देवेंद्रजी फडणवीस : महाराष्ट्राच्या विकासगाथेचं ‘सुवर्ण कमळ’

    21-Jul-2025
Total Views | 5

महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्वाचे स्वरूप अनेकदा बदलत गेले. पण, काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी केवळ सत्ता चालवत नाहीत, तर ती इतिहास घडवतात, व्यवस्थेचे नवे प्रारूप तयार करतात. देवेंद्रजी फडणवीस हे अशा नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहेत. एक विचारशील प्रशासक, दूरदृष्टी असलेला अर्थनीतीकार आणि महाराष्ट्राच्या नवयुगाचा खर्या अर्थाने शिल्पकार, अशीच त्यांची आजपर्यंतची कारकीर्द राहिली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मागे वळून पाहिलं, तर लक्षात येतं की, हा केवळ एका राजकीय प्रवास नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय उत्क्रांतीचं परिपूर्ण कथानक आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांमध्ये जर एखाद्या नेत्याने सातत्याने धोरणात्मक, दूरदृष्टीपूर्ण आणि परिवर्तनकारी नेतृत्व दिले असेल, तर तो नेता म्हणजे देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस. नागपूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या नेतृत्वाने विद्यार्थी जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची पायाभरणी केली. आज ते केवळ एक राजकीय नेतृत्व नाही, तर विकास आणि पारदर्शकतेच्या आधारावर महाराष्ट्राच्या नवविकासगाथेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

देवेंद्रजी फडणवीस यांनी अवघ्या २१व्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश केला. अवघ्या २७व्या वर्षी ते नागपूरचे महापौर झाले आणि त्यानंतर सातत्याने विधानसभेवर निवडून येत त्यांनी आपला अभ्यासू आणि दृढनिश्चयी नेता म्हणून ठसा उमटवला. २०१४ मध्ये ते महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. मधल्या काळात उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला. युतीमध्ये विधानसभा निवडणूक लढवूनही वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. या कसोटीच्या काळात देवेंद्रजींनी सक्षम, अभ्यासू आणि आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून भूमिका पार पाडली. पण, केवळ पद हे त्यांच्या कार्याचे मोजमाप नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखाली साकार झालेल्या योजनांचा राज्याच्या प्रत्येक विभागात खोल परिणाम झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात ज्या नेत्यांनी राज्याला नव्याने दिशा दिली, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव आज अत्यंत आदराने आणि अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे, केवळ राजकीय चढाओढ नाही, तर कार्यसंस्कृती, ध्येयनिष्ठा आणि दृढदृष्टी यांच्या समन्वयाने घडलेली एक विकासगाथा आहे. देवेंद्रजी केवळ प्रशासकीय अधिकारांचे वापरकर्ते नाहीत, तर ते भविष्यातील महाराष्ट्राची रचना करणारे शिल्पकार आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय, आखलेली धोरणं आणि आजपर्यंतची कामगिरी ही फक्त आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर जनतेच्या जीवनात दुरगामी परिणाम करणारी ठरली आहे.

राज्यकारभारात नव्या सुधारणांची गंगोत्री

देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, तेव्हा महाराष्ट्र आर्थिक अडचणीत होता. पण, कमी कालावधीत त्यांनी आर्थिक शिस्त, गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण आणि धोरणात्मक स्पष्टता या बळावर महाराष्ट्राला देशपातळीवर प्रथम स्थानी आणलं. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १.६५ लाख कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीत देशात पहिला क्रमांक मिळवला ही केवळ आर्थिक आकडेवारी नाही, तर जागतिक गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाची साक्ष आहे. एका बाजूला महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील उद्योग इतर राज्यात जात असताना देवेंद्रजींनी मेहनत घेऊन पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक एकचं राज्य बनवलं. गेल्या दोन वर्षांत ‘एफडीए’ची गुंतवणूक संपूर्ण भारतात आलेल्या ‘एफडीआय’च्या जवळपास ४० टक्के इतकी आहे आणि महाराष्ट्राच्या व्यावसायिक सक्षमता आणि नवनिर्मितीक्षमता यावरची शिक्कामोर्तब करणारी आहे. ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२५’नुसार महाराष्ट्राची ८४ टक्के रोजगारयोग्यता ही देशातील सर्वोच्च आहे. हे आकडे म्हणतात की, देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र केवळ शिक्षण देत नाही, तर उद्योगांना आवश्यक कौशल्यांचा पुरवठा करणारा एक विश्वसनीय भागीदार बनला आहे. हेच कौशल्य मुंबईला भारतातील ‘फिनटेक’ क्रांतीचं केंद्र बनवतं, जिथे आज देशातील ३२ टक्के ‘फिनटेक’ स्टार्टअप्स कार्यरत आहेत.

इन्फ्रामॅन : समृद्ध महाराष्ट्राची रचना

मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्याच कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राला ज्या गतीने विकसित करण्यास सुरुवात केली, ती देशभर चर्चेचा विषय ठरली. नागपूर आणि मुंबई यांना जोडणारा समृद्धी महामार्ग म्हणजे, या विकासदृष्टीचे स्पष्ट उदाहरण आहे. हा महामार्ग केवळ दोन शहरांमधील अंतर कमी करणारा एक रस्ता नाही, तर तो महाराष्ट्राच्या मध्य, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक जगतात आणणारा एक जिवंत सेतू ठरला आहे. याच महामार्गाच्या कडेला उभे राहात असलेले लॉजिस्टिक हब, कृषी प्रक्रिया केंद्रे, औद्योगिक वसाहती आणि पर्यटन क्षेत्र हे केवळ विकासाच्या संकल्पना नाहीत, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या नशिबाची भाग्यरेषा आहे. देवेंद्रजी फडणवीस हे केवळ एसप्रेस-वेचे शिल्पकार नाहीत, तर लोकांच्या आशावादाचेही वाहक आहेत. समृद्धी महामार्ग हा एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला शहरांशी जोडणारा विकासाचा महामार्ग आहे. ७०१ किमी लांबीचा हा ‘ग्रीनफिल्ड एसप्रेस-वे’ देशातील सर्वांत मोठा असून, तो केवळ वाहतुकीचा नाही, तर औद्योगिक, कृषी आणि मानवी विकासाचा मार्ग आहे.

वॉटरमॅन : दुष्काळमुक्त महाराष्ट्राची शपथ

देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे ‘जलयुक्त शिवार’ ही ऐतिहासिक योजना. महाराष्ट्राच्या अनेक भागांतील शेतकर्यांचे आयुष्य टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते. अशा काळात त्यांनी जलसंधारण, जलनियोजन आणि पावसाच्या पाण्याचा तळागाळात जाऊन उपयोग कसा करता येईल, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि ‘जलयुक्त शिवार’सारखी योजना प्रत्यक्षात उतरवली. ही योजना यशस्वी ठरली ती लोकसहभागामुळे, पण या लोकसहभागामागे जो प्रेरणादायी विश्वास होता, तो देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा होता. दुष्काळग्रस्त भागातील जलसाठे वाढवले गेले, भूजलपातळी सुधारली आणि कोरडवाहू शेतीला नवसंजीवनी मिळाली. ही केवळ यंत्रणांची योजना नव्हती, तर गावागावांतील जनतेला ‘आत्मनिर्भरते’कडे नेणारी एक सामाजिक क्रांती होती. ‘जलयुक्त शिवार’ अभियानातून त्यांनी २२ हजार गावे दुष्काळमुक्त केली. ३.७ दशलक्ष हेटर जमिनीला सिंचनाखाली आणून त्यांनी शेतीला फक्त आधारच दिला नाही, तर शेतकर्यांच्या भविष्याला आश्वासक वळण दिलं.

शहरांचाही सर्वांगीण विकास

देवेंद्रजींनी शहरी महाराष्ट्रालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. मुंबईतील कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो हे प्रकल्प केवळ इंजिनिअरिंगचा चमत्कार नाही, तर सामान्य नागरिकांच्या जीवनशैलीत परिवर्तन घडवणारे उपक्रम आहेत. सार्वजनिक वाहतूक सुलभ करणे, वेळ वाचवणे, प्रदूषण कमी करणे आणि भविष्यातील शहरी नियोजन यांमध्ये त्यांनी आधुनिकतेच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकल्पांचा निर्णय, निधी आणि अंमलबजावणीही त्यांनी अत्यंत वेगाने आणि पारदर्शकतेने पूर्ण केली.

सामाजिक बांधिलकी जपणारं नेतृत्व

देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, सामाजिक न्याय व समावेशी धोरण. त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही समाजघटकाकडे फक्त मतांच्या गणितातून पाहिले गेले नाही. शेतकरी, कामगार, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटके-विमुक्त, दिव्यांग अशा सर्वच घटकांना शासनाच्या योजनांमध्ये स्थान मिळाले. त्यांनी केवळ घोषणा केल्या नाही, तर त्या अमलात आणून दाखवल्या. विशेषतः ग्रामीण महिलांसाठी राबवलेली ‘लाडकी बहीण योजना’, शेतकर्यांसाठी कर्जमाफीची सुसूत्र अंमलबजावणी, युवकांसाठी उद्योग निधी, डिजिटल स्टार्टअप्ससाठी धोरणात्मक पायाभरणी हे सगळं सांगतं की, देवेंद्रजींनी ‘विकास’ या संकल्पनेला केवळ भौतिक पातळीवर मर्यादित ठेवले नाही, तर त्यात मानवी विकासाचा गाभा गुंफला आहे.

पारदर्शी, जबाबदार आणि कार्यक्षम प्रशासन

प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी त्यांनी ‘महाराष्ट्र सेवा हमी कायदा’ लागू करून एक नवीन वाटचाल सुरू केली. शासकीय सेवा मिळवणं, हा नागरिकाचा हक्क आहे, ही जाणीव या कायद्यामुळे रूजली. शासकीय प्रक्रियांमध्ये डिजिटायझेशन, ट्रॅकिंग सिस्टीम आणि तक्रार निवारण यंत्रणा यामुळे सामान्य नागरिक अधिक सशक्त झाला. सरकारी यंत्रणांना जबाबदारीची जाणीव झाली. ही प्रशासकीय सुधारणा ही निव्वळ फायलींचा खेळ नव्हती, तर प्रशासनाला लोकाभिमुख बनवणारी दूरदृष्टी होती.

ई-गव्हर्नन्स : लोकशाहीची नव्याने मांडणी

त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये आघाडी घेतली. डिजिटल पायाभूत सुविधा, प्रशासकीय पारदर्शकता आणि नागरिकांना सुलभ सेवा हे सर्व विकासाचं नवं मापदंड ठरले. ‘डिजिटल महाराष्ट्र’ हे स्वप्न त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवलं आणि राज्य प्रशासनाला नव्या युगाशी जोडून दिलं.

आज देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर फक्त भाजप या राजकीय पक्षाची जबाबदारी नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचं एक सामूहिक स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका आहे. त्यांच्या कामाचे खरे मूल्यमापन हे सामान्य नागरिकांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल पाहूनच करता येईल. आज महाराष्ट्र विकासाच्या नव्या पर्वात उभा आहे आणि त्या पर्वाच्या प्रत्येक ओळीवर, प्रत्येक योजनांवर, प्रत्येक यशस्वी प्रयत्नांवर एक स्पष्ट स्वाक्षरी उमटते ती म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांची. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र फक्त पुढे जात नाही, तर देशात आदर्श ठरेल असा ‘मॉडेल स्टेट’ होण्याच्या दिशेने झपाट्याने पावले टाकतो आहे.

आज देवेंद्रजी केवळ मुख्यमंत्री नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्याची दिशा ठरवणारे एक विवेकशील प्रवाह आहेत. त्यांचं अगाध ज्ञान, दृष्टी आणि कर्तृत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!

नवनाथ बन, प्रदेश माध्यम प्रमुख, भाजप

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121