उपोषण, उपास पडणे आणि उपवास!

    06-Oct-2019
Total Views |

 
टोपी मे कि रोटी खाना हो बाबूजी
टोपी मे कि रोटी खाना...
मनोज कुमार यांच्या ‘शोर’ या सिनेमातल्या गाण्याचा मुखडा आहे. खट्याळ जया भादुरी, उपोषणाला बसलेल्या मनोजकुमारला टोपी देते घालायला... टोपी म्हणजे हॅट असते. तो उपोषण करून मरेल, या भीतीने त्याच्यावर मनोमन प्रेम करू लागलेली ही भाबडी पोर त्याला टोपीत पोळ्या लपवून देते अन् खा, असे सांगण्यासाठी र्डें वाजवून गाणे म्हणते. त्यात मध्येच हे, ‘टोपी मे कि रोटी खाना हो बाबुजीऽऽऽ’ अशी एक ओळ येते... अर्थात, भारतकुमार यानेकी मनोजकुमार तिच्यावर रागावतात आणि मग ती हिरमुसते... तिच्या मते, चुपचाप पोळी खाऊन उपोषण केले तर जास्त एनर्जी येते आणि जास्त दिवस उपोषण टिकल्याने मागण्या मान्य होतील, अशी तिची भाबडी भावना असते.
 
 
उपोषण म्हटलं की महात्मा गांधींची आठवण येते. नुकतीच त्यांची 150 जयंती जगाने साजरी केली. गांधी नावाच्या महात्म्याने जगाला ही अहिंसक आंदोलनाची देण दिली. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल...’ हा खर्या अर्थाने चमत्कार आहे. जग दुसर्या महायुद्धाच्या झळा सहन करत असताना, मोहनदास करमचंद गांधी या महात्म्याने परकी सत्ता, रक्ताचा थेंबही न सांडविता उलथवून लावली. त्याचे शस्त्र होते उपोषण, सत्याग्रह आणि अहिंसक आंदोलन...
बापूंच्या या देशात मग त्यांची केवळ नक्कल मारणे सुरू झाले. बघता बघता आंदोलने हिंसक होत गेली अन् लोकशाही दुर्बळ... बापूंच्या देशात त्यांचा वारसा सांगणार्या सत्ताधार्यांनी बापूंना धुर्यावर बसविले. हे अस्वस्थ करीत राहिले.
आता निवडणुकीचा माहोल आहे. मात्र, त्या आधी निवडणुका जवळ आल्याचे दिसताच विरोधी पक्षांना जनता आठवली आणि त्यांनी उपोषण केले काही विषयांवर. बापूजी आत्मक्लेषासाठी उपोषण करीत. त्यावरून देशात असलेले परकीय सत्ताधीशही हलून जात. विरोधी राजकारण्यांनी म्हणे खाऊन उपोषणे केली. आता लोक म्हणतात की, खाऊन उपोषण केले याचा अर्थ दोन्ही होतो. आधी खाल्ले, अगदी खा खा खाल्ले अन् मग त्यामुळे सत्ता गेली. त्या वेळी खाण्याच्या बाबत कंट्रोल केला असता, उपोषण केले असते, तर सत्ता जाण्याची वेळ आली नसती. सत्तेत असताना खा खा खाल्ले अन् आता विरोधात बसावे लागल्याने खाण्याची काही संधीच नाही, कारण न खाऊंगा, न खाने दुंगा असा बाणाच आहे. आता उपोषण म्हटले की, अण्णा हजारेही आठवतात. इतक्यात त्यांनी कुठल्याच विषयावर उपोषण केले नाही. मागे त्यांना उपोषण करावेसे वाटले होते, पण गिरीश महाजन त्यांना जाऊन भेटले अन् उपोषण थांबवले. अण्णांना या वयात उगाच दगदग नको, हीच काळजी होती. तसाही अण्णांच्या उपोषणाचा आता माहोल होत नाही, असे आमचा बंड्या म्हणत असतो. बंड्या राजकारणतज्ज्ञ आहे. तो म्हणाला की, खरेतर विरोधी पक्षांनी अण्णांना उपोषण करायलाच लावायला हवे होते. आता राजकारणाचे असू द्या; पण सामान्य माणसांच्या हाती हे किमान ताकदीत सरकार हलवून टाकण्याचे अस्त्रच बापूजींनी दिले आहे, हे खरे. कुणी कशासाठीही उपोषण करतात. देशात कुठे ना कुठे अन् कुणीना कुणी कशासाठी तरी उपोषण करीतच असतात. उपोषणांचेही प्रकार आहेत. साखळी उपोषण, नैमित्तिक उपोषण, आत्मक्लेष-आत्मशुद्धीसाठी उपोषण, बैठे उपोषण फिरते उपोषण... असे असंख्य प्रकार आहेत. गेल्या वर्षी याच दिवसांत विरोधकांनी केलेले खाऊनपिऊन उपोषण हा प्रकारही त्यात समाविष्ट झाला.
लोक खातात आणि उपोषण करतात; पण 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात किमान तीस ते चाळीस टक्के जनता उपाशी किंवा अर्धपोटीच राहते. आता ज्यांना रोजच उपवास पडतात त्यांनी ते पडू नयेत, या मागणीसाठी काय उपोषण करायचे? आम्हाला रोज अन्न मिळायला हवे, यासाठी उपोषण हा मोठाच विनोद नाही का? आपल्या देशात एकतर कुपोषण असतं अन् ज्यांना खायला, प्यायला अन् ल्यायला मिळतं ती मंडळी त्याच्याही पलीकडे काही मिळावे यासाठी उपोषण करीत असतात. कर्मचारी पगारवाढ, बोनस, भत्ते, सवलती, नोकरीतील काही नियम व अटी आपल्या सोयीचे व्हावेत यासाठी उपोषण करतात. सामाजिक संस्थावाले काही समस्यांसाठी उपोषण करतात. अनेकांच्या काही मागण्या असतात, जसे पाणी हवे, वीज हवी, नागरी सोयी हव्यात... त्यासाठी मग आंदोलन म्हणून उपोषण करतात काही मंडळी. सरकारचे अधिवेशन असते त्या काळात तर उपोषण आणि मोर्चांना ऊत आलेला असतो. उपोषणाच्या राहुट्या अन् तंबूच पडलेले असतात. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तर एक महिला गेली पंचेवीस वर्षे एकाच मागणीसाठी उपोषण करीत आहे... खूप समस्या असूनही उपोषण न करणारा प्राणी म्हणजे शेतकरी! तो थेट आत्महत्याच करतो... आता मात्र पहिली आत्महत्या करणार्या शेतकर्याच्या स्मरणार्थ गेल्या दोन वर्षांपासून लोक एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करू लागले आहेत...
सध्या नवरात्रीचे दिवस आहेत अन् त्या निमित्ताने नऊ दिवस कडकडीत उपोषण करणारेही आहेतच. उपोषण, उपवास आणि उपास पडणे, असे उपाशी राहण्याचे वेगळे प्रकार आहेत. एका मुलाने मोबाईल हवा म्हणून उपोषण केले अन् देशाच्या काही भागात कुपोषणाने मुलं मरतात. आता बायकोही कधीकधी नवर्यावर रुसून उपोषण करीत असतेच. बाप रागावला मुलांवर जुन्या काळी की, त्याच्यावर जबरीचे उपोषण लादत असे. म्हणजे बायकोला सांगे, याला दिवसभर जेवायला द्यायचे नाही किंवा मी म्हणेपर्यंत खायला देऊ नकोस...
बायकोशी भांडण झाल्यावर नवरा नामक प्राणीदेखील पायात चपला सरकवून जेवणाचे ताट ढकलून निघून जातो अन् मग बायकोही जेवत नाही. नवर्याला मात्र ती सांगते, माझा राग माझ्यावर काढा, अन्नावर राग काढू नये... आता मणिपूरमधील त्या इरोम शर्मिला नामक महिलेने तीस वर्षे उपोषण केले. तिच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतच. अखेर तिने उपोषण सोडले अन् आता ती राजकारणातही उतरली. निवडणुकीत काही यश आले नाही, आता म्हणे त्या बाईंनी लग्न केले... लग्नच करायचे होते, तर इतकी वर्षे उपोषण कशाला केले? कारण लग्न म्हणजे चुरमुर्याचा लाडूच असतो, खाल्ला तर पोट भरत नाही अन् नाही खाल्ला तर उपाशी असल्यागत वाटतं... आता ही बाई आपल्या नवर्याला उपाशी ठेवणार की काय, असा प्रश्न एका बाईलाच तेव्हा पडला होता. आजकाल लोक ‘आधी फेसबुके सांगितले आणि मग केले’ या न्यायाने वागतात. त्यामुळे ‘नवरात्रीच्या उपवासाने मलूल झाले तरी तेजस्वी दिसत असलेली मी’ असा फोटो र्ऐंबीवर पोस्ट करूनच मग फेळ खाता येते म्हणत, अवघे र्सेंरचंद पोटात ढकलले जाते.
उपोषण करण्याची बाकीही काही कारणे असू शकतात. त्यासाठी उपोषण करायला हवे. गांधी देशासाठी उपोषण करीत, लोक स्वत:साठी करतात. त्यामुळे उपोषणाची ताकद संपत चालली आहे.
आता मात्र हे वाचत असताना आमच्या सुज्ञ वाचकांना सपाट्याने भूक लागली असेल. त्यामुळे त्यांनी भरपेट खाऊन घ्यावं (भेटलं तर!). माणसाने नेहमीच खाऊनपिऊन तयार असावं. काय आहे ना, की कधी कुणावर कशासाठी उपोषण करण्याची वेळ येईल, हे सांगता येत नाही!
---------
अग्रलेख
जरुर वाचा
मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121