#ओवी लाईव्ह - श्रेष्ठ ग्रंथ

    दिनांक  11-Jun-2017   

 

“हुश्श! झाला बाई या detox diet चा पहिला आठवडा पूर्ण!”, प्रतिभा म्हणाली.

 

“काय पथ्य सांगितले पहिल्या आठवड्यात?”, प्रीतीने विचारले.

 

“डायटीशियनने फक्त एकच मंत्र सांगितला – पोटभरून खायचे नाही. थोडं कमी खायचे. म्हणजे जेवण झाल्यानंतर पुन्हा तेवढाच आहार खाता आला पाहिजे. थोडक्यात काय तर अर्धपोटी राहायचं! दोन दिवस अवघड गेलं, पण आता सवयीने जमतंय. मस्त हलकं हलकं वाटत आहे. दिवसभर उत्साह टिकून आहे. आणि दुपारी जेवणानंतर सुस्ती येत नाही.

 

“असे ती प्रत्येक आठवड्यात एक एक मंत्र implement करायला सांगणार आहे.”

 

“असा काय मंत्र सांगितला तुझ्या आहारतज्ञाने?”, नीला आजींनी उत्सुकतेने विचारले.

 

“पहिला मंत्र होता – ‘उदर भरण नोहे’ – पिशवीत समान भरल्यासारखे पोट भरू नका! पोटात जागा ठेवा. अवकाश ठेवा.”, प्रतिभा हसत हसत म्हणाली, “आणि या आठवड्याचा मंत्र दिला आहे सांगू? ‘जाणिजे यज्ञ कर्म’. या आठवड्यापासून पासून काय करायचे तर – यज्ञात जसे पळीपळीने हवी देतात तसे, लहान लहान घास, हळूहळू, चावून चावून खायचा.

 

“पहा! आता लहान असल्यापासून जेवणा आधी ‘वदनी कवळ घेता’ म्हणलय, पण डायटीशियनची फी भरून, जेंव्हा यातले तीन शब्द अमलात आणले तेंव्हा कुठे रामदास स्वामींचे ‘वदनी कवळ घेता’ थोडसं कळलं आहे असे म्हणू शकते!”, प्रतिभा म्हणाली.

 

“खरं आहे बघ प्रतिभा, नुसते वाचून कळत नाही, एखादा गुण कळण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का असेना तो आत्मसात करावा लागतो. म्हणतात ना, ‘हरि होऊनी हरि गुण गावे’. म्हणजे हरि कसा आहे, हे कळायला त्याचे थोडे तरी गुण अंगी बाणावे लागतात.

 

“एखादी व्यक्ती अगदी वेळ वाया घालवत नाही, हे नुसते ऐकून कळत नाही. जो पर्यंत आपण तसे महिनाभर का असेना, तसे वागत नाही तो पर्यंत त्याचे महत्वच कळत नाही.

 

“ज्ञानेश्वरी बाबतीत नामदेव हेच सांगतात. नुसते वाचू नका. अमलात आणा. एक तरी ओवी आचरणात आणून ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्या!

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।

एक तरी ओवी अनुभवावी॥ 

दीपाली पाटवदकर