जावे पुस्तकां​च्या गावा...

    दिनांक  07-May-2017


 

उन्हाळ्याच्या सुट्टीत जसं ‘मामाच्या गावाला जाऊया...’ म्हणत थोरामोठ्यांसह बच्चेकंपनी मामाच्या गावाकडे प्रस्थान करते, तसंच ‘पुस्तकांच्या गावा जाऊया’ म्हणत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पुस्तकप्रेमींनी पुस्तकग्रामी प्रवेश केला. महाराष्ट्र सरकारने ‘पुस्तकाच्या गावाची’ ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात साकार केली अन् गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत हे आगळंवेगळं ‘पुस्तकांचं गाव’ पुस्तकप्रेमींच्या मांदियाळीने खुलून गेलं. इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या ‘पुस्तकाच्या गावा’च्या धरतीवर राज्याच्या मराठी भाषा आणि सांस्कृतिक विभागाने अथक प्रयत्नांनी भिलार हे देशातील पहिलेवहिले ‘पुस्तकाचे गाव’ वसवले. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ‘पुस्तकाच्या गावा’चे उद्घाटन करण्यात आले. लागलीच दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवारांनीही सातारा जिल्ह्यातील या ‘पुस्तकाच्या गावा’ला भेट देऊन ‘पुस्तकाच्या गावा’चे पहिले पर्यटक आणि वाचक होण्याचा मानही मिळविला. इतकेच काय, त्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेत राज्य सरकारच्या या उपक्रमाची स्तुतीही केली.

खरं तर मोबाईल आणि इंटरनेटच्या आजच्या सुपरफास्ट जमान्यात सगळं काही अगदी घरबसल्या आयतं मिळतचं. अगदी पुस्तकंही... मात्र, स्वत: अशा निसर्गरम्य वातावरणात जाऊन आवडेल ती पुस्तके वाचण्याचा आनंद हा काही औरच असतो.

समुद्रसपाटीपासून एक हजार, ३७२ मीटर उंचीवर पश्चिमघाटाच्या कुशीत वसलेलं महाबळेश्वर हे थंड हवेचं पर्यटनासाठी सुप्रसिद्ध ठिकाण. याच महाबळेश्वरपासून १४ किमी आणि पाचगणीपासून पाच किमी अंतरावर भिलार हे निसर्गरम्य वातावरणाने नटलेलं एक गाव आणि याच गावात आता घरोघरी पुस्तकालय सुरू करून स्ट्रॉबेरीसारख्या आंबट-गोड अशा रसाळ चवीप्रमाणेच वाचनसंस्कृतीची चवदेखील आता चाखायला मिळणार आहे. तेव्हा यापेक्षा मोठं भाग्य ते काय...


 

महाबळेश्वरच्या पायथ्यापासून पुढे वळणावळणाचा नागमोडी घाट सुरू होतो. निसर्गाची ही हिरवी चादर पांघरावी आणि मनसोक्त त्यात रममाण व्हावं अशी नेत्रसुखी दृश्यांची शृंखला.. जिथे सूर्याचे किरणदेखील डोकावणार नाहीत, अशा खोलदर्‍या आणि वर उंचच उंच पर्वतराजीचा रांगडा साज... अगदी पायापासून शिरापर्यंत नव्या नवरीपरी नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत ठिकठिकाणी नागमोडी पाऊलवाटांची गुंफण, जणू कुरळ्या केसांची ती गुंतागुंतीची रचनाच... त्यातच सह्याद्रीने शिरावर मेघाच्छादनाचा धारण केलेला राजेशाही मुकूट. डोळ्याचे पारणे फेडण्याइतपत संमोहित व्हावे असे सह्याद्रीचे सारे सौंदर्य. वसंत ऋतू नुकताच हिरवळीची चाहूल लावून गेल्यामुळे सर्वदूर हिरवीगार अशी झाडे सह्याद्रीला आणखी देखणं करत होती. एकीकडे असं वाटायचं, हा क्षण अन् क्षण पुन्हा पुन्हा अनुभवावा आणि दुसरीकडे आमचा तोल जातो की काय अशा धाकधुकीसह आमचा प्रवास ‘पुस्तकाच्या गावा’कडे सुरू होता. दुपारी ठीक १.४५ वाजता भिलार गावात दाखल झालो. गावातील लाल माती रंग उधळत स्वागताला सज्ज होतीच. सोबतीला छाया प्रदान करणारी उंचच उंच झाडे. थोड्या थोड्या अंतरावर असलेल्या प्रत्येक घरातील सुंदर रंगरंगोटी आकर्षित करत होती. साहित्यिकांची आणि वाचकांची सोय बघून गावातील एकूण २५ घरांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली होती. प्रत्येक घराच्या समोर ‘म...म...म’ असे लिहिलेले फलक ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी पुस्तकालय असल्याची ओळख अगदी सहजपणे पटायची. प्रत्येक घरासमोर रांगोळी, भिंतीवर वाचनसंस्कृतीची ओळख दर्शविणारे चित्र काढून सुरेख अशी रंगरंगोटी केली होती. घराच्या अवतीभवती फणस आणि वेगवेगळी फळाफुलांची झाडे पुस्तकालयाच्या शोभेत चार चॉंद लावत होती. इतिहास, विज्ञान, क्रीडा, साप्ताहिक वर्तमानपत्रे, कथा, ललित गद्य, कादंबरी, आत्मचरित्र, बोलकी पुस्तके, बालसाहित्य, लोकसाहित्य अशा विविध विषयांची पुस्तकं या घरांमध्ये व्यवस्थित रचली होती. प्रत्येक घरात शासनाकडून चार खुर्च्या, एक गोलाकार टेबल आणि सावलीसाठी छत्र असावं म्हणून एका मोठ्या छत्रीची खास सोय. कुणाच्या अंगणात, समोरच्या हॉलमध्ये तर कोणाच्या गच्चीवर या टेबल-खुर्च्यांना वाचकांना आमंत्रित करीत होत्या. वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी, वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि पुस्तकप्रेमी वाचकांसाठी ‘पुस्तकाच्या गावा’ची ही संकल्पना म्हणजे जंगी मेजवानीच जणू! पुस्तकं आयुष्याला चांगलं वळण लावतात. अनुभवाची शिदोरी संग्रहित होते. विचार आणि ज्ञानाला बळकटी मिळते. यासाठी शासनाने घेतलेला पुढाकार आणि गावकर्‍यांनी दिलेला उदंड, उत्स्फूर्त प्रतिसाद याची सांगड म्हणजे भिलार. त्यामुळे हे गाव एक आदर्श गाव म्हणून देशात नावलौकिक प्रस्थापित करेल, यात शंकाच नाही. अशा या ‘पुस्तकांच्या गावा’त शैक्षणिक किंवा कौटुंबिक सहलींच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांचे मोठ्या उत्साहात गावकर्‍यांकडून स्वागत केले जाणार आहे. पर्यटकांच्या भेटीमुळे दळणवळणाची साधने आणि रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होतील, अशी आशा गावकर्‍यांनी मनमोकळेपणाने बोलताना व्यक्त केली. इंग्लंडमधील ‘हे ऑन वे‘ या पुस्तकाच्या गावावरून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ही संकल्पना सुचली आणि देशातील पहिलेवहिले ‘पुस्तकाचे गाव’ उदयास आले. विनोद तावडे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘‘पुस्तकाच्या गावाला आलोच आहोत, तर चला जाता जाता महाबळेश्वरला जाऊया.’’ अशी या भिलार गावाची ओळख करून आणखीनच उत्सुकता वाढविली आहे. यानिमित्ताने या छोटाशा गावाचे रूपांतर गावरूपी ग्रंथालयात झाले आहे. या ठिकाणी वेळोवेळी कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करण्यासाठीही शासन आणि गावकरी सज्ज झाले आहेत. भिलार हे गाव प्रकाशनाचे डेस्टिनेशन व्हावे, असे माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनप्रसंगी बोलून दाखविले आणि प्रकाशकांना तसं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वरुण राजानेदेखील आपली उपस्थिती दर्शवून वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह निर्माण केला होता. निलगिरीच्या सुगंधाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होतेच. तेव्हा, अशा या निसर्गाच्या सप्तरंगांनी नटलेल्या आणि पुस्तकांनी भर घातलेल्या साहित्यिक सौंदर्याचा आस्वाद एकदा नक्की घ्या!

 

हर्षना रोटकर