२०२२पर्यंत दहिसर कांदळवन उद्यानाचे काम पूर्ण होणार : सुधीर मुनगंटीवार

    दिनांक  05-Sep-2019 20:50:04
मुंबई
: “दहिसर कांदळवन उद्यानाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असून २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल,” अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले, “या कांदळवनाची जैवविविधिता खूप मोठी असून येथे कांदळवनाच्या ११ प्रजाती आढळतात. त्यामुळे संशोधन आणि मनोरंजन या दृष्टीने हा परिसर पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.


येथे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील
. या उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, जैवविविधतेसह आभासी संग्रहालय, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. ऑक्टोबर २०२२ पर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,” असे ते म्हणाले. मुंबई येथे ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानांची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्चून तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्चून कांदळवन उद्यान विकसित केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.