१२०० रुपये ते कोट्यधीश

    दिनांक  20-Jun-2019   पारसभाई शाह यांची प्रेरणादायी वाटचाल

 

पालिताना. गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव. जैन समाजाचे हे एक मोठे तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याच गावात प्रभुदासभाई शाह हे किराणा मालाचं दुकान चालवत. त्यांची पत्नी इच्छाबेन घरप्रपंच सांभाळून दुकान चालविणास हातभार लावत असे. या दाम्पत्याला एकूण ६ अपत्ये. ५ मुली आणि एक मुलगा. मुलाचं नाव पारस. हे सारं कुटुंब वडिलांनी सुरू केलेला दुकानाचा व्यवसाय मोठ्या नेटाने सांभाळत होते. याच व्यवसायाचं बाळकडू पिऊन प्रभुदासभाईंचा पारस हा स्टेशनरी उद्योगजगतात पारसभाई शाह म्हणून प्रसिद्ध उद्योजक झाला.


लहानपणापासूनच पारस शाळेतून आला की थेट दुकानात बसे. व्यवसाय काय असतो, विक्री काय असते, खरेदी काय असते, नफा म्हणजे काय, तोटा कशाला म्हणतात, हे सारं काही तो अगदी लहानपणापासून पाहत होता. समजून घेत होता. या सर्व प्रक्रियेत सहभागी होत होता. मोठेपणी उद्योजक बनायचं आहे, हे जणू सटवाई या समाजातील प्रत्येक मुलाच्या भाळी लिहून ठेवते की काय, असा प्रश्न पडावा. एवढं जैन समाजातील मुलांचं आणि त्यांच्या पालकाचं ध्येय स्पष्ट असतं. पारस त्याला अपवाद कसा ठरणार? वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने एलएलबीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. पहिल्या सत्राची परीक्षा देणार, इतक्यात पारसच्या बाबांनी पारसला फर्मावले की, मुंबईला जाऊन उद्योगधंद्याचा अभ्यास कर, माहिती घे आणि स्वत: उद्योजक व्हायचं बघ. आपल्या तीर्थरूपांचा आदेश शिरसावंद्य मानून पारसने ३ मार्च, १९८७ रोजी तडक मुंबई गाठली. ५ मार्चपासून प्रियवदनभाईंच्या अरुणोदय प्लास्टिकमध्ये मदतनीस म्हणून काम करू लागला. खरंतर ही एकप्रकारे उद्योजक बनण्याची अप्रत्यक्ष उमेदवारीच होती. महिना झाल्यावर प्रियवदनभाईंनी त्याला पगार देऊ केला. “मी तुमच्याकडे काम शिकलो. त्याचा कसला पगार? उलट तुम्ही मला व्यवसायातले बारकावे शिकवलेत, हेच माझ्यासाठी खूप आहे,” पारसचे हे बोल ऐकून प्रियवदनभाईंचा त्याच्यावरचा विश्वास वाढला. हा मुलगा आयुष्यात खूप मोठा होईल, हे त्यांनी ताडले. त्यांनी त्यांचा करी रोड येथील प्लास्टिक उत्पादने तयार करण्याचा कारखाना भाड्याने चालविण्यास पारसला दिला. पारसकडे होते बाबांनी दिलेले फक्त १२०० रुपये. त्यातून उदरनिर्वाह करून भाडं कसं देणार, हा यक्षप्रश्न पारससमोर उभा होता. प्रियवदनभाईंनी सुरुवातीला भाडं न घेतल्याने हा प्रश्न सुटला. पारसने प्रचंड मेहनत घेतली. कारखाना नफ्यात चालविला. प्रियवदनभाईंना सर्व भाडं दिलं.

 

पारसने आपल्या मेव्हण्याच्या सोबतीनेविश्व एन्टरप्राईजेस’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीत पास कव्हर, फोटो अल्बम कव्हर अशी प्लास्टिकची उत्पादने तयार होत असत. नाशिकमधील मामांच्या मित्रांमुळे त्याला बाहेरच्या ऑर्डर्स मिळू लागल्या, तर अब्दुल रहमान स्ट्रीटवरील मोठ्या ऑर्डर्स देणारे सहा ग्राहक त्याला मिळाल्याने त्याच्या व्यवसायात वृद्धी झाली. १९९३ साली पारसभाईंनी ‘पार्थ एंटरप्राईजेस’ सुरू केली. व्यवसाय वाढत होता. बाजारपेठेतून प्रचंड मागणी होती. बाजारपेठेतील मागण्या पूर्ण करण्यासाठी अजून एका कारखान्याची आवश्यकता होती. पण, हा कारखाना उभारण्यासाठी हाती पैसा नव्हता. पारसच्या बाबांना हे कळलं. त्यांनी कोणालाही कळू न देता पालितानातील दुकान विकलं आणि १ लाख, ११ हजार रुपये पारसला आणून दिले. पारसला अश्रू अनावर झाले. पालितानाचं दुकान प्रभुदासभाईंचं जग होतं. तिथे ते नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणत. १९७४ साली प्रेशर कुकर पहिल्यांदा पालितानामध्ये त्यांच्या किराणा मालाच्या दुकानास विक्रीस त्यांनी ठेवला होता. त्या प्रेशर कुकरच्या शिट्टीचा आवाज ऐकायला दुरून माणसं येत. प्रभुदासभाईंनी आपल्या मुलासाठी पारससाठी दुकान विकलं. कारण त्यांचा आपल्या मुलावर प्रचंड विश्वास होता. या पैशातून १९९४ साली घाटकोपरला कारखाना सुरू झाला. कालांतराने दमणमध्ये दुसरा कारखाना सुरू झाला. केनी व एस्ली हे स्टेशनरीमधले दोन ब्रॅण्ड निर्माण केले. आज पारसभाई शाह यांची ‘एल्कॉन’ नावाची अजून एक डिव्हिजन आहे. फाईल्समधील २०० प्रकारच्या फाईल्स त्यांची कंपनी तयार करते. प्रिंटिंग, पॅकेजिंग आणि स्टेशनरी असे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप आहे. पारसभाई प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ३०० हून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. दुबई आणि दक्षिण आफ्रिकेसह जवळपास संपूर्ण भारतात त्यांची उत्पादने पोहोचलेली आहेत. १२०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या पारसभाईंचा व्यवसाय कोटींच्या घरात उलाढाल करत आहे. १९९५ साली मस्जिद बंदर स्टेशनरी असोसिएशन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘फेडरेशन ऑफ महाराष्ट्र स्टेशनरी मॅन्युफॅक्चर्स अ‍ॅण्ड ट्रेडर्स असोसिएशन’चे ते संस्थापक सदस्य असून सध्या ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील स्टेशनरी क्षेत्रातील २७ संघटनांची ही शिखर संघटना आहे. स्टेशनरी उत्पादनांवर १२.५० टक्के व्हॅट लागू होता, त्यावेळेस सरकारसोबत बोलणी करून हा व्हॅट ५ टक्के करण्यात आला. त्या प्रक्रियेत पारसभाईंचे योगदान मोठे होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार्य केल्याने कर कपात झाल्याचे पारसभाई नम्रपणे कबूल करतात. जीएसटी आल्यानंतर स्टेशनरीवर २८ टक्के कर लादण्यात आला होता. तो कर १८ टक्क्यांपर्यंत आणण्यामध्येही पारसभाईंचा सिंहाचा वाटा आहे. केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी याकामी पारसभाई आणि त्यांच्या सहकार्‍यांना मोलाची मदत केली होती.

 

महाराष्ट्रातील स्टेशनरी क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, उत्पादक यांना व्यवसाय करण्यास सुलभ व्हावे यासाठी एक व्यापारी संकुल तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. या संकुलात राहण्याची व्यवस्था, बिझनेस कॉन्फरन्स हॉल, उत्पादने दर्शविणारा विभाग, व्यक्तिगत व्यावसायिक बैठक घेण्यासाठी दालने, उपाहारगृह अशा आधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध असतील. पारसभाईंना सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे. समाजाचं आपण देणं लागतो, ही भावना सतत त्यांच्या मनात असते. स्टेशनरी उद्योगात येऊ इच्छिणार्या तरुणांना मार्गदर्शन करण्यास ते नेहमीच उत्सुक आहे. पारसभाईंना त्यांच्या या जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी हिना या समर्थपणे साथ देत आहेत. त्या व्यवसायदेखील सांभाळतात. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. कन्या क्रिना ही सध्या बोस्टन येथे फार्मसीमध्ये एमएस करत आहे. मुलगा सिद्धार्थ हा इंग्लंडमधून एमबीए करून सध्या पारसभाईंसोबत कंपनीला पुढच्या स्तरावर नेण्यास मदत करत आहे. बाबांनी दिलेले १२०० रुपये घेऊन मुंबईत आलेला एक सामान्य मुलगा आज स्टेशनरी उद्योगजगतात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतोय, ही उद्योजकीय वाटचाल कोणत्याही भारतीय तरुणास प्रेरणादायी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat