी याबाबत वाटेल तसे दावे केले असले तरी आकडा काही वाढत नव्हता. आज आजाराचे आणि उद्या आर्थिक संकट देशावर घोंघावत असतानाच दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन भागात जे काही घडले, ते देशाला अचंबित करणारे तर होतेच, पण त्याचबरोबर मानवतेच्या अस्तित्वालाच नख लावणारे होते. धर्माच्या अफूत सतत काहीही बरळणार्‍या मौलवींनी कोरोना बरे होण्याचे अनेक उपाय बरळले होते. ‘अल्लाह अल्लाह’चा गजर करणार्‍या कबुतरांचा जीव घेऊन त्याचा कुठलातरी अवयव खाण्याचा सल्ला देण्यापासूनही काही लोक थांबले नाहीत. या अमानुष, अमानवी आणि अश्मयुगीन जमातीने आज कोरोनापासून आपल्या कच्च्याबच्च्यांचा बचाव करणार्‍या सर्वसामान्य माणसासमोरसुद्धा जीवावर बेतणारे प्रसंग आणून उभे केले आहेत. यातील अनेकांनी तर आपल्या रोजीरोटीवरसुद्धा पाणी सोडले आहे. मूळ मुद्दा हा धर्माचा नाही. भारतासारख्या हिंदूबहुल देशात इस्लामी देशांप्रमाणे अन्य धर्मीयांना त्यांच्या धार्मिक अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी बंदी नाही. मात्र, त्याचा गैरफायदा मुसलमानांनी वारंवार घेतला आहे. कसल्या कसल्या जुलूसानंतर दंगली घडविणे, हिंदू वस्त्यांवर हल्ले करणे, गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होणे या आणि अशा कितीतरी गोष्टी गंगा-जमुनी तहजीबच्या नावाखाली खपवून घेतल्या गेल्या आहेत. आता खुद्द मुसलमानांच्याच आणि त्यांच्यामुळे उर्वरित देशवासीयांच्या जिवाला धोका निर्माण झालेला असतानाही ही मंडळी यातून हवा तो बोध घ्यायला तयार नाहीत.


ज्या ‘तबलिगी जमाती’च्या नावावर आज इतका सारा गोंधळ सुरू आहे, त्या ‘तबलिगी जमाती’चे कारनामे आपल्याला ठाऊक असायचे कारण नाही. पण यांच्यामुळे जेव्हा देशासमोर इतके मोठे संकट उभे राहाते, तेव्हा मात्र यांच्या मुळाशी जावे लागते. तबलिगीसारखे लोक जे आज रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या अंगावरही थुंकत आहेत, त्यांना आपण काय म्हणून पोसायचे, असा प्रश्न सार्‍या देशात उपस्थित होत आहे. मुक्त माध्यमांवरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्या इतक्या प्रक्षुब्ध आहेत की, हाच का तो तथाकथित सेक्युलर देश, असा प्रश्न पडावा. पण, हा राग केवळ मरकजमध्ये सहभागी झालेल्यांविषयी नाही, मूळ मुद्दा त्यांच्या समर्थनार्थ निर्लज्जपणे समोर येणार्‍यांविषयीही आहे. काही लोकांना आपले सेक्युलॅरिजम सिद्ध करायला मुस्लिमांची कड घ्यावी, असे वाटते. ती कड घेताना कोरोनासारखे प्रसंग आले तर हे कड घेणारे कलंडून पडले तरी त्यांना त्याचे भान राहात नाही. महाराष्ट्रात तर त्याचा कडेलोट झाला. विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लॉकडाऊन’ तोडणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी एका पोलिसाला चॅनलवर बोलाविले होते. त्यांचा दंडुका दाखवून घरी बसले पाहिजे, असे फर्मान काढले होते. हेच महाशय आता मरकजमध्ये सहभागी झालेल्यांनी स्वत:हून पुढे यावे, अशा विनवण्या करीत आहेत. संकटाच्या वेळी धर्माचा भेदभाव करणे चुकीचेच, पण एका विशिष्ट धर्माचे लोक आपल्या धर्मवेडेपणामुळे विपरीत वागत असतील आणि त्यांच्यामुळे देशातील अन्य नागरिकांच्या जीवाला धोका झाला असेल तर अशावेळी यापूर्वी फणा काढणार्‍या गृहमंत्र्यांनी वेटोळे घालून बसण्याची गरज नाही. लांगूलचालनाचा परमोच्च बिंदू गाठणार्‍या काँग्रेसची आज काय अवस्था झाली आहे, ते सगळ्यांच्या समोरच आहे. तरीसुद्धा ही मंडळी सुधारायला तयार नाहीत.

 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तर मोदी सरकारने ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेण्याआधी पुरेसे नियोजन केले नाही, असे म्हटले. मात्र, ‘लॉकडाऊन’च्या काळात कोरोनाच्या मजबूत प्रसारासाठी कारण ठरणार्‍या, डॉक्टरांच्या अंगावर थुंकणार्‍या, शिवीगाळ करणार्‍या तबलिगी मुल्ला-मौलवींच्या निषेधासाठी सोनियांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. जागतिक पातळीवरील संस्था भारत सरकारच्या नियोजनाचे कौतुक करत असताना सोनिया गांधींची त्यावरील टीका आणि गठ्ठा मतदानासाठी आपल्यांना सांभाळून घेत तबलिगींबद्दल बाळगलेले मौन वर्षानुवर्षांपासून जोपासलेली तुष्टीकरणाची काँग्रेसी नीति समोर आणणारेच. जे काँग्रेस करते आहे, तेच या पक्षाने आतापर्यंत पाळलेल्या तथाकथित बुद्धिजीवी, अभ्यासकांकडूनही होत आहे. कोरोनाचा फैलाव करणार्‍या तबलिगींविरोधात बोलण्यासाठी तोंड उघडायचे वा लेखणी उचलायची पण हातचे राखून. तबलिगींच्या आडून हिंदूंवर आणि हिंदू संघटनांवर निशाणा साधण्याचे कामही या लोकांकडून सुरू आहे. एकंदरीत या प्रत्येकाला तबलिगींना, मुस्लिमांना निर्दोष सिद्ध करायचे आहे आणि वडाची साल पिंपळाला लावून देशातील बहुसंख्यच दोषी असल्याचे पटवून द्यायचे आहे. ही सगळी यंत्रणा त्यासाठीच राबत असल्याचे दिसते. अशा लोकांच्या भोंदूगिरीला विरोध म्हणूनच मुक्त माध्यमांवर तबलिगींविरोधात संताप आणि संतापच व्यक्त होताना पाहायला मिळतो.


मात्र, तबलिगी जमातीच्या मुल्ला-मौलवींना माणुसकीचा खून पाडण्याची हिंमत त्यांच्या धर्मांधपणालाही डोक्यावर घेणार्‍यांमुळेच मिळते. आपण कितीही खुळेपणा केला तरी आपल्याला पाठिंबा देणारे आपल्याहूनही थोर खुळे या देशात आहेत, याची जाणीव त्यांना असते. काँग्रेस वा कम्युनिस्ट, समाजवादी वा एमआयएम, पुरोगामी वा धर्मनिरपेक्षतावादी आपल्या बाजूने किल्ला लढवतील, याची खात्री त्यांना असते. मरकजमध्ये सामील झालेल्यांनी रुग्णालयात घातलेला धुडगूस आणि केलेल्या अव्वाच्या सव्वा मागण्या किंवा आपल्या धार्मिक प्रथांच्या पालनासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’लाही हरताळ फासणे, या घटना आणि नंतर तथाकथित शहाण्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया त्याचीच प्रचिती देतात. सध्या जगात आणि देशात कोरोनाची साथ सुरू आहे. कोरोना हा नवीन रोग असल्याने त्यावर कोणीही अजून तरी उपचार शोधू शकलेले नाही. पण, भारतात कोरोना आल्यानंतर जे काही घडते आहे, ते पाहता इथल्या विशिष्ट कळपांना त्याचे गांभीर्य जाणवत असल्याचे दिसत नाही. अजूनही या टोळ्यांकडून तबलिगी जमातसारख्यांचा बचाव सुरू असून त्यांना त्याच त्या जुन्यापुराण्या सेक्युलर साथीचा प्रसार करायचा आहे. परंतु, आता जमाना बदलला असून उर्वरित सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणार्‍या सेक्युलर साथीवर जालीम औषधाचा इलाजही सुरू आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.