आरेमध्ये आढळला मृत आफ्रिकन 'बाॅल पायथन'

    दिनांक  08-May-2019


 

 

जैवसाखळीला धोका उद्भवण्याची संशोधकांची भिती

मुंबई : गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये 'बाॅल पायथन' हा पाळला जाणारा आफ्रिकन अजगर मृतावस्थेत आढळून आला आहे. मानवी वस्तीतून बचावण्यात आलेले किंवा पाळलेले परदेशी (एक्झाॅटिक) साप आणि अजगर सांभाळता न आल्याने त्यांना आरे वसाहतीत मोठ्या संख्येने अवैध्यरित्या सोडले जाते. अशाप्रकारेच हा अजगर याठिकाणी पोहचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अशा परदेशी प्रजातींमुळे आरेतील जैवसाखळीवर विपरीत परिणाम होण्याची भिती वन्यजीव संशोधकांनी व्यक्त केली आहे.

 
कुत्री-मांजरांप्रमाणेच काही हौशी प्राणिप्रेमी परदेशी अजगर किंवा साप देखील पाळतात. आफ्रिकेतील 'बाॅल पायथन' या प्रजातीचे अजगर जगभरात पाळले जातात. या प्रजातीमधील 'अल्बिनो' प्रकारच्या अजगराला पाळण्यासाठी जगभरात मोठी मागणी आहे. त्याच्या पांढऱ्या त्वचेवर पडलेल्या पिवळ्या रंगाच्या डागांमुळे हा अजगर आकर्षक दिसतो. मात्र अशा अजगरांना सांभाळणे कठीण झाल्यावर किंवा त्याच्या आरोग्यावर परिणाम झाल्यावर त्यांच्या मालकांकडून हे साप जवळपासच्या हरितक्षेत्रात अवैध्यरित्या सोडले जातात. अशाच प्रकारे अवैध्यरित्या सोडल्याची शक्यता असलेला 'बाॅल पायथन' प्रजातीमधील अजगर गेल्या आठवड्यात आरे वसाहतीत मृत्यावस्थेत आढळून आला. आरे वसाहतीतील युनिट क्र. १५ जवळील रस्त्यावर २ फुटांचा हा अजगर मृत्यावस्थेत आढळ्याची माहिती संशोधक योगेश पटेल यांनी दिली. रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक सर्पमित्र प्रभू स्वामी यांच्याकडून मिळाल्याचे पटेल यांनी सांगितले. सांभाळता न आल्याने कोणीतरी त्याला आरेमध्ये सोडल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

 

मात्र बऱ्याचवेळा आरेमध्ये वास्तव्यास नसलेले साप किंवा अजगर या ठिकाणी आढळत असल्याची माहिती जीवशास्त्रज्ञ राजेश सानप यांनी दिली. परंतु, हा प्रकार आरेतील जैवसाखळीला घातक असल्याचे सानप यांनी अधोरेखित केले.

 

जैवसाखळीवर विपरीत परिणाम 

परदेशी जीवांची (एक्झाॅटिक) एखादी प्रजात आपल्या जंगलात सोडल्यामुळे स्थानिक जैवसाखळीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. स्थानिक पक्षी किंवा सस्तन प्राण्यांना जैवसाखळीतील आपल्या शिकाऱ्यांबद्दलचे ज्ञान अवगत असते. मात्र एखादा परदेशी जीव त्या जैवसाखळीचा भाग झाल्यास ती उद्वस्त करण्याचे काम तो जीव करतो. म्हणजेच स्थानिक जीवांना मोठ्या प्रमाणात फस्त करुन तो जैवसाखळीचा समतोल बिघडवतो - डाॅ. वरद गिरी, उभयसृपशास्त्रज्ञ
 
 
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat