आंध्र प्रदेशात 'जगनमोहन पॅटर्न', सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री

    दिनांक  07-Jun-2019हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही सरकारने एवढे उपमुख्यमंत्री ठेवले नसल्याने,जगनमोहन यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी वायआरएस काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. याच बैठकीत जगनमोहन यांनी आश्चर्यकारक निर्णय घेतला.

 

नवनिर्वाचित पाच उपमुख्यंमत्री हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असणार आहेत. सत्तासमतोल राखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री ठेवण्याचा प्रयोग झाला होता. मात्र, जगनमोहन यांचा पाच उपमुख्यमंत्रिपदाचा प्रयोग देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. जनतेच्या आशा-अपेक्षा लक्षात घेऊनच मी हा निर्णय घेतल्याचे जगनमोहन म्हणाले.

 

दरम्यान, ३० मे रोजी जगनमोहन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शनिवारी त्यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी पाच उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे जगनमोहन यांनी जाहीर केले. तसेच अडीच वर्षांनी कॅबिनेटमधील मंत्रिपदे बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat