भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा पाटील तर मुंबई अध्यक्षपद लोढांकडे कायम

    दिनांक  13-Feb-2020 12:27:59

BJP_1  H x W: 0
मुंबई : भारतीय जनेता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.
 
 
 
 
२०१३मध्ये चंद्रकांत पाटलांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१४ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवत विधानपरिषदेत त्यांनी पुन्हा प्रवेश केला. २०१४मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम या विभागांची सूत्रे सोपवण्यात आली होती. तसेच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, जुलै २०१९ मध्ये मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आशिष शेलारांना मंत्रिपद दिल्यानंतर शेलारांकडील जबाबदारी त्यावेळी लोढांकडे सोपवण्यात आली होती.
 
 
२०१६पासून चंद्रकांतदादा पाटील हे महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री होते. दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार सोपवला होता. तत्कालीन भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जुलै २०१९ मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.