मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होणार मराठमोळा

    दिनांक  25-Oct-2019 19:13:44
|मुंबई
विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या ब्रिटिशकालीन पोशाखात बदल करत व्यवस्थापन परिषदेने नवीन शिवकालीन अंगरखा, नाना शंकरशेट यांची पगडी अशा मराठमोळ्या पोशाखाची निवड केली आहे. आता पैठणी किनार असलेला शिवकालीन अंगरखा, मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांची पगडी, असा दीक्षांत समारंभाचा पोशाख असेल. नवा पोशाख शौर्य, सौंदर्य आणि विद्वत्तेचे प्रतीक आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. गेल्या वर्षी पोशाख बदलण्याचा विचार पुढे आला. नव्या पोशाखासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली हाेती. भारतीय संस्कृती आणि परंपरेला साजेल, अशा पोशाखाची रचना करण्यासाठी समितीने अभ्यास केला. हा पोशाख मुंबई विद्यापीठाचे पहिले 'फेलो' जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या पोशाखाचे अनुकरण असेल. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या निर्णयानुसार पोशाखासाठी खादीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी खादी ग्रामोद्योग येथून कापड खरेदी केले जाईल. तज्ज्ञ शिंपीकडून शिष्टाचारानुसार विविध रंगांचे पोशाख शिवण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदकविजेते विद्यार्थी आणि पीएचडीप्राप्त विद्यार्थ्यांना विद्याशाखानिहाय विविध रंगाचे सॅच देण्यात येतात. सर्व समावेशकतेबरोबर
, संस्कृती, परंपरा यांचा उत्कृष्ट मिलाप विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या पोशाखात दिसणार असल्याचेही कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.याबाबत बोलताना नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकरण सांगतात
," नाना शंकरशेट यांच्या पोशाखाचा समावेश दीक्षांत समारभांच्या पोशाखात करणे हा एकप्रकारे नानांचा गौरवच आहे. याबद्दल कुलगुरूंचे अभिनंदन. या विद्यापीठाच्या उभारणीत नानांचा मोलाचा वाटा आहे."