काळाच्या विळख्यात अडकलेली ‘विक्की वेलिंगकर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019   
Total Views |

vicky_1  H x W:




बऱ्याचदा घडलेली गोष्ट आपण पाहिलेली आहे, असा भास आपल्याला होतो. पण खरंच असं घडतं का? अनेकांची उत्तरं 'नाही' असतील. पण 'विक्की'लाही असचं वाटतं. तिला घडणारी गोष्ट एकदाच नाही तर बऱ्याचदा दिसली. काय आहे याच्या मागचं कारण? का घडतंय असं तिच्यासोबत? हे तिचं स्वप्न आहे की सत्य? तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तरविक्की वेलिंगकरहा चित्रपट पाहावाच लागेल.

चित्रपट गूढ कथानकावर बेतलेला आहे. सर आल्फ्रेड हिचकॉक यांच्या 'धक्का तंत्रा'चा वापर या चित्रपटात केला गेला आहे. चित्रपट पाहताना अनेकदा आपण एखादा हॉलीवूड चित्रपट तर पाहत नाही ना, असा विचार येतो. यापूर्वी हिंदीतमिकी व्हायरसआणिसेव्हेन अवर्स टू गोसारखे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या सौरभ वर्मानं 'विक्की वेलिंगकर' चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलंय. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला काही वेळासाठी खुर्चीत खिळवून ठेवण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी ठरलाय.

एकाच दिवसात घडणारी कथा असल्याने प्रत्येक पात्र एकाच वेशभूषेत वावरलं आहे. ही कथा मुंबईत घडत असल्याने प्रत्येक जागा प्रेक्षकाला ओळखीची वाटते आणि प्रेक्षक कथेत समरस होतो. चित्रपटाच्या 'धक्का तंत्रा'ला ही 'लोकेशन्स' अगदी पूरक ठरली आहेत. कथेमुळे सुन्न झालेला प्रेक्षक संवादातल्या अगदी लहानशा विनोदाने जागा होतो. हे विनोद जरी हसवणारे असले तरी कथेच्या गूढतेच्या मध्ये आल्याने थोडासा रसभंग झाल्यासारखा वाटतो. मध्यांतरपूर्व कथा एकाच ठिकाणी फिरत असल्यामुळे थोडासा कंटाळा येतो. मात्र, हाच कंटाळा पुढचा चित्रपट पाहण्यासाठी उद्युक्त करतो. पुढे काय घडणार, यापेक्षा ते कसं घडणार, या विचारात प्रेक्षक राहतात.

चित्रपटाच्या पात्रांबद्दल बोलायचं तर, सोनालीनेविक्कीची प्रत्येक भावमुद्रा अतिशय सुरेख रेखाटली आहे. सततच्या गोंधळात अडकलेली ही कार्टूनिस्ट वडिलांचा दुर्मीळ घड्याळांचा व्यवसायही करते आहे. त्यातच तिला कुरिअरने मिळालेलं एक घड्याळ तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतं. अभिनेता संग्राम समेळने साकारलेलालकी लोखंडेहाविक्कीचा मित्र, जो पेशानं एक 'हॅकर' आहे. संग्ग्रामने त्याच्या अभिनयातूनलकीहे पात्र जीवंत केलं आहे. त्याला पाहताना आयुष्यात प्रत्येकाला असा एखादा मित्र असावाच असं वाटतं. ज्येष्ठ अभिनेत्री रमा जोशी यांनी साकारलेलीपब्जी आजीमात्र यात भाव खाऊन गेली. आई-वडिलांविना पोरक्या असलेल्या 'विक्की'ला त्यांनीच लहानाचं मोठं केलं. 'सतत लग्न कर गं,' असं म्हणणारी आजी बघून प्रेक्षकाला आपल्या आजीची आठवण नक्की येते. जुई पवार म्हणजेच कथेतली शास्त्रज्ञसृष्टी’, 'विक्की'ची जवळची मैत्रीण. चित्रपटाची कथा हिच्या मृत्यूने सुरू होते. हा मृत्यू नेमका खून की आत्महत्या याचा शोध घेताना काळाच्या विळख्यात अडकलेली नायिका कशी बाहेर पडते, हे पाहणं उत्कंठावर्धक आहे. अभिनेता केतन सिंगने साकारलेलाइन्स्पेक्टर साळुंखे’, गौरव मोरेने साकारलेलाटॅक्सी ड्रायव्हर परशुराम आवटेसंपूर्ण चित्रपटभर लक्षात राहतो. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसलेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहाने यातविद्याही भूमिका केली आहे. सरळ, साधी आणि या मर्डर मिस्ट्रीच्या बाहेरची वाटणारी ही व्यक्तिरेखा चित्रपटाच्या शेवटला एक वेगळंच वळण देऊन जाते. चित्रपट संपल्यानंतरही ती प्रेक्षकांच्या लक्षात राहते हे विशेष.

चित्रपटाची गूढता टिकवून ठेवण्याचं काम संगीत दिग्दर्शक मनन मुंजाळ आणि ओमकार पाटील यांनी चोख पार पाडलं आहे. दृश्यांसोबतच्या चपखल आवाजामुळे वातावरणात गंभीरता निर्माण होते आणि पूर्णवेळ तशीच टिकून राहते. दोनच गाणी असल्यामुळे तीही लक्षात राहतात आणि प्रेक्षागृहाबाहेर त्याची गुणगुण ऐकू येते. सुमीत तांबे आणि पीयूष अंभोरे यांनी ही गाणी लिहिलेली असून अवधूत गुप्ते, ओमकार पाटील, पीयूष अंभोरे आणि मंदिरा कर्माकर यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.

खून, मास्क मॅन, नायक, नायिका, गूढ वस्तू आणि तशीच वस्तू अशा गूढकथेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या चित्रपटात आहेत.लाईफ इज फुल ऑफ सरप्रायझेसअसं म्हणत आव्हानांशी सामना करणारी नायिका आणि मराठीतला गूढकथेचा हा प्रयोग प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडेल , हे येत्या काळात कळेलच.

@@AUTHORINFO_V1@@